आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जंगलातून थरारक प्रवास...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा-बारा वर्षापूर्वीचा हा प्रसंग आहे. त्या वेळी आमच्याकडे एक जीप होती. उन्हाळ्याच्या सु्टीत फिरायला जायचा बेत करून बंगळुरू, म्हैसूर, गोकर्ण, महाबळेश्वर आणि उटी असा आम्ही प्रवासाचा बेत आखला होता. आम्ही पहिल्या तीन ठिकाणी यशस्वी प्रवास केला आणि उटीला निघालो. ही सफर आम्ही प्रथमच करत होतो. जंगल भागातून जात असताना एकाएकी जीपचा पाटाच तुटला. सायंकाळी पाच ते सकाळी सहा या दरम्यान जंगल भागातून प्रवास करण्यास सक्त मनाई होती. जीपमध्ये चार पुरुष, सहा स्त्रिया होत्या. संध्याकाळच्या वेळेस जाणा-या-येणा-या वाहनांना हात केला पण कोणीही थांबायला तयार नाही. चेकपोस्टवर आम्हाला सूचना देण्यात आली होती की, अंधार पडण्याच्या आतच हा जंगलातून जाणारा रोड पास करा अन्यथा काही खरे नाही आणि आमची गाडी तर नादुरुस्त झालेली.

जवळपास कोणी मेकॅनिकही नाही. आम्हाला घामच फुटला. शेवटी या भयानक जंगलात थांबण्यापेक्षा 30 ते 40 वेगाने प्रवास करण्याचे आम्ही ठरविले.या वेगाने आम्ही जवळपास 150 ते 175 किलोमीटर जंगल एरिया रात्रीच्या अंधारात पार केला. जंगलातून वाघ, सिंहाचे आवाज येत होते. काही प्राणीही गाडीसमोरून जायचे. दैवावर हवाला ठेवून आम्ही एकदाचे उटीत पोहोचलो. तेव्हा लोकांनी सांगितले की, तुम्ही फार मोठ्या संकटातून वाचलात म्हणून. कारण त्या जंगल परिसरात हिंस्र जनावरे गाडीवर बसून शिकार केल्याशिवाय सोडतच नाहीत. पण सुदैवाने आम्ही वाचलो. जंगलातील या भयंकर प्रवासात एक हत्ती आडवा आला होता पण आमच्याकडे त्याने लक्ष दिले नाही. हे आमचे आणखी एक सुदैव म्हणायचे. स्वत:च्या अथवा भाड्याची वाहने घेऊन प्रवास करताना वाटेत जर जंगल लागणार असेल तर अगोदर गाडी नीट आहे का, आपण गाडी त्या जंगल एरियातून वेळेवर बाहेर काढू शकू का, याचा विचार प्रत्येकाने करावा. अतिआत्मविश्वासाने जंगलातून प्रवास करू नये, हे आवर्जून सांगावेसे वाटते.