Maharashtra Crime / चंद्रपुरात 'सैराट'ची पुन्नरावृत्ती, मुलीचे वडील आणि भावाने तरूणाची हत्या करून जंगलात फेकले

 बारामतीमध्ये आज आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपुरातून अजून एक अशीच घटना घडली

दिव्य मराठी वेब टीम

May 14,2019 04:56:00 PM IST

चंद्रपूर- आंतरजातीय विवाह किंवा प्रेमप्रकरणांमधून हत्या होण्याचे प्रमाण सध्या प्रचंड प्रमाणात वाढले आहे. बारामतीमध्ये आज आईनेच पोटच्या मुलीची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच चंद्रपुरातून अजून एक अशीच घटना समोर आली आहे. मुलीचे वडील आणि भावाने मिळून मुलीच्या प्रियकराला बेदम मारहाण करत ठार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. घटना चंद्रपूरातील घुग्गुस येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. योगेश जाधव(23) असे मृत मुलाचे नाव आहे. या घटनेतील आरोपींनी हत्या केल्यावर स्वत:पोलिसांत जाऊन आपला गुन्हा कबूल केला आहे.

चंद्रपूरमधील घुग्गुस येथे राहणाऱ्या योगेश जाधवचे त्याच्याच परिसरात राहणाऱ्या एका मुलीसोबत प्रेमसंबध होते. ही गोष्ट मुलीच्या घरी समजताच घरच्यांनी त्याला विरोध करत योगेशला बेदम मारहाण केली आणि यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर आरोपींनी स्वत: पोलिसांत जाऊन खून केल्याची कबुली दिली. प्रभुदास धुर्वे आणि भाऊ कृष्णा धुर्वे अशी आरोपींची नावे आहेत.


चंद्रपुरात 12 मे रोजी घुग्गुस येथील वॉर्ड क्रमांक 2 मधील ट्रॅक्टर मालक प्रभुदास धुर्वे आणि मुलगा कृष्टा धुर्वे या दोघांनी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन घडलेल्या गोष्टीची माहिती दिली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे "माझ्या मुलीला एक मुलगा त्रास देत होता. म्हणून आम्ही त्याला मारहाण केली आहे आणि जखमी अवस्थेत त्याला निलजई खाण येथील जंगलात सोडले आहे. तो जिवंत आहे का मृत ते माहित नाही", असे आरोपींनी पोलिसांना सांगितले.


योगेश 12 मे रोजी दुपारपासून घरातून बेपत्ता होता. त्याचे कुटुंबीय आणि मित्र त्याचा त्याचा शोध घेत होते. तो बेपत्ता झाल्याची माहितीही त्याच्या मित्रांनी सोशल मीडियावर पोस्ट करत दिली होती. पण मध्य रात्री योगेशचा खून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली.


दरम्यान, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड आणि भंडारामध्येही आंतरजातीय आणि प्रेमविवाहातून असे हल्ले मुलीच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहेत. मागील काही दिवसांत अशा अनेक घटना देशात आणि राज्यात घडल्या आहेत.

X
COMMENT