आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अतुल पेठकर/ रमाकांत दाणी
हिंगणघाट / नागपूर - हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडितेची प्रकृती चिंताजनक आहे. आणखी ७२ तास आव्हानात्मक असल्याचे नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले. सोमवारी विकी नगराळे याने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले होते. दरम्यान, मंगळवारी पीडितेने हात हलवून प्रतिसाद दिल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी तिच्या आई-वडिलांना बोलावून दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या घटनेच्या निषेधार्थ हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी रेल्वे येथे हजारो लोक रस्त्यावर उतरले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपचारांचा खर्च मुख्यमंत्री निधीतून करण्यात येईल, असे जाहीर केले. दरम्यान, आरोपी विकी नगराळे याला न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस काेठडी सुनावली.
आठवण | तू पुन्हा सोबत येशील, मोनिका (तिची जवळची मैत्रीण)
हिंगणघाट - ‘कॉलेजचे गॅदरिंग असल्याने गावाहून (दारोडा) ये-जा करणे ितला शक्य नव्हते. त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी ती हिंगणघाटला माझ्या घरीच मुक्कामाला होती. रविवारी सकाळी ती गावी गेली. सोमवारी सकाळी कॉलेजमध्ये आलेली वार्ता आमच्या दृष्टीने धक्कादायक ठरली. आम्ही साऱ्या जणी अत्यंत अस्वस्थ झालो. कालपर्यंत जी माझ्यासोबत अगदी सहजपणे वावरत होती, तिच्यावर असा प्रसंग यावा?.. कॉलेजमध्ये ती वनस्पतिशास्त्र तर मी गणित शिकवते. अल्पकाळातच आम्ही खूप चांगल्या मैत्रिणी झालो. त्या विश्वासातूनच ती माझ्याकडे मुक्कामाला होती. माझ्या घरातील तिच्या दोन दिवसांच्या वास्तव्यात ती कुठेही तणावात असल्याचे जाणवले नाही. गॅदरिंगमध्ये तिचा वावर अगदी सहज होता. गॅदरिंगमध्ये आम्ही फॅशन शोचे आयोजन केले होते. ती अतिशय उत्साहाने सहभागी झाली होती. तीच मृत्यूशी झुंज देत आहे. ती पुन्हा सोबत येईल. त्या नराधमालाही कठोर शिक्षा व्हायला हवी.
आता झुंज | मृत्यूवर मात करेल ती
‘मृत्यूशी झुंज देत असलेल्या पीडितेचे प्राण वाचवणे, हे आमचे पहिले लक्ष्य आहे. तिच्या शरीरावरील भाजल्याच्या जखमा अतिशय गंभीर आहेत. आगीच्या ज्वाळांनी तिचे शरीर वेढले गेल्यावर ती बराच वेळ किंचाळत होती. आगीच्या ज्वाळा आणि वाफा तिच्या तोंडाद्वारे श्वसन व अन्ननलिकेपर्यंत पोहोचल्याने झालेली दुखापत गंभीर आहे. श्वास घेणे शक्य नसल्याने तिला गळ्यातून नळीद्वारे प्राणवायूचा पुरवठा केला जात आहे. क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल, प्लास्टिक सर्जन डॉ. दर्शन रेवणवार यांच्यासह सहा डॉक्टरांचा चमू तिच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. त्वचेचे थर जळाले असल्याने तिला जंतुसंसर्गाचा धोका सर्वात जास्त आहे. पुढील ७२ तास खूपच आव्हानात्मक असतील. जिवाच्या दृष्टीने पुढील दोन ते तीन आठवडेदेखील चिंताजनक असतील. त्या दृष्टीने डॉक्टरांची झुंज सुरू आहे.
- डॉ. अनुप मरार| (तिच्यावर उपचार सुरू असलेल्या नागपुरातील ऑरेंज सिटी हॉस्पिटलचे संचालक)
‘दिव्य मराठी’ही तिच्यासोबत
नराधमानं तिला संपवून टाकण्याचा प्रयत्न केला, तरी शालेय मुलींच्या सजगतेमुळे ती वाचली. रुग्णालयात पोहोचली. आता तिची झुंज आहे. ती यशस्वी ठरेल. आणि, त्यानंतर तिच्यावरील शस्त्रक्रिया आणि अन्य उपचारांसाठी ‘दिव्य मराठी’ हवी ती आर्थिक आणि अन्य मदत करेल, असे ‘दिव्य मराठी’ने जाहीर केले आहे. तिच्यावर उपचार करणारे डॉ. अनुप मरार, डॉ. दर्शन रेवणवार आणि नागपूरच्या ऑरेंज सिटी हॉस्पिटल प्रशासनाशी ‘दिव्य मराठी’चे राज्य संपादक संजय आवटे यांनी मंगळवारी संपर्क साधला आणि हा निर्णय कळवला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.