आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तीन वेळच्या चॅम्पियन महाराष्ट्राकडून 20 वर्षांनंतर संतोष ट्रॉफीची आशा; गोवा, सर्व्हिसेसचे आव्हान परतावून लावण्यासाठी युवा शिलेदार मजबूत 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- यजमान महाराष्ट्र फुटबॉल संघाने आपली लय कायम ठेवताना संतोष ट्रॉफीची मुख्य फेरी गाठली. यंदाच्या पात्रता फेरीत महाराष्ट्र संघाची कामगिरी काैतुकास्पद ठरली. युवांच्या अव्वल खेळीमुळे आता महाराष्ट्राच्या दोन दशकांनंतर चॅम्पियन होण्याच्या आशा पल्लवित झाल्या. दुसरीकडे गतविजेता केरळ व उपविजेता पश्चिम बंगालचे संघ पात्रता फेरीतच गारद झाले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राचा यंदा किताब जिंकण्याचा दावा मजबूत आहे. यासाठी युवा शिलेदार उत्सुक आहेत. 

 

१९९९ नंतर महाराष्ट्राला विजेतेपद मिळू शकले नसले तरी २०१६ मध्ये नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्राने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती. मुख्य फेरीत आता महाराष्ट्राला सर्व्हिसेस, मणिपूर, गो‌वा, पंजाब व तामिळनाडू या संघांचे आव्हान आहे. ते परतवून लावण्यासाठी महाराष्ट्राचे शिलेदार यंदा सज्ज आहेत. 


केरळ, पश्चिम बंगाल यांनी संतोष ट्रॉफीवर नेहमीच अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे त्यांचे कडवे आव्हान महाराष्ट्र संघासमोर उभे राहील असे जाणकारांचे मत होते. मात्र या दोन्ही संघांचा पात्रता फेरीतच पराभव झाल्याने महाराष्ट्राचा मार्ग सुकर झाला आहे. असे असले तरी गोव्याचे तगडे आव्हान कायम आहेच. गोेवेकरांचे फुटबॉलमधील कौशल्य वादातीत आहे. त्यांनी अनेकदा संतोष ट्रॉफीवर विजयी मुद्रा कोरली आहे. त्यामुळे त्यांना सहज घेऊन मुळीच चालणार नाही. दुसरीकडे सर्व्हिसेस संघही भलताच फॉर्मात आहे. या स्पर्धेतून त्यांच्या जोरदार तयारीची झलक महाराष्ट्राच्या संघाला दिसलीच आहे. त्यामुळे त्यांनाही लोळवण्याची किमया साधावी लागेल. 

 

- रोहन शुक्ला (मिडफिल्डर) 
मुंबई विद्यापीठाचा खेळाडू. मध्यरक्षकासह स्ट्रायकर. तीन वेळा ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग. १६ वर्षांखालील भारतीय संघातून सराव शिबिरासाठी निवड, १८ वर्षांखालील आय लीग स्पर्धेत सहभाग. रिलायन्सच्या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून बहुमान झाला. 

 

- लियांडर धर्माय (मिडफिल्डर) 
तिसरी संतोष ट्रॉफी. मुंबईचा खेळाडू. यू मुंबा संघाकडून खेळतो. मुंबई विद्यापीठाकडून दोन वर्षे प्रतिनिधित्व. मुंबई लीग स्पर्धेत सहभाग 

 

- संकेत साळोके (स्ट्रायकर) 
कोल्हापूरचा खेळाडू, दोन वेळा विद्यापीठ संघातून खेळताना एकदा अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेत सहभाग. एकदा ज्युनियर राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग 

 

- आरिफ शेख (स्ट्रायकर) 
मुंबईचा खेळाडू. ओएनजीसीकडून खेळतो. ही त्याची पहिलीच संतोष ट्रॉफी. तीन वर्षे आयलीग, डीएसके स्पर्धेत दोन वर्षे व गोकुळम केरळ संघाकडून एक वर्षे प्रतिनिधित्त्व. १९ वर्षांखालील संघात प्रतिनिधित्व. 

 

पदार्पणातच अव्वल कामगिरी करण्याचा निर्धार 
- विनोदकुमार पांडे (मिडफिल्डर) 

मुंबई विद्यापीठाचा खेळाडू. पूर्वी यूनियन बँकेकडून तर आता ओएनजीसी संघाकडून खेळतो. एअर इंडियाकडून १९ वर्षांखालील संघातून प्रतिनिधित्त्व. मध्यरक्षकांबरोबरच पासिंग व हेडिंगवर गोल करतो. 

 

- डिऑन मेनजीस (मिडफिल्डर ) : 
चौथी संतोष ट्रॉफी. मुंबईचा खेळाडू. युनियन बँकेचा कर्णधार. भारताच्या रिंग फुटबॉल संघात निवड. ब्राझील व चीन येथील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग. २०१६ मध्ये मुंबई लीग स्पर्धेत संरक्षक म्हणून पारितोषिक. 

 

- मृणाल तांडेल (अष्टपैलू) :

चौथी संतोष ट्रॉफी. मुंबई विद्यापीठ, एअर इंडिया व युनियन बँकेकडून प्रतिनिधित्व. मध्यरक्षक, स्टायकर, पासिंग व स्टापर असा अष्टपैलू खेळाडू. संतोष ट्रॉफी अंतिम फेरीत महाराष्ट्राकडून प्रतिनिधित्व. 

 

- अमन (मिडफिल्डर) 
मुंबई विद्यापीठाचा उजवा मध्यरक्षक. मुंबईच्या सीएफसीआय संघाकडून खेळतो. १७ वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड. लंडनच्या क्यूपीआर क्लबच्या संघात सहभाग. 

 

बचाव फळीत रक्षक ; सोलापूरचा ओंकार म्हस्के 
सोलापूरच्या दमाणी नगरात राहणाऱ्या ओंकार म्हस्केचा महाराष्ट्राच्या विजयात सिंहाचा वाटा. हिराचंद नेमचंद महाविद्यालयात बी. कॉम करणाऱ्या ओंकारचे वडील रिक्षा चालवतात. त्यांचे दमाणी नगरात स्वत:चे घर आहे. ओंकारचा भाऊ अभियांत्रिकी उत्तीर्ण असून सध्या तो व्यवसाय करतो. आई शिक्षिका आहे. बालपणापासूनच असलेल्या फुटबॉलच्या वेडाने त्याला महाराष्ट्राचा रक्षक बनवले. संतोष ट्रॉफीसाठी अख्ख्या महाराष्ट्रातून दीडशे खेळाडू जमतात. जोडीला मुंबईचे इतकेच. त्यातून २० जणांची निवड झाली. त्यात ११ एकट्या मुंबईचे. या २० जणांत स्थान मिळवणे मुळीच सोपे नव्हते. मात्र ते कर्तब सोलापूरच्या या तरुणाने गाजवले. त्याला विजयाचा प्रचंड विश्वास आहे. महाराष्ट्राच्या बचाव फळीत उजव्या चित्त्याच्या चपळाईने हा उंचापुरा पोरगा रक्षकाची भूमिका लिलया निभावतो. त्यामुळेच तो संघाचा अविभाज्य भाग बनला आहे. 

 

महाराष्ट्राच्या या अनुभवी शिलेदारांची भूमिका 
- कर्णधाराची सहावी संतोष ट्रॉफी तर गोलरक्षकाची पाचवी 


- कर्णधार लिनेकर मचाडो (मध्यरक्षक) 
करिअरमधील सहावी संतोष ट्रॉफी. मुंबईचा खेळाडू. युनायटेड सिक्किम संघाकडून एक आयलीग स्पर्धा खेळली आहे. मुंबई विद्यापीठाबरोबरच पश्चिम रेल्वेकडून खेळत होता. आत आयकर खात्याकडून खेळतो. संघाकडून मधळ्या फळीत खेळताना लांबून शूटिंग व चेंडू पासिंग करतो. मैदानावर गोल तयार करण्यात तरबेज आहे 

 

- ओएस खान (गोलरक्षक) 
पाचवी संतोष ट्रॉफी. नागपूरचा खेळाडू. नागपूर विद्यापीठाकडून दोन वेळा व पुणे डीएसके संघाकडून दोन वेळा प्रतिनिधित्व. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून खेळतो. रेल्वेकडून डेन्मार्कच्या स्पर्धेत सहभाग. गोलरक्षण करताना लाँगबॉल, हाय बॉल, शॉट स्टापर म्हणून ख्याती. 

 

'केरळ, बंगालचे पानिपत, महाराष्ट्राला विजयाची मोठी संधी' 
पात्रता फेरीच्या स्पर्धेत आम्ही कुठे कमी पडलो? याचा अभ्यास करून काही खेळाडू बदलणार आहोत. सर्व्हिसेस, मणिपूर, गो‌वा व तामिळनाडू या संघांचे आव्हान असणार आहे. १९९९ नंतर महाराष्ट्र विजेतेपदाच्या प्रतीक्षेत आहे. २०१६ मध्ये नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत महाराष्ट्र अंतिम फेरीत पोहोचला होता. लवकरच सराव शिबिर सुरू होईल. - प्रशिक्षक रितेश इनुमिल्ला व सहा. प्रशिक्षक सचिन नरसप्पा 
 

बातम्या आणखी आहेत...