आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फुलराणीला आजपासून द्रवरूप अन्न; जंतुसंसर्ग, रक्तदाब कमी-जास्त होत असल्याने प्रकृती चिंताजनकच

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • पीएम फंडातून निधी देणार : खासदार रामदास तडस
  • संपूर्ण खर्च सरकार करणार; आनंद महिंद्रा यांचीही तयारी

नागपूर - हिंगणघाट येथील फुलराणीला शनिवारपासून द्रवरूप अन्न देण्यात येणार आहे. तिचा रक्तदाब कमी-जास्त होत आहे. जळीत प्रकरणात असा रक्तदाब कमी-जास्त होणे चांगले नसते, अशी माहिती प्लास्टिक सर्जरी सर्जन डाॅ. दर्शन रेवणवार व क्रिटिकल सर्जरी सर्जन डाॅ. राजेश अटल यांनी दिली. दरम्यान, या प्रकरणात प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शुक्रवारी सकाळी फुलराणीची मलमपट्टी करण्यात आली. तिच्या नाकातून पोटात अन्नपुरवठा करणारी नलिका (राइल्स ट्यूब) टाकण्यात आली. आता शनिवारपासून तिला द्रवरूप अन्न देण्यात येईल. यात दूध, सोयाबीन, नारळपाणी, फळांचा रस, डाळीचे पाणी, ताक आदी आवश्यकतेनुसार देण्यात येईल, असे डाॅ. रेवणवार यांनी सांगितले.  

जंतुसंसर्गाचा अहवाल पाठवला :


फुलराणीला जंतुसंसर्ग झाला आहे. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अतिदक्षता विभाग फक्त फुलराणीसाठी राखीव ठेवला आहे. या जंतुसंसर्गाचा अहवाल मायक्रोबाॅयलॉजी लॅबकडे पाठवण्यात आला आहे. दोन दिवसांत नेमका कोणता जंतुसंसर्ग आहे हे कळेल. त्यानंतर त्यानुसार औषधोपचार ठरवला जाईल, असे डाॅ. रेवणवार म्हणाले. जंतुसंसर्ग पसरू नये म्हणून एक छोटी शस्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे डाव्या हाताच्या बोटांची हालचाल होत आहे. मात्र, उजव्या हाताच्या हालचालीत काहीही सुधारणा नाही, असे डाॅ. रेवणवार यांनी स्पष्ट केले. क्रिटिकल केअर फिजिशियन डाॅ. राजेश अटल यांनी सांगितले की, तिचा रक्तदाब कमी जास्त होत आहे. जळीत प्रकरणात रक्तदाब कमी जास्त होणे चांगले नसते. सध्या आैषधांमुळे तिचा रक्तदाब स्थिर आहे. रक्तदाब कमी जास्त झाल्यामुळे लघवी कमी होते. त्याचा परिणाम प्रकृतीवर होतो. गुरुवारी हिमोग्लोबिन कमी होऊन हार्ट रेट १०० च्यावर वाढला होता. शुक्रवारी साधारण झाला, असे असले तरी प्रकृती चिंताजनक असल्याचे ते म्हणाले.पीएम फंडातून निधी देणार : खासदार रामदास तडस
 
त्या नराधमाला फाशीच झाली पाहिजे, अशी मागणी वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी केली. खासदार तडस यांनी रुग्णालयात जाऊन फुलराणीच्या प्रकृतीची चौकशी केली, लगेच आपले या महिन्याचे मानधन उपचाराकरिता देत असल्याचे फुलराणीच्या वडिलांना सांगितले. या घटनेसंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व स्मृती इराणी यांच्याशी चर्चा केली असून पीएम फंडातून निधी मिळवून देणार असल्याचे तडस यांनी सांगितले. 
 

संपूर्ण खर्च सरकार करणार; आनंद महिंद्रा यांचीही तयारी

फुलराणीच्या उपचाराचा संपूर्ण खर्च महाराष्ट्र सरकार करणार असल्याची माहिती वर्ध्याचे जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यांनी दिली. ४ लाख रुपये यापूर्वीच रुग्णालय प्रशासनाला दिले असून आणखी ८ लाखांचा प्रस्ताव पाठवला आहे. मनोधैर्य योजनेतून तिच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत टप्प्याटप्प्याने देण्यात येणार आहे. दरम्यान, प्रख्यात उद्योजक अानंद महिंद्रा यांनीही फुलराणीच्या उपचारांचा खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. अशा झाल्या शस्त्रक्रिया


फुलराणीवर आतापर्यंत तीन शस्त्रक्रिया झाल्या. ग्रेड-३ म्हणजे ४० टक्के भाजल्यामुळे तिच्या पूर्णपणे बरे होण्याबद्दल खात्रीने काहीच सांगता येणार नाही. अशा प्रकरणांत एक ते दीड महिने लागतात. त्यातून तब्येत सुधारली तर त्वचारोपण करता येईल, असे डाॅ. रेवणवार यांनी सांगितले.   • इशस्कॅरेटाॅमी : यात जळालेली त्वचा काढण्यात येते.
  • डिब्राइडमेंट : यात जखमा निर्जंतुक करण्यात येतात.
  • फॅशियाटाॅमी : थांबलेला रक्तप्रवाह प्रवाहित करण्यासाठी हात व पायावर शस्त्रक्रिया केली जाते.
  • बर्न ड्रेसिंग : रोज मलमपट्टी करणे.