आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा हजार एकरवरील द्राक्षांना फटका; डाऊनी वेडूने बागायतदार धास्तावले

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना : कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाच्या चक्रव्यूहाला भेदत कसेबसे सावरलेल्या द्राक्ष बागांवर अचानक परतीच्या पावसाचे संकट अाले आहे. अति प्रमाणात पाऊस झाल्याने द्राक्ष निर्मितीसाठी अन्न जाण्या-येण्याची प्रक्रिया थांबल्याने ओलांड्याला मुळ्या फुटल्याने जालना जिल्ह्यातील ६ हजार एकरवरील द्राक्ष उत्पादक बागायतदारांना उत्पन्नातून ६० टक्क्यांवर फटका बसला आहे. द्राक्ष बागांवर आता डाऊनीचा प्रादुर्भाव वाढल्याने द्राक्ष बागायतदार धास्तावले आहेत.


जिल्ह्यात सध्या सहा हजार एकरवर द्राक्ष बागा आहेत. एप्रिलपासून शेतकऱ्यांनी त्याचे नियाेजन केले होते. छाटणीपासून ते घडनिर्मिती ऑक्टोबरला गोळी छाटणीची वेळ होती. मात्र, सतत दहा ते बारा दिवसांच्या परतीच्या पावसाने द्राक्ष उत्पादकांना चांगलाच फटका दिला अाहे. एकूण द्राक्ष उत्पादनाला सध्या ६० टक्के फटका बसला आहे. राज्यातील द्राक्ष उत्पादनाचे भांडार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहरापासून १२ किलोमीटरवरील कडवंचीत पाण्याचा ताळेबंद बांधून ऐन दुष्काळातही शेतकऱ्यांनी शेकडो एकर जमीन ओलिताखाली आणली आहे. या परिसरात जवळपास ९०० एकर क्षेत्रावर द्राक्षांची लागवड केली आहे. २०१२ मध्ये साडेतीनशे, २०१३ मध्ये अडीचशे एकर आणि त्यानंतर २०१९ मध्ये ६ हजार एकरावर द्राक्ष उत्पादन केले जाते. बागांची छाटणी झाल्यानंतर पुढील दीडशे दिवस शेतकऱ्यांना काळजी घ्यावी लागते. यंदा मात्र, छाटणीनंतर घड निर्मितीची प्रक्रिया सुरू असतानाच त्यावर परतीच्या पावसाचे पाणी फेरले गेले. ज्या बागेत ४० घड निर्मिती अपेक्षित अाहे तेथे केवळ १५ ते १७ घडांची निर्मिती होणार असल्याचे मत तज्ज्ञ शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे. पुढील काही दिवस असेच वातावरण राहिल्यास हाती येणाऱ्या ४० टक्के उत्पन्नातही घट होण्याची शक्यता आहे. ज्यांनी उशिराने छाटणी करण्याचे नियोजन केले त्यांना पुढील उत्पादनाची संधी असल्याचे जिल्हा कृषि अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांनी सांगितले.

उत्पादनात होणार घट
मागील पाच वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. कडवंची येथील शेतकऱ्यांनी २०१२ मध्ये १२ कोटी रुपयांचे उत्पन्न घेतले होते. २०१३ मध्ये गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे यामध्ये ५० टक्क्यांनी घट झाली होती. मागील वर्षीही गारपिटीचा मोठा फटका बसला होता. या वर्षीही ३० ते ४० कोटींचे उत्पन्न उत्पादकांना अपेक्षित होते. मात्र, परतीच्या पावसामुळे उत्पन्नात माेठी घट हाेणार अाहे.

१,७०,००० पर्यंतचा एकरी खर्च
६००० एकर जिल्ह्यात एकूण क्षेत्र
६० टक्क्यांवर झाले नुकसान
१०० कोटीं रुपयांची होते उलाढाल
४० घड येतात एका वे
लाला

अन्न जाण्या-येण्याची प्रक्रियाच थांबली
छाटणीनंतर झायलम आणि फ्लोयम या दोन मुख्य घटकातून अन्न निर्मितीची प्रक्रिया सुरू होऊन पुढे द्राक्ष निर्मितीला बळ मिळून उत्तम गुणवत्तेचे घड तयार होतात. मात्र, सततच्या पावसामुळे द्राक्ष बागांमध्ये मोठ्या प्रमाणात ओलावा निर्माण झाल्याने झाडाची मुळे जळाली असून ओलांड्याला अतिरिक्त मुळ्या फुटल्या आहेत. परिणामी अन्न जाण्या येण्याची प्रक्रिया थांबली आहे. यामुळे ज्या ठिकाणी ४० द्राक्षांचे घड निर्माण हाेणे अपेक्षित असताना तेथे केवळ १५ घड येतील, असा अंदाज आहे. चंद्रकांत क्षीरसागर, द्राक्ष उत्पादक शेतकरी, कडवंची

शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांनी पाण्याचे तसेच छाटणीचे नियोजन करून आॅक्टोबरपर्यंत द्राक्ष बागा जगवल्या. सरासरी एकरी १ लाख ६० हजार रुपयांचा आतापर्यंतचा खर्चही झाला. ऐन घड लागण्याची वेळ आल्यावर पावसाने फटका दिला. जिल्ह्यातील ६ हजार एकरवरील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्नाच्या ६० टक्के उत्पन्न घटणार अाहे. अतूल लड्डा, मराठवाडा विभागीय सदस्य, महाराष्ट्र द्राक्ष बागायतदार संघ

हंगामात पावसाचा फटका
नाव्हा सर्कलमधील १५ गावांत ४ हजार एकरवर घड निर्मिती कमी झाली. ज्याची छाटणी केली ती पावसाने घडी गळाली. ज्या बागा फुलोऱ्यात होत्या त्याची गळ तसेच कुज झाली. ६० टक्के नुकसान झाले आहे. मुख्य हंगामात पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दत्तात्रय चव्हाण, शेतकरी, नंदापूर
 

बातम्या आणखी आहेत...