अतिदक्षता कक्षाला आग; नर्सेसनी वाचवले 22 नवजात बाळांचे प्राण, अमरावतीची घटना

धूर निघाल्याचे दिसताच कर्तव्यावर असलेल्या नर्सेसनी जीव मुठीत घेऊन कक्षात दाखल असलेल्या २२ नवजात बालकांचे प्राण वाचवले

दिव्य मराठी

Apr 23,2019 10:02:00 AM IST

अमरावती - जिल्हा स्त्री रुग्णालयातील नवजात बालक अतिदक्षता कक्षाला (एसएनसीयू) शॉर्टसर्किट झाल्याने अचानक आग लागली. धूर निघाल्याचे दिसताच कर्तव्यावर असलेल्या नर्सेसनी जीव मुठीत घेऊन कक्षात दाखल असलेल्या २२ नवजात बालकांचे प्राण वाचवले. धूर दिसताच मातांनी कक्षाकडे धाव घेतली, तर नर्सेस बालकांना घेऊन इतर हलवण्याचा प्रयत्न करत होत्या. आपत्कालीन मार्ग नसल्याने एकाच दरवाजातून माता आणि नर्सेस जाण्याचा प्रयत्न करत असल्याने चेंगराचेंगरीचा प्रसंग उद््भवला होता. मन हेलावून सोडणारी ही घटना जिल्हा सामान्य रुग्णालयात (डफरीन) सोमवारी सकाळी १०.३० घडला.


जिल्हा सामान्य रुग्णालयात नवजात बालकांची विशेष दक्षता घेता यावी म्हणून नवजात बालक अतिदक्षता कक्ष (एसएनसीयू) निर्माण केला आहे. सोमवारी एक -दोन नव्हे, तर तब्बल २२ नवजात बालकांवर उपचार सुरू होते. सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास एसएनसीयू कक्षात कर्तव्यावर असलेल्या नर्सेसना मोबाइल चार्जिंग लावून असलेल्या प्लगमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आवाज एेकू आला. त्यानंतर क्षणातच वीज प्रवाह नियंत्रित होत असलेल्या खोलीतून मोठ्या प्रमाणात धूर निघण्यास सुरुवात झाली. वीज नियंत्रित करणारी उपकरणे असलेल्या खोलीत आग लागल्याचे निदर्शनास येताच डफरीनमध्ये एकच धावपळ सुरू झाली.


संपूर्ण वाॅर्डात धूर
कोणालाही काही लक्षात येण्याच्या आधीच विजेच्या उपकरणांचा धूर संपूर्ण वाॅर्डात पसरण्यास सुरुवात झाली. शिवाय संपूर्ण कक्षातील वीजप्रवाहदेखील खंडित झाला. यामुळे नवजात बालके असलेली उपकरणे बंद पडली. वीज उपकरणांचा खोलीतून निघालेला धूर बालके असलेल्या कक्षापर्यंत क्षणात पोहोचला. त्यामुळे आधीच जीवनरक्षक प्रणालीवर असलेल्या बालकांना धुरापासून धोका निर्माण झाला होता. एसएनसीयू कक्षात कर्तव्यावर असलेल्या इन्चार्ज सिस्टर वर्षा पागोटे, नलिनी काळसर्पे, बालरुग्ण तज्ज्ञ परिचारिका ललिता अटाळकर यांना हा धोका लक्षात येताच घटनेची माहिती वरिष्ठांना देत जिवाची पर्वा न करता बालकांना बाहेर काढण्याचा निश्चय केला. कक्षात कर्तव्यावर असलेल्या अन्य ६ नर्सेस व ५ मावशींच्या मदतीने २२ नवजात बालकांना इतरत हलवण्यास सुरुवात केली. आगीचा धूर सर्वत्र पसरल्याने नवजात बालकांना आपल्या कुशीत घेण्यासाठी मातांनी कक्षात धाव घेतली.


दोन वर्षांपूर्वी दगावली होती चार बालके
डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती वैद्यकीय महाविद्यालयात (पीडीएमसी) दोन वर्षांपूर्वी चार बालके दगावली होती. त्यानंतर तब्बल १९ महिने पीडीएमसीमधील एसएनसीयू युनिट बंद होते. २९ मे २०१७ रोजी घडलेल्या या प्रकरणाने संपूर्ण अमरावतीकर हादरून गेले होते. ही आठवण पुन्हा जागी झाली.

X