आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी जिल्हा परिषद प्रभारी सीईओंचा दणका, वेळेवर पोहोचून लेट लतीफांसाठी लावले कुलूप

एका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सकाळी 9:45 ला पोहचून गेट केले बंद, 77 कर्मचाऱ्यांची लेटमस्टरवर घेतली स्वाक्षरी
  • यापुढे 10:15 नंतर पोहोचल्यास कर्मचाऱ्यांचा लागणार हाफ डे -प्रभारी सीईओ

मंगेश शेवाळकर

हिंगोली - राज्य शासनाने पाच दिवसांचा आठवडा केल्यानंतर हुरळून गेलेल्या कर्मचाऱ्यांना हिंगोलीच्या प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिला. मंगळवारी सकाळी 9:45 वाजता मुख्य प्रवेशद्वार बंद करून उशीराने आलेल्या 77 कर्मचाऱ्यांच्या लेट मस्टरवर स्वाक्षऱ्या घेतल्या आहेत. त्यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांमधे चांगलीच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेमधे मागील काही दिवसांपासून अलबेल कारभार सुरु होता. सकाळी कार्यालयात उशीरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी होती. त्यामुळे नागरीकांची कामे खोळंबली जात होती. मात्र त्याकडे तत्कालीन अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले होते. त्यानंतर शासनाने पाच दिवसांचा आठवडा जाहिर केल्यानंतर कामचुकार कर्मचारी मात्र चांगलेच हुरळून गेल्याचे चित्र होते.

तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. एच. पी. तुम्मोड यांची बदली झाल्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी आज रितसर पदभार स्विकारला. पदभार स्विकारताच त्यांनी लेटलतीफ कर्मचाऱ्यांना पहिला दणका दिला आहे. पाच दिवसांच्या आठवड्यानंतर कर्मचाऱ्यांनी आता सकाळी 9 वाजून 45 मिनीटांनी कार्यालयात हजर होणे आवश्‍यक आहे. त्यानुसार किती कर्मचारी वेळेवर येतात याची तपासणी करण्यासाठी खुद्द प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी माळी स्वतःच साडेनऊ वाजता कार्यालयात येऊन थांबले. त्यानंतर 9 वाजून 45 मिनीटापर्यंत आलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कार्यालयात प्रवेश दिला. त्यानंतर कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करून घेतले. नेहमीप्रमाणे अनेक कर्मचारी वेळेच्यानंतर कार्यालयात दाखल होऊ लागले. मात्र प्रवेशद्वारावर कुलुप पाहून कर्मचारी तेथेच थांबले. दहा वाजेपर्यंत सुमारे तीनशे कर्मचाऱ्यांपैकी 77 कर्मचारी अडकून पडले. या सर्व कर्मचाऱ्यांच्या लेट मस्टरवर स्वाक्षऱ्या घेण्यात आल्या असून यापुढे एकही कर्मचारी उशीराने येणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना माळी यांनी दिल्या.

10:15 नंतर येणाऱ्यांचा आता हाफ डे -प्रभारी सीईओ

जिल्हा परिषदेमधे कर्मचारी वेळेवर उपस्थित व्हावे यासाठी हा निर्णय घेतला होता. आज 52 कर्मचारी दहा वाजेपर्यंत कार्यालयात दाखल झाले. त्यांची लेटमस्टरवर स्वाक्षरी घेण्यात आली आहे. तीन वेळेस लेटमस्टरवर स्वाक्षरी झाल्यास एक रजा ग्राह्य धरली जाईल. तसेच सव्वा दहा वाजता कार्यालयात येणाऱ्यांची अर्ध्या दिवसांची रजा नोंदवली जाईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन वेळेत कामावर यावे तसेच कार्यालया बाहेर जातांना हालचाल रजिस्टरवर नोंद करूनच बाहेर जावे.