आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

व्यक्तिस्वातंत्र्याचा विजय (अग्रलेख)

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधुनिक मूल्ये ही मत आणि व्यक्तिस्वातंत्र्याशी अधिक निगडित असतात. समाज प्रवाही राहण्यासाठी माणूस बंधनातून मुक्त असण्याची गरज असते. मुक्त असणे म्हणजे स्वैराचार नव्हे. मुक्त म्हणजे व्यक्ती-व्यक्ती, व्यक्ती-समाजात सुसंवाद, सलोखा, समता असणे गरजेचे आहे. समाजाच्या वर्तनाला नियंत्रित करण्यासाठी कायद्याची गरज असते. पण कायद्याने माणसाचे जगणे नियंत्रित करणे, त्याच्यावर देखरेख ठेवणे हे आधुनिक मूल्य नव्हे. गेल्या काही दिवसांत सर्वोच्च न्यायालयाने समलैंगिक संबंधांना परवानगी देणारे ३७७ कलम, आधार कार्ड सक्तीचा सरकारचा निर्णय रद्द करून व्यक्तिस्वातंत्र्याला अभिप्रेत असणारे, किंबहुना व्यवस्थेने व्यक्तीचा आदर व त्याचे स्वातंत्र्य राखण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे निर्णय दिले. यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचार हा गुन्हा नाही, असे सांगत घटनेतील ४९७ कलम रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. 

राज्यघटना स्त्री-पुरुष असा भेद करू शकत नाही. असा भेद केल्याने घटनेतीलच व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच होतो. स्त्रीचा स्वत:च्या देहावर, लैंगिकतेवर हक्क आहे व त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड केली जाऊ शकत नाही. स्त्रीने लैंगिक संबंधांबाबत कोणते निर्णय घ्यावे हा तिचा सर्वस्वी अधिकार आहे आणि महत्त्वाचे म्हणजे बायको ही काही नवऱ्याची संपत्ती नाही, नवरा हा काही बायकोचा स्वामी-मालक नाही. लग्नसंबंधात व्यभिचार असेल तर ते घटस्फोटाचे कारण होऊ शकते. पण व्यभिचाराच्या आडून पितृसत्ताक समाजाचे समर्थन केले जाऊ शकत नाही. महिलेला असमानतेची वागणूक देता येणार नाही, पावित्र्य हे फक्त स्त्रीला लागू नाही, तर पुरुषांनाही लागू होते, अशा स्पष्ट शब्दांत सर्वोच्च न्यायालयाने व्यभिचारावर आपली टिप्पणी दिली. व्यभिचारात फक्त पुरुषाला दोषी धरता येणार नाही, त्यात स्त्रीही दोषी असते, असे स्पष्ट करत न्यायालयाने कायद्यापुढे सर्व समान आहेत, कायदा स्त्री-पुरुष असे पाहू शकत नाही, असेही स्पष्ट केले. खासगी जीवनात जे काही घडते त्याला गुन्ह्याचे चष्मे लावून पाहता येणार नाही. व्यक्तीचे खासगी आयुष्य त्याला जगू देणे हे अधिक न्यायसुसंगत आहे, हा एकूण निकालाचा अर्थ म्हणता येईल. 


व्यभिचाराचा कायदा १५८ वर्षे जुना होता. त्या वेळची असमानता मानणारी बुरसटलेली सामाजिक मूल्ये व पितृसत्ताक समाजाच्या प्रभावामुळे ब्रिटिशांनी हा कायदा बनवला होता. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही या कायद्यावर चर्चा झाल्या होत्या, पण व्यभिचार हे पुरुषांकडूनच होतात, या मतावर न्यायालये ठाम होती. व्यभिचार हे पावित्र्याच्या दृष्टिकोनातून पाहिल्याने असे 'अपवित्र काम' हे फक्त पुरुषच करतात, ते स्त्री करू शकत नाही, या गृहितकाने तर हा विषय सोडवण्यात अडथळे आले होते. व्यभिचार हा स्त्री-पुरुषांच्या सहमतीने होतो. स्त्रीची लैंगिक संबंधांना संमती नसेल तर तो बलात्कार ठरू शकतो, इतका साधा फरक असताना कायदाच विसंगती दर्शवत होता. दुसरीकडे समाजातील दांभिकताही याला कारणीभूत होती. व्यभिचार करणारे जोडपे असेल तर कायद्याने शिक्षा महिलेऐवजी पुरुषाला, असा कायद्याचा भेदभाव होता. तर समाजाचा, कुटुंबाचा रोष मात्र स्त्रीला सोसावा लागत होता. अशा स्त्रीची हेटाळणी, निंदानालस्ती, अपमान करणे समाजाला सोपे होते. या गुंतागुंतीत स्त्री-पुरुष विवाहबाह्य संबंध ठेवण्यासाठी का उद्युक्त होतात, या मूळ मुद्द्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात होते. 


विवाह संबंधात जोडप्यांमध्ये अनेक मुद्द्यांवरून विसंवाद, ताणतणाव असतात. त्यात लैंगिक घुसमट, नपुसंकत्वासारखेही प्रश्न असतात. त्यात आपल्या समाजाची अशी अपेक्षा असते की, लग्न टिकवण्याची जबाबदारी स्त्रीनेच घेतली पाहिजे. स्त्रीची कुटुंबात कितीही मानसिक-शारीरिक घुसमट होत असली तरी तिने कुटुंब टिकवण्यासाठी स्वत:च्या जगण्यावर बंधने घातली पाहिजेत. तिने मुक्त, स्वच्छंदी, स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार सोडला पाहिजे. समाजाच्या अशा अपेक्षा काळानुरूप कायम कशा राहतील? आपल्या समाजात एकेकाळी घटस्फोटाकडे नकारात्मक नजरेतून पाहिले जात असे. आता अशी परिस्थिती राहिलेली नाही. 


आताचे समाजशास्त्रज्ञ घटस्फोटांचे प्रमाण वाढण्याचा अर्थ तो समाज प्रगल्भतेकडे, व्यक्तिस्वातंत्र्याकडे झुकत असल्याचे मानतात. युरोपीय, अमेरिकेत घटस्फोट सामाजिक प्रश्न समजला जात नाही, ती एक समाजरीत झाली आहे. विवाह केला म्हणून नकोसे झालेले, घुसमट होत असलेले नातेसंबंध सांभाळत एकाच व्यक्तीसोबत आयुष्यभर अडकून राहणे तेथील समाजाला पटेनासे झाले आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, औद्योगिकीकरणामुळे आपल्या समाजामध्ये हे बदल होत राहतील. ते स्वीकारावे लागतील. म्हणून न्यायालयाने व्यभिचाराचा कायदा रद्द केल्याने मानवी नात्यांमध्ये अधिक पारदर्शकता येत जाईल व ती समाजाच्या निकोप वाढीसाठी आवश्यक आहे. 

 

 

बातम्या आणखी आहेत...