आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेत गाजला वर्धा जळित कांडचा मुद्दा; मुख्य आरोपी विकेश नगराळेला 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

वर्धा - हिंगणघाट येते भरचौकात तरुणीवर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला मंगळवारी कोर्टात हजर करण्यात आले. विकेश नगराळे नामक या आरोपीला कोर्टाने 8 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपी विकेश हा विवाहित असून गेल्या अनेक दिवसांपासून पीडितेचा पाठलाग करत होता. पीडित तरुणीची प्रकृती सध्या अत्यवस्थ असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. हिंगणघाट येथील घटनेच्या विरोधात स्थानिकांनी बंद पुकारला आहे.

लोकसभेत गाजला हिंगणघाटचा मुद्दा


हिंगणघाटच्या घटनेचे पडसाद लोकसभेत उमटले आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार नवनीत कौर राणा यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला. तसेच आरोपीला कठोर शिक्षेची मागणी केली. इतरही लोकसभा सदस्यांनी या घटनेचा निषेध केला.

चौकात उतरून पायी जात असताना पेट्रोल ओतून लावली आग...


दिनचर्येप्रमाणे सोमवारी सकाळी पीडित तरुणी दारोडा येथून सकाळच्या एसटी बसने हिंगणघाटला पोहोचली. नांदोरी चौकात उतरल्यावर ती पायीच महाविद्यालयाकडे जाण्यासाठी निघाली. महाविद्यालयापासून शंभर मीटर अंतरावर आरोपी विकी नगराळे मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी करून तिच्या प्रतीक्षेत होता. तिला पाहताच विकीने तिच्या दिशेने धाव घेत पेट्रोल भरलेली बाटली तिच्या अंगावर ओतून दुसऱ्या हातात असलेल्या पेटत्या टेंभ्याने तिला पेटवून दिले. यानंतर विकी मोटारसायकलने तेथून पसार झाला. ही घटना घडली त्या वेळी रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ होती. पीडित युवती वेदनांनी किंचाळत होती. आसपास काही शाळकरी मुलींनी आरडाओरड करून रहिवाशांना बाहेर आणले. लोकांनी जमा होऊन तिच्या अंगावर पाणी ओतले व कशीबशी आग विझविली. स्थानिक तळवेकर नावाच्या रहिवाशाने तिला आपल्या वाहनाने हिंगणघाटमधील प्राथमिक आरोग्यच केंद्रात तिला दाखल केले. तोवर हिंगणघाट पोलिसही रुग्णालयात दाखल झाले होते. तिची प्रकृती गंभीर असल्याने व उपचाराच्या पुरेशा सोयी नसल्याने रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी तिला नागपूरला हलवण्याचा सल्ला पोलिसांना दिला. त्यामुळे पीडितेला तातडीने नागपुरात ऑरेंज सिटी रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तिची मृत्यूशी झुंज सुरू आहे.

यापूर्वी आरोपीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न...

एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे हिंगणघाट पोलिस मान्य करीत आहेत. मात्र, विकीने हे पाऊल उचलण्याचे नेमके कारण काय? याची चौकशी सुरू असून अद्यापतरी आम्ही काहीही सांगू शकत नाही, अशी माहिती हिंगणघाटचे पोलिस निरीक्षक बंडीवार यांनी ‘दिव्य मराठी’ शी बोलताना दिली. आरोपी विकी याने तीन महिन्यांपूर्वी आत्महत्येचाही प्रयत्न केला होता, अशी कुणकुण ऐकायला मिळत आहे. मात्र, यासंबंधीची कुठलीही तक्रार पोलिसांकडे नाही. त्याचे कुटुंबीयदेखील याची वाच्यता करीत नाहीत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.