आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इम्रान खान भारताशी चर्चा कशी काय करू शकतात? पाकमध्ये विरोधकांचा सवाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय चर्चा करण्यासाठी प्रस्ताव पाठवल्यानंतर आता पाकमध्ये विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. इम्रान खान सरकारच्या धोरणाविरुद्ध विरोधी पक्ष एकजूट झाले आहेत. जमात उलेमा-आय-इस्लाम फजल पक्षाचे खासदार अब्दुल गफूर हैदरी यांनी म्हटले की, संसदेला इम्रान यांनी विश्वासात घेतले नाही. परस्पर त्यांनी भारताला चर्चेसाठी प्रस्ताव कसा काय पाठवला, असे त्यांनी पत्र परिषदेत विचारले. 


वरिष्ठ सभागृहाचे माजी अध्यक्ष आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे मियाँ रजा रब्बानी यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये हिंसा वाढली आहे. या स्थितीत भारताला चर्चेचा प्रस्ताव पाठवणे अनाकलनीय आहे. खान यांनी वापरलेल्या भाषेलाही रब्बानी यांचा आक्षेप आहे. 'दहशतवादावर बोलणी करण्यास पाक तयार आहे' असे लिहिणे चूक असल्याचे मत त्यांनी मांडले. याशिवाय इम्रान खान यांच्या तेहरीक-ए-इन्साफ पक्षाचे नेते फैसल जावेद यांनीही या पत्राविषयी नाराजी व्यक्त केली. काही मुद्द्यांवर देशांतर्गत एकवाक्यता असणे अत्यंत गरजेचे आहे. हा एका व्यक्तीच्या निर्णयाचा मुद्दा नाही, असे ते म्हणाले. १४ सप्टेंबर रोजी इम्रान खान यांनी भारताकडे चर्चेचा प्रस्ताव पाठवला होता. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा महमूद कुरेशी आणि भारताच्या परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज सध्या संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेसाठी न्यूयॉर्कमध्ये आहेत. त्यांच्यादरम्यान चर्चा झाली पाहिजे, असे खान यांनी या पत्रात नमूद केले होते.

 
निवडणूक खर्चात अनियमिततेसाठी इम्रान यांच्यासह १४१ जणांना नोटीस 
पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने पंतप्रधान इम्रान खान यांच्यासह १४१ जणांना प्रचार मोहिमेदरम्यान मर्यादेपेक्षा अधिक पैसा खर्च केल्याप्रकरणी नोटीस बजावली आहे. ७ दिवसांच्या आत याचा खुलासा देणे अनिवार्य आहे. संसदेचे ९६ सदस्य, पंजाबचे ३८ आणि खैबर पख्तुनख्वाच्या ८ आमदारांना यासंंबंधी नोटीस पाठवली आहे. पंजाबचे मुख्यमंत्री उस्मान बुजदार, पंजाब विधानसभेचे अध्यक्ष परवेझ इलाही, माजी पंतप्रधान राजा परवेझ अश्रफ, माजी संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ, पंजाबचे माहिती व जनसंपर्कमंत्री फयाज चौहान यांचा नोटीस बजावलेल्यांमध्ये समावेश आहे. 


माहिती व जनसंपर्क मंत्र्यांचा खुलासा 
दरम्यान, पाकिस्तानचे माहिती व जनसंपर्क मंत्री फवाद चौधरी यांनी म्हटले की, खान यांनी भारताच्या पंतप्रधानांना लिहिलेले पत्र हे उत्तरादाखल होते. भारताने १८ ऑगस्ट रोजी पाठवलेल्या पत्राला तो प्रतिसाद होता. काश्मीरसहित सर्व द्विपक्षीय वादाच्या मुद्द्यांवर पाकिस्तान तोडगा काढू इच्छितो. चर्चेने तोडगा काढला तर दारिद्र्य रेषेखाली जगत असलेल्या लाखो नागरिकांच्या समस्या सुटतील, असे इम्रान खान यांना वाटते. भारताशी संबंध सुधारल्यास पाकिस्तान आंतरराष्ट्रीय बाजाराचे केंद्र बनू शकेल, असा विश्वास पंतप्रधानांना वाटत असल्याने त्यांनी भारताला सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे फवाद म्हणाले. 


मुशर्रफ मायदेशी परतल्यास उच्चस्तरीय संरक्षण मिळणार 
पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने देशाचे माजी लष्करशहा आणि देशद्रोह खटल्यातील आरोपी जनरल परवेझ मुशर्रफ यांना उच्चस्तरीय सुरक्षा पुरवण्याची मागणी मंजूर केली आहे. ७५ वर्षीय मुशर्रफ दुबईत आश्रयाला आहेत. सरन्यायाधीश साकीब निसार यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाने या प्रकरणी मंगळवारी सुनावणी केली. पाठीच्या दुखण्यासाठी उपचारार्थ त्यांनी देश सोडला होता. मात्र परदेशात ते स्वस्थ दिसत आहेत, ते खोटे का बोलत आहेत, असा प्रश्न न्या. निसार यांनी मुशर्रफ यांचे वकील अतहर शहा यांना केला. ते सुरक्षा कारणास्तव देशात येत नसल्याचे वकिलांनी सांगितले. 


न्या. निसार यांनी म्हटले की, ते पाकला परतल्यास त्यांना उत्कृष्ट वैद्यकीय सेवाही पुरवली जाईल. त्यांच्या फार्म हाऊसचे सील काढण्याचे आदेश कोर्टाने दिले आहेत. ते देशात आल्यास येथे निवास करू शकतात, असे कोर्टाने म्हटले आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये मुशर्रफ यांच्या देशातील व परदेशातील मालमत्तेचे विवरण त्यांच्या वकिलाने सादर केले. १९९९ ते २००८ दरम्यान मुशर्रफ यांनी पाकचे नेतृत्व केले होते. २००७ मध्ये जबरदस्ती आणीबाणी लादल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. 

बातम्या आणखी आहेत...