हिंगोली / ‘त्या तिघांना सजा द्या’ असे चिठ्ठीत लिहून महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

दोषींवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार
 

प्रतिनिधी

Feb 14,2020 07:59:00 AM IST

हिंगोली - ‘त्या तिघांना सजा द्या, ज्यामुळे यापुढे गावात कोणी गैरकृत्य करणार नाही, माझ्या घरच्यांना काही माहिती नाही. त्यांना त्रास देऊ नका,’ अशी चिठ्ठी लिहून ठेवत सेनगाव तालुक्यातील साखरा येथील एका २८ वर्षीय महिलेने गुरुवारी (ता. १३) दुपारी स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेमुळे सेनगाव तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आता चिठ्ठीत नावे नमूद केलेल्या तिघांची चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.


सेनगाव तालुक्यातील साखरा येथील सरस्वती गजानन आंबटकर (२८) यांनी आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्वतःच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती सेनगाव पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक ए. जी. खान, पोलिस निरीक्षक सरदारसिंह ठाकूर, उपनिरीक्षक बाबूराव जाधव, जमादार कऱ्हाळे, खंदारे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांना घटनास्थळावर एक चिठ्ठी आढळून आली असून त्यात आत्महत्येचे कारणही नमूद केले आहे. गावातील तिघांमुळे आपण आत्महत्या करीत असल्याचे त्यात नमूद केले आहे. ‘त्या तिघांची चौकशी करून त्यांना सजा द्यावी, मरताना माणूस खरे बोलतो तसे मी खरे बोलत आहे, मी माझ्या मनानेच फाशी घेत असून त्या तिघांना सजा व्हावी हीच माझी इच्छा आहे. या शिक्षेमुळे पुन्हा गावात कोणी गैरकृत्य करणार नाही’ असे या चिठ्ठीत नमूद केले आहे. पोलिसांनी सदर चिठ्ठी जप्त केली आहे. या प्रकरणी नीळकंठअप्पा भादलकर यांच्या माहितीवरून सेनगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी आता चिट्ठीत नमूद असलेल्या तिघांची चौकशी करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.

मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबीयांचा नकार


मृत सरस्वती आंबटकर यांच्यावर साखरा येथे उत्तरीय तपासणी करण्यात आली. मात्र त्या तिघांवर कारवाई झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. मृत सरस्वती आंबटकर यांच्या पश्चात पती, दोन मुले, एक मुलगी, सासू, सासरा असा परिवार आहे. त्यांच्या हिवरा साबळे (ता.मेहकर) येथील माहेरची मंडळी व पती सेनगाव पोलिस ठाण्यात रात्री उशिरा ठाण मांडून होते. पोलिस अन‌् त्यांच्यात चर्चा सुरू होती.

X