आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असाही पाहुणचार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी चंद्रपूरला असताना नद्यांना महापूर आला होता. अर्ध्याहून अधिक वस्ती पाण्याखाली गेली होती. माझी मुलगी एका फूलविक्रेत्याकडून रोज हार विकत घ्यायची. एकदा तो फूलविक्रेता म्हणाला, काकू, शहरात पुराचे पाणी वाढले आहे. जर आमच्या वस्तीत पाणी शिरले तर मी तुमच्या घरी राहायला येईन, असे तो हसतच म्हणाला होता. माझ्या मुलीनेही त्याला आनंदाने होकार दिला. काही दिवसांनी नेमकी तीच परिस्थिती उद्भवली. त्याच्या घराच्या पायरीला पाणी लागलं होतं. त्याने त्याचे सामान एका मित्राकडे ठेवून दिले. त्याच्या आईला आणि पत्नीला घेऊन तो मुलीकडे राहण्यास आला. मुलीने त्याला आनंदाने राहण्यास जागा दिली. त्याला अंथरूण- पांघरुणे देऊन निवासाची सोय केली. तसेच त्या सर्वांच्या चहा-नाष्ट्यासह जेवणाची चांगली व्यवस्था करून दिली.
दोन दिवसांनी पूर ओसरला, तसा तो जाण्यासाठी निघाला. त्याच्या आईची आणि पत्नीची ओटी भरून निरोप दिला. माझ्या मुलीचा स्वभाव मनमिळाऊ असल्याने त्यांनाही येथे परकेपणा वाटला नव्हता. तो फूलविक्रेता वारंवार माझ्या मुलीकडे राहण्यास जागा दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होता. ती म्हणाली, तुम्हाला येथे जागा देण्यात मला आनंदच वाटला. आपण कोणाच्या तरी मदतीला आलो याचे समाधान आहे. माझ्या मुलीने घरी आलेल्या पाहुण्याप्रमाणे वागणूक दिली होती. अतिथी देवो भव ही आपली भारतीय संस्कृती आहे. अडचणीत एखाद्याच्या कामी आलो तर तोही आपली आठवण कधीच विसरत नाही. माणुसकी शेवटी अशा विपरीत परिस्थितीतच दिसून येते. उत्तराखंडात घडलेल्या कहरात नद्यांना आलेल्या पुरामध्ये अनेक जीव गमवावे लागले होते. त्या वेळी देशभरातून मदतीचा ओघ तिकडे वळला होता. गेल्या पावसाळ्यात विदर्भात असाच पाऊस झाल्याने तेथील जनतेला संकटाचा सामना करावा लागलाच होता. ती आठवणही यानिमित्ताने ताजी झाली.