आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहीद जवानांच्या कुटुंबीयांना आणि वयोवृद्धांना मोफत जेवण, पापरी येथील हॉटेल चालकाचा कौतुकास्पद उपक्रम

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर-  जिल्ह्यातील पापरी येथील हॉटेल व्यावसायिकाने सुरू केला कौतुकास्पद उपक्रम. आपल्या हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, वीर माता-पिता त्यांच्या कुटुंबासह समाजातील इतरही सधन असो अथवा निराधार, 75 वर्ष पुढील वयोवृद्ध महिला पुरुष यांना मोफत अन्नदान सुरू केले आहे. या हॉटेल चालकाचे नाव भगवान मछिंद्र दाढे असे आहे. सोलापूर जिल्ह्यातील इतर साक्षर हॉटेल व्यावसायीक व समाजापुढे एका अक्षराची तोंड ओळख नसलेल्या, लिहता वाचता न येणाऱ्या हॉटेल व्यावसायिकाने राबवलेला हा जिल्ह्यातील पहिलाच सामाजिक व डोळस उपक्रम सर्वांचे लक्ष वेधुन घेणारा आहे.


सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल गायत्रीचे चालक भगवान मछिंद्र दाढे (रा.वाफळे) यांनी गेल्या आठवड्यापासून देशासाठी शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी, माता पिता,तसेच समाजातील सर्व कुटुंबातील वय वर्ष 75 च्या पुढील वयोवृद्ध महिला पुरुषांना मोफत जेवण देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. त्यांनी तशा आशयाचे डिजिटल फलक आपल्या हॉटेल परिसरात लावले आहेत.

 

या संदर्भात हा उपक्रम राबवणारे भगवान दाढे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, "मी सर्व सामान्य शेतकरी कुटुंबातील आहे. आमच्यावर एकेकाळी जेवताना भाकरी सोबत खायला भाजी मिळत नव्हती, आम्ही पाण्यात लिंबू व चटणी टाकून खाल्ली. कधी कधी तर उपवास घडले, अन्न पाणी वेळेवर न मिळाल्यावर काय अवस्था असते हे स्वतः अनुभवल्यामुळे इतर कोणावर अशी वेळ येवू नये म्हणून मी वयोवृद्धांसाठी हा मोफत जेवणाचा उपक्रम सुरु केला. घरातील असो अथवा बाहेरचे वयोवृद्ध व्यक्तींना आपुलकीने संभाळण्याचा गुण मला वडिलांकडून मिळाला आहे. दाढे हे निराधार वयोवृद्धांना तर मोफत चहा पाणी, अन्न देतातच पण हॉटेल मधे जेवण करायला आलेल्या सधन कुटुंबातील वयोवृद्धांचेही बिल आकारत नाहीत. केवळ वयोवृद्धांचे आशीर्वाद मिळावेत हाच त्यांचा प्रामाणिक हेतू आहे.

 

वयोवृद्धांना मोफत अन्नदान करताना द्यायचे म्हणून काही तरी अन्न ते देत नाहीत, तर इतर ग्राहक जसे हवी ती ऑर्डर देवून खातात तसेच त्यांनाही हवी असलेली भाजी भाकरी, चपाती यांचे जेवण देण्यात येते.

 

जवान देशासाठी आपले प्राण देतात तर मग मी त्यांच्या घरच्यांसाठी जेवण का देवु शकत नाही का. शहीद जवानांच्या वीर माता पिता, वीर पत्नी यांच्या बद्दल बोलताना ते म्हणाले ज्या माता पित्यांनी देशासाठी आपल्या पोटाचा गोळा बलिदान दिला, ज्या पत्नी ने आपले सौभाग्य दिले त्यांना मी पोटभर मोफत जेवण देवू शकत नाही का? शहीद जवानांच्या बलिदानास अभिवादन व देश प्रेमापोटी त्यांनाही ही सेवा देत आहे असे दाढे म्हणाले.

 

निरक्षर असूनही सामाजिक जबाबदारीचे भान त्यांना आहे. दाढे स्वतः निरक्षर असले तरी त्यांना सामाजिक जाणीव व जबाबदारी अधिक असल्याचे दिसून येते त्यांनी त्यांच्या हॉटेलच्या नाम फलकावर मोठ्या अक्षरात मूली वाचवा देश वाचवा, झाडे वाचवा जीवन वाचवा असा संदेश लिहला आहे.

 

एकीकडे समाजात सुशिक्षीत साक्षर मुले आपल्या आई वडिलांना व्यवस्थित संभाळत नसल्याच्या घटना पाहत असतो. पण निरक्षर दाढे यांनी राबवलेला हा उपक्रम पाहता समाजात अजूनही चांगले लोक आहेत याची प्रचिती येते.


 

बातम्या आणखी आहेत...