आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Hiring A Large Team Of State Health Department For The Service Of Warkaris, 24 Hours Free Treatment Through Expert Doctors And Trained Staff

वारकऱ्यांच्या सेवेसाठी राज्याच्या आरोग्य विभागाची मोठी टीम तैनात, तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत 24 तास मोफत उपचार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- आषाढी एकादशी निमित्ताने वेगवेगळ्या ठीकाणावरून निघालेल्या पालखी सोहळ्यामध्ये राज्याच्या आरोग्य विभागाने वारक-यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले आहे. देहू, आळंदी ते पंढरपूर या मार्गावर तज्ञ डॉक्टर आणि प्रशिक्षित कर्मचाऱ्यांमार्फत 24 तास मोफत उपचार सुविधा देण्याबरोबरच पालखी मार्गावर प्रत्येक खासगी रूगणालयातील 10 टक्के खाटा राखीव ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागातर्फे देण्यात आले आहेत.
 

देहू, आळंदी ते पंढरपूर मार्गावरील 23 दिवसांची वारी आणि परतीचा 13 दिवसांचा प्रवास याचा विचार करून वारक-यांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम होऊ नये म्हणून आरोग्य विभाग विशेष लक्ष देत आहे. विभागाने सुमारे साडेतीन हजार अधिकारी व कर्मचाऱ्यांची वारकऱ्यांच्या काळजीसाठी नियुक्ती केली आहे. पालखी व दिंड्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी एक दिवस आधी धूर फवारणी केली जात आहे. पालखी सोहळ्यासोबतच प्रत्येकी 3 रूग्णवाहिका तर अत्यावस्थ रूग्णसेवेसाठी 108 च्या 72 रूग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.

 

पालखी मार्गावर असलेल्या हॉटेल्सची तपासणी करण्यात येत आहे. हॉटेलमधील पाणी, अन्नपदार्थांची स्वच्छता यांची तपासणी केली जात आहे. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर आरोग्यसेवा पुरविणारी 10 ग्रामीण रूग्णालये व 15 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत तर संत तुकाराम महाराज पालखी मार्गावर 9 ग्रामीण रूग्णालये तर 22 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा देण्यासाठी 595 डॉक्टर, 823 परिचारीका, 339 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 871 आरोग्यसेवक सज्ज करण्यात आले आहेत. गर्दीच्या ठिकाणी रूग्णांना ने-आण करण्यासाठी 50 दुचाकी रूग्णवाहिका सेवेत तैनात ठेवण्यात आल्या आहेत. एकाचवेळी 100 रूग्ण दाखल करता येतील अशी व्यवस्था उपजिल्हा रूग्णालयात करण्यात आली आहे. तसेच उपजिल्हा आणि ग्रामीण रूग्णालयांमध्ये सहा खाटांचे अतिदक्षता विभागही सुरू करण्यात आले आहेत. मोबाईल प्रथमोपचाराची तीन पथके असून, त्यात तज्ञ अधिकारी-कर्मचा-यांचा समावेश आहे, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...