आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाचशे फुटांवर थरार!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती,’ हे वाक्य मी पुस्तकात अनेकदा वाचून होतो; पण या नेहमीच वाचलेल्या वाक्याचा मी जो अनुभव घेतला ती घटना आठवून आजही अंगावर शहारे येतात. नशीब म्हणून वाचलो म्हणतात ना, तसा हा प्रकार. काही वर्षांपूर्वी मी पुण्यात कामानिमित्त गेलो होतो. कुर्डूवाडीहून इंद्रायणी एक्स्प्रेस पकडली. पुण्यात एका मित्राकडे काम होते. त्याची भेट घेऊन सायंकाळी सातच्या सुमारास पीएमटीची बस पकडून कर्वेनगरकडे निघालो. वातावरण नॉर्मल होते. बस प्रवाशांनी भरली होती. पुण्यात सिटी बसमध्ये गर्दी असताना बस पकडणे, गर्दी असो-नसो आपले सीट पकडणे याला सरावच लागतो. सायंकाळी सिटी बसच्या प्रवासात जसे वातावरण हवे तसे ते होते. सायंकाळी 7 वाजून 20 मिनिटे ते 8.15 दरम्यानची वेळ असावी. एकाएकी काय झाले कोणास ठाऊक? आमची बस जंगली महाराज रोडवरून जात असताना स्फोटाचा जबर आवाज झाला. क्षणभर काय झाले ते कोणालाच समजेना. सगळे घाबरून एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागलो. आमची बस जेथे थांबली होती तेथून अवघ्या पाचशे फुटांवर स्फोट झाला होता. स्फोटाच्या दणक्याने मोबाइल फोन जाम झाले होते. बॉम्बस्फोट फक्त आजवर टीव्हीत व वृत्तपत्रांत पाहिले व वाचले होते. पण त्या दिवशी स्फोटाचा दणका प्रथमच अनुभवला. लोक प्रचंड घाबरले होते. ट्रॅफिक जाम झाली होती. स्फोटाचा दणका ऐकून मुंबई 26-11 हल्ल्याचा थरार काय असतो याचा अंदाज आला. माझ्यासह गाडीतील सहप्रवासी मोठेच भाग्यवान म्हटले पाहिजेत. बॉम्बस्फोटानंतर पोलिसांच्या गाड्या सायरन वाजवत घटनास्थळी दाखल झाल्या. अर्ध्या तासाने मोबाइल नेटवर्क सुरू झाले. हळूहळू समजले की, पुण्यात बॉम्बस्फोट झाले आहेत. दुस-या दिवशी वृत्तपत्रांत मोठाले मथळे पाहून मी किती मोठ्या संकटातून वाचलो याची जाणीव झाली. पुण्यावरून गावाकडे येतानाही प्रवासात हीच चर्चा रंगली होती.