आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • 'Hindus Are Apathetic In The Country, Thinking Of Nationalism From Muslims Is Stupid', Sambhaji Bhide, Chief Of Shiv Pratisthan's Said In Sangli

'देशात हिंदूच उदासीन, मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची कल्पना म्हणजे मूर्खपणा', शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांचे सांगलीमध्ये वक्तव्य

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

सांगली : हिंदूच उदासीन असल्यामुळे मुस्लिमांकडून राष्ट्रीयत्वाची कल्पना करणे म्हणजे मूर्खपणा असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी मंगळवारी सांगलीत केला. नागरिकत्व सुधारणा कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठानच्या वतीने सोमवारी सांगलीत मोर्चा काढण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

भिडे म्हणाले, सध्याच्या केंद्र सरकारने कलम ३७०, तिहेरी तलाक, नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू केले आहेत. तर एनआरसी कायदा प्रस्तावित आहे. हे सर्वच निर्णय अत्यंत योग्य आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तानातील अत्याचार सहन करणाऱ्या बांधवांना पुनर्वसन करण्याच्या कायद्यात मतपेटीचे राजकारण दिसत नाही. मात्र, काही नतद्रष्ट मंडळी या कायद्याबाबत अपप्रचार करून त्याचे राजकीय भांडवल करण्यात मग्न आहेत. या कायद्याबाबत त्यामुळेच देशातील विविध भागात दंगली होऊन सार्वजनिक मालमत्तेची हानी झाली आहे. योगी सरकारने ज्या पद्धतीने दंगलखोरांची संपत्ती जप्त करून त्यातून नुकसान भरपाई वसूल केली त्या पद्धतीनेच इतर राज्यांनीही वसुलीची प्रक्रिया राबवणे गरजेचे आहे. या कायद्याला ममता बॅनर्जी तसेच मनमोहन सिंग यांनी काही वर्षांपूर्वी पाठिंबा दिला होता. संसदेत तशी भाषणे केली होती. मात्र, आज तेच या कायद्याचा विरोध करत आहेत. यामागे केवळ मतपेढीचे राजकारण आहे, असा आरोप भिडे यांनी या वेळी बोलताना केला.

पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले

ऊठसूट मॉब लिंचिंगचा गवगवा करणारी मंडळी सध्या देशात सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत मात्र गप्प आहेत. वास्तविक दंगलीत देशात विविध ठिकाणी पोलिसांचेच मॉब लिंचिंग सुरू आहे. याला कोण रोखणार, याचे उत्तर कुणाकडेही नाही. शिवप्रतिष्ठानचे धारकरी सैन्यातील जवान व पोलिस बांधवांचा अपमान सहन करणार नाहीत. पोलिसांचे हात कायद्याने बांधलेले आहेत. मात्र, वेळ येताच आम्ही रस्त्यावर उतरून समाजकंटकांना जशास तसे उत्तर देण्यास समर्थ आहोत. नागरिकत्व सुधारणा आणि एनआरसी दोन्ही कायदे राष्ट्रहिताचे आहेत. त्याला समर्थन देण्यासाठीच शिवप्रतिष्ठान मैदानात उतरणार आहे. मोर्चामध्ये समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शहरातील राममंदिर चौकातून सकाळी दहा वाजता मोर्चास प्रारंभ होईल. स्टेशन चौक मार्गे मारुती चौकातील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर मोर्चाची समाप्ती होईल. तेथे सभा होणार असल्याचेही भिडे यांनी या वेळी बोलताना सांगितले.

बारामती की तेरामती ?

संभाजी भिडे म्हणाले, पुणे ग्रामीण पोलिसांनी मला पुणे जिल्हाबंदी केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांत झळकत आहेत. मात्र त्यामध्ये काहीही तथ्य नाही. अशी कोणतीही नोटीस पोलिसांनी काढलेली नाही. तसेच मलाही ती मिळालेली नाही. प्रसारमाध्यमांकडे जिल्हाबंदीची नोटीस असल्यास त्यांनी ती मला दाखवावी. जाणीवपूर्वक बदनामी करण्यासाठीच हा अपप्रचार करण्यात येत आहे. ही दुष्ट बुद्धी बारामतीची की तेरामतीची हे माहीत नाही.
 

बातम्या आणखी आहेत...