Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | hingoli lok sabha election sting on shiv sena bjp alleged plot to disqaulify congress candidate

दिव्य मराठी स्टिंगः अपक्ष उमेदवाराला हाताशी धरून काँग्रेसच्या उमेदवाराची उमेदवारी अवैध ठरवण्याचा शिवसेना-भाजपचा कट?

प्रतिनिधी | Update - Apr 11, 2019, 12:39 PM IST

फोन कॉल व व्हिडिओ रेकॉर्डिंगमुळे उघड झाले धक्कादायक प्रकार

 • hingoli lok sabha election sting on shiv sena bjp alleged plot to disqaulify congress candidate

  हिंगोली - हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार त्रिशला मिलिंद कांबळे यांना हाताशी धरून काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांची उमेदवारी अवैध ठरविण्यासाठी शिवसेना- भाजप युतीने कट रचल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बातमीच्या बदल्यात जाहिराती किंवा पैसे देवून प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या विरोधात बातम्या प्रसिद्ध करून त्याचे मानसिक खच्चीकरण करून, त्याची बदनामी करून आपला उमेदवार निवडून येण्यासाठी प्रॉक्सी वॉर लढण्याच्या या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली असून निवडणूक विभाग त्यावर काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे.

  हिंगोली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार त्रिशला मिलिंद कांबळे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका क्रमांक ४५३३/२०१९ दाखल केली आहे. रिटनुसार हिंगोली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्या नामनिर्देशनपत्रातील फॉर्म २६ मधील शपथपत्रात निवडणूक विभागाची दिशाभूल करणारे खोटे शपथपत्र दिले आहे. अपक्ष उमेदवार त्रिशला कांबळे यांच्या आरोपानुसार, काँग्रेस उमेदवार सुभाष वानखेडे यांनी त्यांच्या शपथपत्रात मागील पाच वर्षाचा आयकर भरणा आणि सुभाष वानखेडे यांना माजी आमदार आणि माजी खासदार म्हणून अनुक्रमे राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून मिळणारे वेतनाबाबतचा तपशील शपथपत्रात दिलेला नाही. त्यामुळे सुभाष वानखेडे यांची उमेदवारी रद्द करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका महिला उमेदवार कांबळे यांनी औरंगाबाद खंडपीठात दाखल केली असून हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.


  विशेष म्हणजे एखाद्या उमेदवाराच्या उमेदवारीवर आक्षेप घेत असताना उमेदवारी अर्ज छाननीच्या वेळी आक्षेप का घेतला नाही, कॉंग्रेस उमेदवार निवडून आल्यानंतरही अशी तक्रार दाखल करणे शक्य असतानाही स्वतःचा प्रचार सोडून सदर अपक्ष उमेदवार पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस उमेदवाराविरोधात निवडणुकीपूर्वीच प्रचार मोहीम का राबवित आहे? हे प्रश्न उपस्थित झाले होते. याच प्रश्नाच्या अनुषंगाने दिव्य मराठीने सदर अपक्ष उमेदवाराच्या मोबाईलवर ( क्रमांक ९८३४८१०९०५- हा नंबर उमेदवाराच्या पतीकडे आहे.) विचारणा केली असता, त्यांनी त्यांचा फोन त्यांचे पती मिलिंद कांबळे यांच्याकडे दिला. कांबळे यांच्याशी झालेल्या संभाषणात कॉल रेकॉर्डिंगमध्ये अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. तसेच पत्रकार परिषदेदरम्यान घेतलेल्या व्हिडिओ शूटमध्ये उमेदवार कांबळे यांना आपला अजेंडा काय आहे, आपण निवडून येण्यासाठी प्रचार यंत्रणा कशी राबविणार आदी प्रश्न विचारले असता, त्यांची एकच घाबरगुंडी उडाली आणि त्यांनी या प्रश्नावर मौन बाळगून काँग्रेस उमेदवार वानखेडे यांना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी झुकते माप का दिले, त्यांची उमेदवारी रद्द करायची अशी उत्तर दिले.


  या संपूर्ण प्रकाराचा करविता धनी दुसराच असल्याचे प्रथमदर्शनी त्याचवेळी स्पष्ट झाले होते. त्याच अनुषंगाने स्टिंग ऑपरेशन केले असता, कांबळे यांचे पती मिलिंद कांबळे यांचे भाजपचे स्थानिक नेते मिलिंद यंबल व शिवसेना उमेदवार हेमंत पाटील यांच्याशी असलेले संबंध, पैशाच्या बदल्यात बातमी छापण्याचे प्रकरण उघड झाले. याबाबत दिव्य मराठीने ज्या ठिकाणी पत्रकार परिषद आयोजित केली होती त्या रामाकृष्णा इंटरनॅशनल लॉजिंगच्या व्यवस्थापकाचे व्हिडिओ शूटिंग स्टिंग ऑपरेशन केले. सदर व्हिडिओमध्ये पत्रकार परिषदेसाठी आवश्यक असणारी खोली मिलिंद यंबल यांनी बुक केली होती, हे समोर आहे आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत अपक्ष उमेदवार त्रिशला कांबळे यांना त्यांचा प्रचार कसा आहे, निवडून कसे येणार याबाबत प्रश्न विचारले असता त्यांची घाबरगुंडी उडाली. मध्येच त्यांचे पती मिलिंद कांबळे हे त्यांची बाजू घेऊन सावरासावर करीत असल्याचे यावेळी दिसून आले. तर या संपूर्ण प्रकरणाची खातरजमा सदर उमेदवाराला त्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर फोन केला असता त्यांनी त्यांचा मोबाईल त्यांचे पती मिलिंद कांबळे यांच्याकडे दिला.


  कांबळे यांना बातमीच्या बदल्यात जाहिराती मिळतील का अशी विचारणा केली असता त्यांनी, मिलिंद यंबल यांच्याकडून तशी व्यवस्था होईल असे सांगितले. तर शहानिशा करण्यासाठी मिलिंद यंबल यांना फोन केला असता, त्यांनी मिलिंद कांबळे याच्याशी बोलून जाहिरात, पैशाची व्यवस्था केली जाईल असे सांगितले. या प्रकरणात शिवसेना उमेदवाराचा काही संबंध आहे का, याबाबत पुन्हा पडताळणी करण्यासाठी मिलिंद कांबळे यांना फोन केला असता, त्यांनी सांगितले की जाहिरातीची व्यवस्था शिवसेनेचे उमेदवार हेमंत पाटील यांच्याकडून होवून जाईल असे सांगून तुम्हाला पैसे मिळून जातील फक्त बातम्या घ्या असे कांबळे यांनी सांगितले. याबाबतची संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग, फोन कॉल रेकॉर्डिंग दिव्य मराठीकडे उपलब्ध आहेत. एकंदरीत एखाद्या उमेदवाराचा प्रचार किंवा प्रतिस्पर्धी उमेदवाराची बदनामी करून त्याचे मानसिक खच्चीकरण करण्यासाठी पैसे देऊन जाहिराती, बातम्या छापून आणण्याचा एक धंदा निवडणुकीदरम्यान सुरू झाला आहे. या धंद्याचा फायदा घेण्यासाठी जाहिरातीचे दर चार पट वाढले असल्याची माहिती आहे. त्यातलाच हा प्रकार असून या प्रकरणाची खातरजमा करून निवडणूक विभागाने कडक कारवाई करणे अपेक्षित आहे.

  मिलिंद यंबल म्हणाले...
  'अपक्ष उमेदवार त्रिशला कांबळे यांच्याशी आपला काही संबंध नाही त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली त्याच्याशी आपला संबंध नाही कुणीही कुणाचेही नाव घेतो त्यामुळे त्याच्यात मी आहे असा अर्थ नाही.'

Trending