Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | Hitting due to Extramarital affair

विवाहबाह्य संबंध, कथित प्रेयसीच्या घरात रंगेहाथ पकडल्याने पतीसह कथित प्रेयसीला बेदम मारहाण

प्रतिनिधी | Update - Dec 29, 2018, 11:09 AM IST

गोरक्षनगर परिसरात हा प्रकार

  • Hitting due to Extramarital affair

    पंचवटी- विधवा महिलेशी प्रेमसंबंध एका विवाहित पुरुषाला चांगलेच महागात पडले. विवाहित तरुणाच्या आई-वडिलांसह त्याच्या पत्नीने पाठलाग करत पतीला त्याच्या कथित प्रेयसीच्या घरात रंगेहाथ पकडल्याने दोघांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये पीडित प्रेयसी गंभीर जखमी झाली. गोरक्षनगर परिसरात हा प्रकार घडला. म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित विधवा युवतीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार, मुलीचे लग्न झाले आहे. तिला एक मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी तिच्या पतीचे अकस्मात निधन झाले. तेव्हापासून ती एकटी राहते. पीओपी कारागीर जहीर शेख याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. गुरुवारी दुपारी ३ वाजता मुलगी आणि जहीर दोघे घरात असताना संशयित अर्शद हजीज शेख, जमिल वकील शेख, जुबेर जमिल शेख, अजिम अजिज शेख, हाजरा जहीर शेख, सायरून जमिल शेख (सर्व रा. खोडेनगर, वडाळारोड) यांनी घरात घुसून मुलीस 'जहीरला का नादाला लावले. त्याला वारंवार घरी बोलावून का घेतेस', असे म्हणत लोखंडी रॉडने मारहाण केली. जहीरने सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही बेदम मारहाण करत घरातील साहित्याची तोडफोड केली. संशयितांच्या विरोधात मारहाण, शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक आयुक्त मोहन ठाकूर, वरिष्ठ निरीक्षक सुनिल रोहकले यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. चार संशयितांना अटक करण्यात आली आहे.

Trending