आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोर्टाची विचारणा : रफाल कराराचा निर्णय कसा घेतला; मात्र, केंद्राला नोटीस नाही, किमतीची माहिती मागितली नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- रफाल विमानांच्या सौद्याचा निर्णय कसा घेतला गेला, अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला केली आहे. २९ ऑक्टोबरपर्यंत केंद्राने संपूर्ण प्रक्रियेचा तपशील सीलबंद लिफाफ्यात द्यावा, असे निर्देशही कोर्टाने दिले आहेत. रफालची किंमत आणि तांत्रिक वैशिष्ट्यांचे विवरण कोर्टाला नको, असेही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केले. पुढील सुनावणी ३१ आॅक्टोबरला होईल. 


रफाल करारात भ्रष्टाचाराचा आरोप करत वकील एम.एल.शर्मा, विनीत ढांडा आणि काँग्रेस नेते तहसीन पूनावाला यांनी याचिका दाखल केल्या होत्या. बुधवारी पूनावाला यांनी याचिका मागे घेतली. सुप्रीम कोर्टाने सरकारकडून रफाल कराराची माहिती मागावी, यूपीए व एनडीए सरकारच्या काळात रफालच्या तुलनात्मक किमतींची माहिती घ्यावी, अशा मागण्या आहेत. 


सुप्रीम कोर्ट लाइव्ह...
एम.एल. शर्मा(याचिकाकर्ते):  
एका रफाल विमानाची किंमत ७१ दशलक्ष युरो आहे. मात्र त्यावर त्यापेक्षा जास्त पैसे देत आहेत. करारात कोणत्याही प्रकारची पारदर्शकता नाही. हा भ्रष्टाचाराचा कट आहे. 


विनीत ढांडा (याचिकाकर्ते) : रफाल करार मनमानी पद्धतीने करण्यात आला आहे. किमतींच्या बदलांची चौकशी केली जावी. 


के.के. वेणुगोपाल (अॅटर्नी जनरल) : या याचिका जनहित याचिका नव्हे तर राजकीय हिताच्या आहेत. त्यांच्यावर सुनावणी केली जाऊ नये.


रंजन गोगोई (सरन्यायाधीश) : याचिकाकर्त्यांचे युक्तिवाद पुरेसे नाहीत. मात्र त्यांना आम्ही रेकॉर्डवर घेत नाहीयत. मात्र कराराची माहिती फक्त कोर्टालाच देण्यास सांगितले तर काय म्हणाल?


वेणुगोपाल : हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. रफाल कराराचा तपशील आणि संरक्षणविषयक खरेदी प्रक्रियेचे मुद्दे कुणालाही दाखवता येणार नाहीत. अशा प्रकरणांची न्यायिक समीक्षा केली जाऊ शकत नाही. केंद्राला नोटीस बजावू नये. हा निवडणुकांचा काळ आहे. कोर्टाकडून नोटीस जारी झाली तर प्रकरण थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचते.


सरन्यायाधीश : आम्ही नोटीस बजावत नाही आहोत. रफालची किंमत आणि तांत्रिक माहितीही नको आहे. आम्ही रफाल व त्यांच्या गरजेबाबतही बोलत नाही आहोत. आम्हाला फक्त हा निर्णय कसा घेण्यात आला, हे जाणून घ्यायचे आहे. आम्ही फक्त आमच्या समाधानासाठी ही माहिती जाणून घेऊ इच्छित आहोत.

बातम्या आणखी आहेत...