आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पक्षाध्यक्षांसमोर पंकजांचे ‘शक्ति’प्रदर्शन; भगवे झेंडे, गोपीनाथ मुंडेंची प्रतिमा आणि ‘पंकजांना मुख्यमंत्री करा’चे फलक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पाटोदा सावरगावच्या भगवान भक्तिगडावर दसरा मेळावा
  • गृहमंत्री अमित शहांचे 370 राष्ट्रध्वज दाखवून स्वागत

महेश रामदासी/महेश जोशी 

सावरगाव (जि. बीड) - केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव (ता.पाटोदा) येथे जोरदार शक्तिप्रदर्शन केले. खुद्द अमित शहांनी हे राजकीय व्यासपीठ नसल्याचे सांगतानाच ३७० चा मुद्दा घराघरात पोहोचवा, असा मंत्र दिला. 

२०१४ च्या निवडणुकीनंतर “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’ असे जाहीर वक्तव्य करून पंकजा मुंडे यांनी स्वत:ची अडचण करून घेतली होती. त्यांच्यातील ही महत्त्वाकांक्षा लक्षात आल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी गेल्या ४-५ वर्षांत पंकजांचे पक्षात खच्चीकरण केल्याची भावना मुंडे समर्थकांत  आहे. मात्र, आता निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडे व मुख्यमंत्री यांच्यातील दुरावा कमी होऊन फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील, असे पंकजा यांनी अनेकदा जाहीर कार्यक्रमात सांगितले. मात्र, मुंडे समर्थकांचे त्यावर समाधान झालेले दिसत नाहीय. भगवान भक्तिगड सावरगाव येथे मंगळवारी विजयादशमी निमित्त आयोजित मेळाव्यात त्याची प्रचिती आली.

मेळाव्यासाठी आलेले समर्थक पंकजाताईंना मुख्यमंत्री करा, असे फलक झळकवतच मेळाव्याच्या ठिकाणी आले. याची काहीशी भनक लागल्यामुळे पंकजा मुंडेंनी भाषणात कार्यकर्त्यांना संयमाचा सल्ला दिला होता. मात्र, तो धुडकावत मुंडे समर्थकांनी पक्षाध्यक्ष अमित शहा भाषण करतेवेळी आपल्या मनातील इच्छा जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्यासमोर आक्रमकपणे व्यक्त केली.

प्रचारात ३७० प्रमुख मुद्दा : प्रचारात ३७० कलम हा प्रचाराचा एक मुद्दा असेल, असे फडणवीसांसह भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी अनेकदा सांगितले होते. मात्र, मंगळवारच्या मेळाव्यात शहांनी ३७० चे यश घरोघरी पोहोचवण्याचा संदेश देऊन प्रचारात हाच प्रमुख मुद्दा असल्याचे संकेत दिले.

पंकजा म्हणाल्या : जनतेच्या मतांवर नाही, तर मनावर राज्य करायचं आहे

नेतृत्वाने माझ्या कामासाठी माझं कौतुक केलं यापेक्षा अधिक काही नको. आजची गर्दी भविष्याची दिशा बदलेल. मोदी, शहांनी कलम ३७० रद्द करून ऐतिहासिक निर्णय घेतला. ऊसतोड कामगारांच्या हातातील कोयता पुढील ५ वर्षांत गळून पडेल. आम्ही ऊसतोड कामगारांसाठी महामंडळ सुरू केले. जनतेच्या मतांवर नाही, मनावर राज्य करायचं आहे. भगवान भक्तांशी असलेलं नातं तुटणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

‘सब अपनेही लाेग है’ 

“सीएम सीएम’ असा घोष करत पंकजांचे कार्यकर्ते बॅरिकेड्स तोडून मंचापुढे धावत होते. मात्र गोंधळ वाढताच जवान त्यांना रोखण्यासाठी सरसावले. मात्र, व्यासपीठावरून हस्तक्षेप करत “सब अपनेही लाेग है’ असे  म्हणत जवानांना थांबवले. अमित शहा ज्या-ज्या वेळी पंकजांचे नाव घेत होते, त्या त्या वेळी समर्थक सीएम सीएम अशा घोषणा देत होते.

अमित शहा म्हणाले : भगवानबाबांनी आयुष्यभर वंचित, ओबीसी समाजाला शिक्षणाचा मार्ग दाखवला. मोदी सरकारही त्यांच्याच विचारांवर चालत आहे. फडणवीस सरकारनेही राज्यात पहिल्यांदाच ओबीसी मंत्रालय सुरू केले. गोपीनाथ मुंडेंनी ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात बदल घडवला. पंकजाही त्याच मार्गावर चालत आहे. मी ५ वर्षांपूर्वी दसरा मेळाव्यासाठी भगवान गडावर आलो होतो. आता त्याच दिवशी भगवान भक्तिगडावर येण्याचे भाग्य मला लाभले. या ठिकाणी पंकजा यांनी उभारलेले भगवानबाबांचे स्मारक शतकांपर्यंत प्रेरणा देत राहील.