आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नागपूर - हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित तरुणीचे प्राण वाचवण्यासाठी नागपुरातील ऑरेंज सिटी रुग्णालयाचे डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. तिची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी मंगळवारी सांगितले. आणखी ७२ तास आव्हानात्मक असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सोमवारी सकाळी आरोपी विकी नगराळे याने पीडितेच्या अंगावर पेट्रोल टाकून जाळले होते. यात तिला गंभीर इजा झाली आहे. श्वसनसंस्थेला गंभीर दुखापत झाली असल्याने तिला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिला जात आहे. ऑरेंज सिटी रुग्णालयाचे क्रिटिकल केअर तज्ज्ञ डॉ. राजेश अटल, डॉ. दर्शन रेवणवार यांच्यासह डॉक्टरांचा चमू तिच्या प्रकृतीवर पूर्णवेळ लक्ष ठेवून असल्याचे रुग्णालयाच्या वतीने सांगण्यात आले.
तिने हात हलवून दिला प्रतिसाद
पीडिता मंगळवारी सकाळी हात हलवून प्रतिसाद देत असल्याचे लक्षात आल्यावर डॉक्टरांनी रुग्णालयातच मुक्कामी असलेल्या तिच्या आई-वडिलांना अतिदक्षता विभागात बोलावून त्यांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, ऑरेंज सिटी रुग्णालयात मंगळवारी दिवसभर पीडितेच्या प्रकृतीची विचारपूस करणाऱ्यांनी गर्दी केली.
वर्धा जिल्ह्यामध्ये हजारो नागरिक उतरले रस्त्यावर
वर्धा - हिंगणघाट शहरातील नंदोरी चौरस्त्याजवळ माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना घडल्यानंतर त्याच्या निषेधार्थ हजारोंच्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरले. हिंगणघाट, समुद्रपूर व सिंदी रेल्वे या तीन शहरात बंदची हाक देण्यात आली होती. नागरिकांनी उत्स्फूर्तपणे बंद पाळला. तसेच विदर्भातील इतर शहरांमध्येदेखील बंदची हाक देण्यात आली होती.
घटनेनंतर नागरिकांचा संताप लक्षात घेऊन पोलिसांकडून आरोपीची अज्ञात स्थळी चौकशी
हिंगणघाटमधील जळीत प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी विकी नगराळे याला मंगळवारी न्यायालयाने ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. सोमवारी सकाळी पीडितेला आरोपीने पेट्रोल टाकून जाळल्यानंतर काही तासांतच नागपूर ग्रामीण पोलिसांनी विकी नगराळे याला टाकळघाट येथे अटक केली. त्याला हिंगणघाट पोलिसांच्या सुपूर्द करण्यात आले. या घटनेनंतर लोकांचा संताप लक्षात घेऊन पोलिसांनी विकीची अज्ञात स्थळी चौकशी सुरू केली आहे. विकीला अटक करण्यात महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या त्याच्या मित्राचीही या प्रकरणात चौकशी करण्यात आली. दरम्यान, िवकीचे वकीलपत्र घेण्यास वकिलांनी नकार दिल्यानंतर सरकारी वकिलाने यात बाजू मांडली.
नागपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक एम. प्रसन्ना यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वत: विकीची चौकशी केली. विकीने इतके टोकाचे पाऊल उचलण्याच्या नेमक्या कारणावर बोलण्यास हिंगणघाटचे पोलिस निरीक्षक व तपास अधिकारी सत्यवीर बंडीवार यांनी नकार दिला.
उपचाराचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून
पीडितेची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे तिच्यावर उपचारासाठी लागणारा सर्व खर्च मुख्यमंत्री सहायता निधीमधून करण्यात येत आहे. आरोपीस कठोर शिक्षा व्हावी यासाठी पोलिसांनी व्यवस्थित तपास करावा, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिस विभागाला दिल्या आहेत. उपचारांचा खर्च मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून करण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.