आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर पोलिसांच्या हायटेक 'अॅन्टीराईट सूट'मुळे दंगेखोर येणार वठणीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- मोर्चे, आंदोलने, बंद, दंगे, तसेच उत्सवकाळात जीवाची पर्वा न करता नागरिकांचे संरक्षण करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेचा सर्वांनाच विसर पडला आहे. प्रसंगी दंगेखोरांचा मारदेखील पोलिसांना सहन करावा लागतो. नगर पोलिस प्रशासनाने मात्र अशा दंगेखोरांना वठणीवर आणण्यासाठी हायटेक 'अॅन्टी राईट सूट'ची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे राज्य राखीव दलानंतर हे सूट राज्यात केवळ नगर पोलिसांकडेच आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या पुढाकारातून हे सूट खरेदी करण्यात आले आहेत. 


दोन दिवसांपूर्वी माळीवाडा परिसरात पोलिसांच्या दंगल नियंत्रक पथकाचे प्रात्यक्षिक झाले. काळे सूट परिधान केलेले व रोबोटसारखे दिसणारे पोलिस कर्मचारी यावेळी नगरकरांना प्रथमच पाहण्यास मिळाले. सूट परिधान केलेले ६० पोलिस कर्मचाऱ्यांचे पथक दंगेखोरांना रोखण्याचे काम करणार आहेत. पॉलिफायबरपासून तयार केलेल्या या सूटवर दगड, काठी, अॅसिड, तसेच तलवार, चाकूसारख्या शस्त्रांनी वार केले, तरी संबंधित पोलिस कर्मचाऱ्यास कोणतीच इजा होत नाही. पोलिसांचे संपूर्ण शरीर, तसेच डोक्याला या सूटचे कवच आहे. त्यामुळे दंगेखोरांनी िकतीही दगडफेक केली, तरी त्याचा कोणताच परिणाम सूट परिधान केलेल्या पोलिसांवर होणार नाही. परिणामी दंगेखोरांनाच पोलिसांचा मार खावा लागेल अथवा संबंधित ठिकाणाहून पळ काढावा लागणार आहे. राज्यात केवळ नगर पोलिसांकडेच हे सूट अाहेत. राज्य राखीव दलाकडे हे सूट आहेत, परंतु राज्यातील पोलिसांना अद्याप हे सूट मिळालेले नाहीत. पोलिस अधीक्षक शर्मा यांनी मात्र त्यांचे अधिकार वापरून स्वतंत्र निधीतून हे सूट खरेदी केले आहेत. शर्मा या निर्णयामुळे नगर पोलिस हायटेक झाले असून त्यांचे मनाेबलही उंचावले आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र बंदोबस्तात व्यग्र असलेल्या राज्यातील सर्वच पोलिसांच्या सुरक्षेसाठी अशा सूटची आवश्यकता आहे, अशी प्रतिक्रिया काही पोलिस कर्मचाऱ्यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केली. 


लवकरच आणखी सूटची खरेदी 
जुन्या सूटमुळे पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. दंगा नियंत्रण करताना त्यांना केवळ समोरूनच कवच होते, हेल्मेटही खूप जड होते. पळताना पायाचे पॅड व बेल्ट तुटायचे. 'अॅन्टीराईट सूट'मुळे मात्र पोलिसांना सहजपणे हालचाली करता येतात, पळताही येते. प्रायोगिक तत्वावर खरेदी करण्यात आलेल्या या हायटेक सूटला पोलिस कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतोय. लवकरच असे आणखी सूट खरेदी करण्यात येणार आहेत.

- रंजनकुमार शर्मा, जिल्हा पोलिस अधीक्षक, अहमदनगर. 

बातम्या आणखी आहेत...