आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमित कर्ण
मुंबई : बॉलीवूड चित्रपट 'सुपर ३०' संदर्भात सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. या विषयामध्ये हॉलीवूडवाल्यांनी रस दाखवला आहे. ते या चित्रपटाचा इंग्रजी रिमेक बनवण्याची तयारी करत आहेत. सिंगापूर आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना हॉलीवूडचे एजंट आणि याची निर्मिती करणारी कंपनी रिलायन्स एंटरटेनमेंटचे सीईओ शिवाशिष सरकार यांच्यात या चित्रपटाच्या हॉलीवूड रिमेकबाबत खास बैठक झाली. या वृत्तास रिलायन्स एंटरटेनमेंट कंपनीमधील उच्चपदस्थ सूत्रांनी दुजोरा दिला आहे.
सूत्रांनी सांगितले की, 'सुपर ३०'च्या शिक्षणावर आधारित विषयाचे जागतिक स्तरावर कौतुक करण्यात आले आहे. ते पाहता विदेशातील बड्या निर्मात्यांनाही हा विषय जवळचा वाटत आहे. हा विषय पाश्चात्त्य देशांमध्येही उचलून धरला जाण्याची शक्यता आहे. परिणामी हॉलीवूडचे निर्माते आणि एजंट या चित्रपटाच्या निर्मात्यांच्या लागोपाठ संपर्कात आहेत.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली असता हॉलीवूड रिमेकसाठी तेथील एका प्रसिद्ध दिग्दर्शकाची निवड केली जात असल्याचे कळले. चित्रपटात आनंद कुमार यांचे पात्र कोण साकारेल, हे दिग्दर्शकाची निवड झाल्यावरच निश्चित केले जाईल. संजीव दत्ता यांनी लिहिलेली स्क्रिप्ट, स्क्रीनप्लेचेही पुनर्लेखन आपल्या देशातील प्रेक्षकांची संवेदनशीलता लक्षात घेऊन केले जाणार आहे. तेथील एजंटांसोबत रिलायन्स एंटरटेनमेंटच्या आगामी बैठकीत याच्या अधिकारांवर चर्चा होईल. त्यात रिलायन्सशिवाय आनंद कुमारही सहभागी होतील. या रिमेकची घोषणा अमेरिकेतून केली जाईल. या वृत्तासंदर्भात रिलायन्स एंटरटेनमेंटचे सीईओ शिवाशिष सरकार यांच्याशीही संपर्क करण्याचा प्रयत्न सुरू आहे. वृत्त लिहीपर्यंत त्यांच्याकडून उत्तर यायचे बाकी होते.
दिग्दर्शक नीरज पांडेयचा चित्रपट 'अ वेडनसडे'चा इंग्रजी रिमेक 'अ कॉमन मॅन' या नावाने बनला आहे. तसेच काही निवडक चित्रपटांची कल्पना चोरूनही हॉलीवूडवाल्यांनी त्यांचा वापर केला आहे. मात्र, नियमानुसार अधिकारांचा करार करत हॉलीवूडची एक मोठी कंपनी हा रिमेक बनवत असल्याने ही हिंदी सिनेमासाठी अभूतपूर्व बाब ठरेल.
वृत्त ऐकून हृतिकही झाला खुश
या वृत्ताबाबत आम्ही हृतिकसोबत चर्चा केली असता हे एेकून त्याला खूप आनंद झाला आहे. त्याने आश्चर्याने सांगितले की, 'ही तर खूप मोठी बातमी आहे. जर असे काही होत असेल तर हे आपल्या चित्रपटसृष्टीसाठी मोठी उपलब्धी ठरेल. तसेच चित्रपटाची कथा आणि आनंद सरांचे पात्र किती वैश्विक आणि प्रेरणादायी आहे, याची खात्री यामुळे पटत आहे.'
चिनी व्हर्जन पूर्ण, जपानी आणि अरबी भाषेतही होणार रिलीज
चित्रपटाच्या चिनी व्हर्जनच्या एडिटिंगचे काम तर पूर्ण झाले आहे. तसेच हा चित्रपट जपानी आणि अरबी व्हर्जनसाठीही तयार केला जात आहे. तेथील प्रमुख भागांमध्येही हा चित्रपट नव्या वर्षामध्ये रिलीज केला जाईल. चीनमधून चार वितरकांनी यामध्ये रस दाखवला आहे. या ठिकाणी मार्च-एप्रिलदरम्यान रिलीज केला जाईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.