आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑनर किलिंग : बहीण व तिच्या प्रियकराचा गळा चिरणाऱ्या एका भावाला फाशी, तर दुसऱ्याला जन्मठेप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - भाेकर तालुक्यातील मौ.थेरबन येथील दुहेरी हत्याकांडात भाेकरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने कठाेर शिक्षा सुनावली. प्रियकरासाेबत पळून गेलेली बहीण आणि तिच्या प्रियकराचा गळा चिरून खून करणाऱ्या दाेघा भावांपैकी एकाला फाशीची तर दुसऱ्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी गुरुवारी आरोपी दिगंबर बाबूराव दासरे याला फाशीची तर मोहन नागोराव दासरे यास जन्मठेपेची शिक्षा सुनावली. खोट्या प्रतिष्ठेपायी या दोन भावांनी बहीण व तिच्या प्रियकराला संपवल्याने या खटल्याच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. 


मौ.थेरबन येथील पूजा दासरे हिचे गावातीलच दलित समाजातील फोटोग्राफर गोविंद कऱ्हाळे या युवकासोबत प्रेमसंबंध होते. याची माहिती तिच्या कुटुंबीयांना होती. परंतु सामाजिक बदनामी होईल या भीतीपोटी कुटुंबीयांनी भोकर येथील जेठ्ठीबा वर्षेवार या तरुणा सोबत १ जून २०१७ रोजी पूजाचे लग्न लावले. परंतु तिचे मन पतीच्या घरी लागत नसल्याने तिने २२ जुलै २०१७ रोजी पहाटे ५:१५ वाजता पतीचे घर सोडले. सासरच्यांनी तिचा शोध घेतला. परंतु ती न मिळाल्याने पती जेठीबा वर्षेवार यांनी ती हरवल्याची तक्रार भोकर ठाण्यात दिली. ही माहिती तिच्या माहेरच्यांना समजल्याने त्यांनीही शोध घेतला असता पूजा ही तिचा प्रियकर गोविंद कऱ्हाळेसोबत खरबळा ता.मुधोळ (तेलंगणा राज्य) येथे गोविंदच्या बहिणीच्या घरी असल्याचे समजले. लग्नानंतरही पूजाचे गोविंदवर प्रेम असल्याचे व ती त्याच्यासोबत पळून गेल्याने सामाजिक बदनामी झाल्याचा राग तिच्या कुटुंबीयांना आला. त्यामुळे पूजाचा भाऊ दिगंबर दासरे याने माेबाइलवरून गोविंद कऱ्हाळेशी संपर्क साधून पूजा त्याच्या सोबत असल्याची खात्री केली.


असा काटा काढला : दिगंबर दासरे व त्याचा चुलत भाऊ मोहन दासरे हे दोघे २३ जुलै २०१७ रोजी सकाळी खरबळा येथे गेले. त्यांनी पूजास घरी येण्याची विनंती केली. परंतु तिने गोविंदला सोडून येण्यास नकार दिला. दिगंबर दासरेने पूजा व गोविंदचे लग्न बासर येथे लाऊन देतो म्हणून थाप मारली. तसेच मोटारसायकलवरून पूजा व गोविंद यांना २३ जुलै रोजी सकाळी १०:३० च्या दरम्यान भोकर तालुक्यातील दिवशी बु.शिवारात आणले. येथे आणल्यावर दिगंबर दासरेने पूजास गोविंदला सोडून दे व पतीच्या घरी जा म्हणून विनंती केली. परंतु तिने पुन्हा नकार दिला. राग अनावर झाल्याने दिगंबर दासरे याने लपवून आणलेला धारदार विळा काढला व सकाळी ११ वाजताच्या दरम्यान त्या विळ्याने गोविंदचा गळा चिरला. यावेळी पूजाने त्यास अडवण्याचा प्रयत्न करताच तिचाही गळा चिरला. या प्रहारात गोविंद कऱ्हाळेचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी अवस्थेत मदत मागण्यासाठी रस्त्यावर आलेल्या पूजाचाही थोड्या वेळाने मृत्यू झाला. यानंतर दिगंबर दासरेने दुपारी १२ वाजताच्या दरम्यान भोकर पोलिस ठाण्यात आत्मसमर्पण करत दोघांचा खून केल्याची कबुली दिली.
 

 

आठ साक्षीदार तपासले

खून प्रकरणी आरोपी दिगंबर दासरे, मोहन दासरे यांच्या विरोधात भोकर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. खुनाचा तपास फाैजदार सुशीलकुमार चव्हाण यांनी केला. सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी न्यायालयाने एकूण ८ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. या वेळी सरकारी वकील अॅड. रमेश राजूरकर व आरोपीचे वकील अॅड. मोहन जाधव यांनी बाजू मांडली. जिल्हा न्यायाधीश मुजीब एस.शेख यांनी दिगंबर दासरे यास मरेपर्यंत फाशी व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा तर मोहन दासरे यास जन्मठेप व ११ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.