आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गम गावात महिलांनी स्वयंसहायता गट स्थापन करून विकसित केला मधाचा प्रसिद्ध ‘नॅचरल हनी’ ब्रँड!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - “मालगुडी डेज’ म्हटले की आठवतात आर. के. नारायण. आता नक्षलवादाने विकास खुंटलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील “मालडुगी’ हे गाव प्रकाशझोतात आले आहे. या नक्षलवादामुळे खुंटलेल्या विकासाच्या वाटा नव्याने बांधण्याचे काम “मालडुगी’ केले आहे. आरती राधेश्याम उईके, हेमकांता राऊत व रत्नमाला मडावी या गावातील तीन महिलांनी मधाचा विशेष ब्रँड विकसित केला असून या मधाला राज्यातून प्रचंड मागणी आहे.

 


मालडुगी हे ९२४ लोकवस्तीचे गाव. प्रामुख्याने भातशेती हेच उदरनिर्वाहाचे साधन. रोजगार वा नोकरीच्या संधीचा अभाव तसेच तुटीच्या पावसामुळे या भागात उत्पन्न कमी होते. त्यामुळे लोकांना रोजच जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. पण, आरती राधेश्याम उईकेसह इतर महिलांनी पुढाकार घेऊन सुरू केलेल्या उद्योगामुळे गावात अच्छे दिन आले आहेत. त्यांना मुख्यमंत्री ग्रामीण विकास निधीचे (सीएमआरडीएफ) बळ मिळाले. सीएमआरडीएफ हा “महाराष्ट्र व्हिलेज साेशल ट्रान्सफाॅर्मेशन फाऊंडेशन’चा (एमव्हीएसटीएफ) एक भाग आहे.

 

“सीएमआरडीएफ’  अंतर्गत सरकारने राज्यातील १ हजार खेडी विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. “एमव्हीएसटीएफ’ ने लोकसहभाग व खासगी सहभागातून (पीपीपी) ग्रामीण विकासाची अनेक माॅडेल्स विकसित केली आहेत. सरकार व कार्पोरेट जगताशी समन्वय साधून ग्रामीण भागाच्या विकासाचे कार्यक्रम अाखले जातात. तेथील प्रतिभा हेरून त्यांना प्रोत्साहित केले जाते. श्याम वरवेंची मागील वर्षी “मालडुगी’साठी नेमणूक झाली. ६ महिन्यांत वरवेंनी परिसराचे बेसलाइन सर्वेक्षण केले. भौगोलिक विविधता व ग्रामस्थांची मानसिकता जाणून घेतली. दरम्यान महिला मध गोळा करून विक्री थेट व्यापाऱ्यांना करीत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर वरवेंनी महिलांना एकत्र करून संघटित व्यवसायासाठी प्रेरित केले.  नोव्हेंबर २०१८ मध्ये या महिलांचा स्वयंसहायता गट स्थापन केला. परिसरातील िवपुल मध पाहता मध प्रक्रिया युनिट स्थापन केले.   

 


“नॅचरल हनी’ ब्रँड नेम : या स्वयंसहायता गटातर्फे निर्मित मधाला “नॅचरल हनी’ असे ब्रँड नेम देण्यात आले. एमव्हीएसटीएफने यासाठी २ लाखांचा पुरवठा केला. उडान महिला गामविकास संघातर्फे बाजारात “नॅचरल हनी’ची िवक्री करण्यात येते. आरती उईके संघाच्या अध्यक्ष आहेत. यात कुठलेही केमिकल्स नाहीत. महिलांनी उत्पादक कंपनीही स्थापन केली.  या उडान महिला गामविकास संघात सुमारे २० महिला सदस्य आहेत. या सदस्यांनी मिळून १९ हजाराची गुंतवणूक केली. प्रत्येक सदस्य महिन्याला ४ हजार रुपये कमावतो. 

 

 

१ टन मधसाठा, १.१५ लाखांचा नफा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणत: १ हजार किलो कच्चाा मध गोळा करून त्यावर प्रक्रिया केली जाते. या विक्रीतून सुमारे १ लाख १५ हजारांचा नफा झाला. हा नफा सर्व सदस्यांत वाटून घेतला जातो. मालडुगीचे सरपंच यशवंत चौरीकर यांनी अशा उपक्रमांमुळे स्थलांतर थांबण्यास मदत होईल, असे सांगितले. ग्रामीण भागातसुद्धा जीवनस्तर उंचावता येऊ शकतो हे या उपक्रमामुळे दिसून आले, असे ते म्हणाले.