आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वभाव ओळखायचा कसा?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी दवाखान्यात गेलो की नेहमी माझा 16 वा किंवा 17 वा नंबर असतो. डॉक्टरला पेशंट तपासायला साधारणपणे 3 मिनिटे लागतात. म्हणजे माझ्याक डे 51 मिनिटे असतात. मग मी काय करतो? शूज रॅकमध्ये ठेवलेल्या चप्पल आणि बुटांच्या स्टाइलवरून रांगेत बसलेल्या पेशंटच्या जोड्या लावतो. जसे एखादा चकाचक पॉलिश केलेला बूट म्हणजे स्वच्छताप्रिय व्यक्ती. एखादी मळकट स्लीपर म्हणजे, कुठलीही गोष्ट लाइटली घेणारी, बेपर्वा व्यक्ती; भडक रंगाची सँडल म्हणजे, उत्साही आणि चंचल वृत्तीची मुलगी. रॅकपासून जरा दूर ठेवलेले रिबॉकचे शूज म्हणजे, ब्रँडेड वस्तूची आवड असलेला, स्वत:ला इतरांपेक्षा वेगळा समजणारा तरुण मुलगा. एखादी ओशो चप्पल म्हणजे स्वतंत्र विचारांची तरुण मुलगी. एखादे कॅन्व्हासचे शुभ्र शूज म्हणजे शिस्तप्रिय आजोबा. एक अंगठा तुटलेली चप्पल म्हणजे धसमुसळ्या स्वभावाची, प्रत्येक गोष्टीत घाई असलेला व्यक्ती. एखादी झिजलेली चप्पल म्हणजे जुन्या विचारांना न सोडणारी, नवीन विचार सहज आत्मसात न करणारी व्यक्ती.

निळ्या रंगाची स्लीपर म्हणजे जरी परिस्थिती चांगली असली, तरी दरिद्री राहण्याची सवय असलेली व्यक्ती. चांदीच्या पट्ट्या असलेली सँडल म्हणजे आपण नेहमी चर्चेचा विषय असावं, असे वाटणारी मुलगी. प्रचंड धूळ असलेली चप्पल म्हणजे अशी व्यक्ती जी अख्ख्या जगाचे काम करेल, पण ज्याच्याकडे स्वत:साठी अजिबात वेळ नाही. जाड सोल असलेले बूट म्हणजे आडवातिडवा रांगडा तरुण मुलगा, ज्याच्या आवडीचा विषय म्हणजे हाणामारी. गाजरासारखे हाय हिल्स असलेली सँडल म्हणजे अति आकांक्षावादी, खूप पैसा कमावण्याची इच्छा बाळगणारी तरुण मुलगी. हे असले काहीतरी माझ्या मनात सुरू असते आणि माझा नंबर येतो, डॉक्टर मला तपासतात. जेव्हा मी बाहेर येतो आणि अशा अनेक वेगवेगळे स्वभाव असलेल्या व्यक्तींच्या चपला-बुटांमध्ये माझा जोड शोधतो, तेव्हा वाटतं...नेमका मी कसा?