आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी 200 खाटांचे वसतिगृह उभारणार; संचालक मंडळाची 5 कोटी खर्चाच्या प्रस्तावास मान्यता

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- ८५ वर्षांनंतर प्रथमच शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दोनशे खाटांचे विद्यार्थी वसतिगृह उभारण्याचा निर्णय जाधववाडी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने घेतला आहे. यासाठी ५ कोटींच्या प्रस्तावास मान्यता देऊन तो राज्य पणन संचालकांच्या मान्यतेसाठी पाठवला आहे. मान्यता मिळताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल. असा उपक्रम राबवणारी जाधववाडी कृती उत्पन्न बाजार समिती महाराष्ट्रातील एकमेव ठरणार आहे, अशी माहिती सभापती राधाकिसन पठाडे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. 

 

बाजार समितीची स्थापना १७ फेब्रुवारी १९३४ रोजी झाली. राज्यात सर्वात मोठे ७३.२८ हेक्टर क्षेत्र समितीच्या मालकीचे आहे. यावर मुख्य प्रशासकीय इमारत, १२६ धान्य मार्केट दुकाने, २१७ फळभाजी मार्केट दुकाने, जनरल शॉपिंग सेंटरमध्ये ४०० दुकाने, ४२ शॉप कम गोदाम, गोडाऊन, वखार महामंडळाचे गोदाम, शेतकरी भवन आहे. मोठ्या प्रमाणात जागा पडीक आहे. त्याचा सदुपयोग करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. त्यानुसार स्वतंत्र फुल मार्केट, किराणा मार्केट आणि जुना मोंढा जाधववाडी येथे स्थलांतरित करण्याचे काम केले जात आहे. 

निधीची अडचण 


दुष्काळ, खुल्या बाजार व्यवस्थेमुळे बाजार समितीच्या उत्पन्नात घट झाली आहे. यामुळे निधीची अडचण असल्याने पणन संचालक मंडळाने प्रस्ताव मंजूर केल्यानंतर शासनाकडून निधी मिळावा. स्थानिक मतदारसंघाचे खासदार चंद्रकांत खैरे, रावसाहेब दानवे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आमदार अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण, आमदार संजय शिरसाट, पालकमंत्री व सहकार मंत्र्यांकडून निधी मिळावा, अशी अपेक्षादेखील संचालक मंडळाला आहे. 

असा होईल फायदा 


पडीक जागेचा सदुपयोग होईल. बाजार समितीच्या वैभवात भर पडेल. वसतिगृह उभारणारी राज्यातील पहिली बाजार समिती असा मान मिळेल. विद्यापीठ, शैक्षणिक संस्थेत वसतिगृह आहेत. तेथील कोटा मर्यादित असतो. शेतकऱ्यांच्या मुलांना तो खर्च झेपत नाही. बाजार समितीत वसतिगृह नाही. खोली भाड्याने घेऊन राहायचे म्हटले तर परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटते. त्यामुळे संचालक मंडळाने जाधववाडीत वसतिगृहात बांधण्याचे ठरवले आहे. भविष्यात ५० ते १०० मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह उभे करण्याचा निर्णय आहे.