आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पती-पत्नीच्या भांडणात नऊ वर्षाच्या मुलीचा डोक्यात रॉड लागल्याने मृत्यू, पत्नीही गंभीर जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - सेनगाव तालुक्यातील सवना येथे आई वडिलांचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या दहा वर्षीय मुलीचा डोक्यात लोखंडी रॉड लागल्याने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी ता. 11 पहाटे घडली आहे. या मारहाणीत जखमी झालेल्या मुलीच्या आईला उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेनगाव तालुक्यातील सवना येथील विनोद देविदास भालेराव याचा त्याची पत्नी रत्नमाला विनोद भालेराव यांच्यासोबत मंगळवारी ता. 10 रात्री वाद झाला होता. यावेळी विनोद याने पत्नीला रत्नमाला यांना विचारलेल्या प्रश्‍नांना त्या उडवा उडवीची उत्तरे देत असल्याने त्यांच्यातील वाद विकोपाला गेला. यामध्ये विनोद याने रागाच्या भरात लोखंडी रॉडने रत्नमाला यांच्या डोक्यात वार केला मात्र त्यांनी हा वार चुकविल्यामुळे त्यांच्या तोंडावर रॉड लागला. त्यामध्ये त्यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्या भांडणाचा आवाज ऐकून त्यांची  मुलगी वैष्णवी (१०) हिला जागी झाली.

आई-वडिलांचे भांडण सोडविण्याचा तीने प्रयत्न केला. बाबा, आईला मारू नका अशी विनवणी ती करीत होती. मात्र रागात असलेल्या विनोद याने वैष्णवीच्या डोक्यात रॉड मारला. यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या डोक्यातून रक्त येत असल्याने घाबरलेल्या विनोद याने शेजाऱ्यांच्या मदतीने तिला उपचारासाठी सवना येथील खाजगी रुग्णालयात नेले तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथील शासकिय रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकिय अधिकाऱ्यांनी तिचा मृत्यू झाल्याचे जाहिर केले.

घटनास्थळी गोरेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीमनवार, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक साहेबराव राठोड यांनी भेट दिली. पोलिसांनी विनोद भालेराव याचा जवाब नोंदविला असून त्याने लोखंडी रॉड लागल्यामुळे वैष्णवीचा खून झाल्याचे कबुल केले आहे. पोलिसांनी विनोद भालेराव यास ताब्यात घेतले आहे. तर जखमी रत्नमाला भालेराव यांच्यावर हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

अनैतिक संबंधातून झाला होता वाद
यामध्ये विनोद भालेराव व रत्नमाला भालेराव यांच्यात झालेल्या वादाचे कारण अनैतिक संबंध असल्याचे प्राथमिक चाैकशीत समोर येत आहे. पोलिसांनी आता विनोद भालेराव याच्या विरुध्द गुन्हा दाखल करून त्या दिशेने तपास सुरु करण्याची तयारी चालवली आहे.


मयत वैष्णवी भालेराव ही सवना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथ्या वर्गात शिक्षण घेत होते. अभ्यासात हुशाल असलेल्या वैष्णवीच्या मृत्यूमुळे तिच्या शाळेतील शिक्षकांसह मैत्रीणींना देखील धक्का बसला आहे.

बातम्या आणखी आहेत...