आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'देशात हिटलरशाहीच', मराठी साहित्य संमेलनात आलेल्या मान्यवरांनी व्यक्त केली आपली मते

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद : संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी आपल्या भाषणातून देशातील सद्य:स्थितीबाबत भाष्य केले. मुलांवर दंडुके चालवणे सहन केले जाणार नाही, असे दिब्रिटो म्हणाले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मुस्कटदाबी याविषयी ते बोलले. त्यावर देशात हिटलरशाही आहे का ? यावर संमेलनासाठी आलेल्या साहित्यिकांंनी व्यक्त केलेली मते...

ना. धों. महानोर ज्येष्ठ कवी : जिथे प्रगल्भांनाच देशद्रोही ठरवले जात असेल तिथे दुसरी काय अपेक्षा..?

एकमुखी अहंता, आणीबाणीची स्थिती निर्माण केली जात आहे. मंत्रिमंडळ आणि सर्व लोकांना एकत्र घेऊन राज्यकारभार हाकायचा असतो. मी एकटाच आणि मी म्हणेल तेच प्रमाण. नेहरूंसारखे लोक राम मनोहर लोहिया आणि एस. एम. जोशी यांचे चार-चार तास बसून भाषण ऐकून निर्णय घेत होते. आपण करत आहोत ते चुकीचे आहे…? हे तपासण्याची त्यांची पद्धत होती. तुम्हाला कायदे निर्माण करायचे असेल तर करा ना, पण लोकांचे मत घ्यायला पाहिजे. तुमच्या स्पर्धक राजकारण्यांचे मत नका घेऊ विचारात, पण समाजातील विचारवंतांचे काय मत आहे ते तर विचारता की नाही..? महात्मा गांधी विचारांनी परिपूर्ण होते तरीही त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्याशी सल्लामसलत केली. सृजनशील लोकांचे मत घ्यायला पाहिजे. अटलबिहारी वाजपेयी यांनीही लोकांचे मते लक्षात घेऊनच निर्णय घेतले. पण सध्याचे राजकारणी प्रगल्भ लोकांनाच देशद्रोही म्हणून जाहीर करत आहेत. कुरूपता हटवून सुरूपता आणणे राज्यकर्त्यांचे काम असते. पण दुर्दैवाने आत्ताच्या राजकारण्यांना याचा विसर पडला आहे.

नागनाथ कोत्तापल्ले, माजी संमेलनाध्यक्ष : 'हुकूमशाही, हिटलरशाही आहे' 

यासंदर्भात ज्येष्ठ साहित्यिक व माजी संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, देशात सध्या हुकूमशाही, हिटलरशाहीप्रमाणे वातावरण आहे.

इंद्रजित भालेराव, कवी : देशात भयावह वातावरण आहेच, साहित्यिकांच्या बोलण्यावर बंधने

अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचे भाषण ऐकता आले नाही. ते वृत्तपत्रामधून वाचले. देशात तसेच भयावह वातावरण आहे. मोदी यांचा स्वभावच तो आहे. पक्षातही त्यांची भूमिका हीच आहे. हुकूमशहाच्या हातात सत्ता गेल्यानंतर अशीच परिस्थिती उद्भवते. साहित्यिकांच्या बोलण्यावर बंधने घातली जात आहेत. नेहरूंच्या काळात स्थापन करण्यात आलेल्या संगीत अकादमी, नाटक अकादमी व साहित्य अकादमीसारख्या संस्था त्यांनी मोडीत काढल्या. हे जरी मानव संसाधन मंत्रालयाने केले असले तरी मोदींना माहीत नसेल असे नाही. उलट महाराष्ट्रात त्यांचेच सरकार असताना फडणवीस सरकारने साहित्य संस्कृती मंडळाला बळ देण्याचे काम केले होते.

संजय चाैधरी, कवी : अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकाेच अाहेच, लिहू की नको अशी भीती वाटते

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकाेच अाहेच. संमेलनाध्यक्ष दिब्रिटाे यांचे विचार देशातील सद्य:स्थितीला धरूनच हाेतेे. ते बंधुभाव सांगत हाेते. कारण सध्या देशात विचार स्वातंत्र्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा संकाेच हाेत अाहे. मी लिहू की नकाे, लिहिलं तर काय हाेईल अशी भीती वाटू लागली अाहे. ज्यांच्याकडून हे केलं जातंय त्यांनी अापल्या शक्तींचा गैरवापर करता कामा नये. जाती-किंवा धर्माच्या अाधारे तणाव निर्माण करणार असाल तर ते मानवतावादी असूच शकत नाहीत. विचार व्यक्त करायच्या प्रक्रियेलाच पायबंद काेणी घालत असेल तर अयाेग्यच अाहे. अापला देश धर्म-जाती-पंथावरच चालणारा अाहे. हेच भाषणांमधून व्यक्त हाेतं अाहे.

बातम्या आणखी आहेत...