आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसं जगवायचं या मुक्या जितराबांना?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्याचं अवलंबित्व मात्र आजच्या दुष्काळात अस्थिरतेच्याही पलीकडे गेलं,  जेव्हा धान्यांच्या थप्प्यांनी भरलेलं घर रिकामं झालं आणि अंगणातली जनावरांनी भरलेली दावणदेखील ओस पडली. सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या दावणीला शेपटं हलवत उभ्या असलेल्या जनावरांना वैरणीच्या चार पेंढ्या कातरून फेकणारा शेतकरी आज चारा आणि पाणी नाही म्हणून या जनावरांना बाजारात उभा करतो तेव्हा हा भेगाळलेला दुष्काळ रोज किती तापतोय हे लक्षात येतं....


अ वलंबून असणं हे कायम अस्थिर असतं आणि ही अस्थिरता कधी कुठली परिस्थिती घेऊन येईल याचा नियम नाही. कारण अस्थिरता कायम अनपेक्षित गोष्टींना जन्म देते. मनुष्यापासून किड्या-मुंग्यांपर्यंत सर्वच निसर्गावर अवलंबून... त्याने जेव्हा-जेव्हा हात आखडता घेतला तेव्हा या निसर्ग राजाने भल्याभल्यांना अस्थिर केलय. त्यातलाच एक शेतकरी आणि त्यातलाच एक पशू. दोघंही पाण्यासाठी आणि चाऱ्यासाठी हैराण झालेत. सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत जो काबाडकष्ट करतोय त्या शेतकऱ्यांच अवलंबित्व मात्र आजच्या दुष्काळात अस्थिरतेच्याही पलीकडे गेलं, जेव्हा त्याचं धान्यांच्या थप्प्यांनी भरलेलं घर रिकामं झालं आणि अंगणातली जनावरांनी भरलेली दावणदेखील ओस पडली. सकाळी झोपेतून उठल्या-उठल्या दावणीला शेपटं हलवत उभ्या असलेल्या जनावरांना वैरणीच्या चार पेंढ्या कातरुन फेकणारा शेतकरी आज चारा आणि पाणी नाही म्हणून या जनावरांना बाजारात उभा करतो तेव्हा हा भेगाळलेला दुष्काळ रोज किती तापतोय हे लक्षात येतं....

 

गेल्या सोमवारी मी जालन्याला गेलो होतो. मित्रासोबत रामनगरला गेलो तर काय मोठ्ठा बाजार भरलेला बैलांचा. शेतकरी तितके बैल आणि बैल तितके शेतकरी या बाजारात. बैलांचा सौदा झाला तरी त्याच्या अंगावरून दोनदा हात फिरवणारा शेतकरी आणि घेणाऱ्याने मेखीचा कासरा सोडला तरी आपल्या शेतकऱ्याला दोनदा हुंगणारा बैल इथं पाहिला. मी विचारलं का विकताय बैल? तर हतबल झालेल्या शेतकऱ्यानं दोनच शब्द सांगितले... चारा आणि पाणी ! ""जिल्ह्यात लहान मोठी एकूण ६,९७,३९८ जनावरं आहेत. राज्यभर चारा छावण्यांचा बोलाबाला असला तरी जालन्यात तिर्थपुरीजवळ एकच छावणी झालीये. बाकी सगळे शेतकरी हतबल झालेत. जिथं रानं रखरखं करतायेत आणि विहिरीसकट नद्या-नाले कोरडे ठाक पडलेत तिथं कुठून आणायचा यांना चारा आणि पाणी? आज ३५०० रुपये टन ऊस भेटतो. दर दहा-पंधरा दिवसाला कुठून आणायचे इतके पैसे?  शेतीत काही पिकलं नाही आणि पिकलं नाही म्हणून काही विकलं नाही. सांगा तुम्ही कसं जगायचं आम्ही आणि कसं जगवायचं या मुक्या जितराबांना ?''  शेतकरी बोलत होते..

 

याच्यापेक्षा वाईट परिस्थिती झालीये ती वाशीम जिल्ह्यात! पूर्ण जिल्ह्यात नावालाही छावणी नाही. याच जिल्ह्यातील एक गाव आहे मालेगाव तालुक्यातील अवरधरी! इथं अक्षरशः जनावरांना हळद कुंकू लावून सोडून दिलंय. काय वाटलं असेल त्या बळीराजाला पोटच्या लेकरांसारखा सांभाळ केलेल्या जनावरांना "अनाथ' करून सोडताना. ज्यांच्या जीवावर आयुष्याची गुजराण केली त्यांना आज डोळ्याआड करताना काय वेदना असतील त्या माऊलीच्या. दारात दोन जितराब आणि घरात दोन पोते धान्याचे असले की शेतकऱ्याला कशाचीच फिकीर वाटत नाही. मात्र बोटभर पोटासाठी घोटभर पाणी मिळत नाही तेव्हा दारात चारा-पाण्यासाठी हंबरडा फोडणारी जनावरं पाहवत नाहीत. त्यावेळी छातीवर दगड ठेऊन ते डोळ्याआड करावी लागतात हे फार भयावह आहे. यासंदर्भात तिथल्या मित्रांशी बोललो तर त्याचा आवाज पारच खोल गेलेला. गावापासून चार किलोमीटर जावं लागतं पाण्यासाठी. मोकळे हांडे आणि मोकळी आशा घेऊन. कारण पाणी मिळेलच याची काही खात्री नाही. त्यात दारात पाण्यावाचून हांबरडा फोडणारी दोन पारठी झालेली जनावर. त्यांना पाणी पाजायला घेऊन जायचं, नाहीतर त्यांना घरी पाणी घेऊन यायचं. त्यातही या पाण्याला पाण्याचा रंगच राहिलेला नाही. ते पूर्ण गांज गांज झालेलं पाणी आम्ही दोन-तीनदा गाळून पितो, असं तो मित्र म्हणाला, तेव्हा पुन्हा एकदा पाण्याने किती तळं गाठलाय हे लक्षात आलं...

 

पाण्यासाठी वणवण फिरणारा शेतकरी आज दारातल्या लाख-लाख किंमतीच्या जनावरांना टाकायला चारा नाही आणि पाजायला पाणी नाही म्हणून ऐन आगुटीच्या तोंडावर कवडीमोल किमतीत जनावरं व्यापाऱ्याचा हातात देऊन मोकळा झालाय हे फार सुन्न करणारं  आहे. उन्हाळ्यात शेतीतले काम ट्रॅक्टरने करता येतात. मात्र एकदा का पावसाने हजेरी लावली की सगळे काम या बैलांवर अवलंबून असतात. भेगाळलेली जमीन ओलिताखाली आलेली असते. त्यात आगुटीचा काळ असतो. त्यामुळं शेतीतलं कोणतंच काम ट्रॅक्टरने होत नाही. ट्रॅक्टरने  सरधोपट नांगरलेल्या रानात बैलांच्या साहायाने मशागत करावी लागते. आता १५ मे पासून आगुटीचा काळं सुरू होतो. म्हणजे नांगरटी झालेल्या रानात पाळी घालायची असते, खर्डा घालायचा असतो, नांगरटीत काकऱ्या घालायच्या असतात आणि जूनला येणाऱ्या पावसाच्या आशेवर रानं पीक घ्यायला तयार करून ठेवायची असतात. या कामाला बैलांचीच गरज असते. कापूस लावण्यासाठी सारे काढण्यापासून उसाचे दंड टाकण्यापर्यंत बैलांचचं काम असत. या दिवसात जर शेतकऱ्याकडं बैल नसतील तर अगदी हात मोडल्यासारखा होतो. पण आता काय करणार ? या दुष्काळानं वेळचं तशी आणली. ज्या बैलांना गळ्यात शिवळट घालून रानात उभं करायचं होतं त्याच बैलांना आता कासरा बांधून विक्रीसाठी बाजारात उभं करण्याची वेळ आलीये. ज्या पावसावर शेती फुलायची ती शेतीही औंदा फुलली नाही, त्या फुललेल्या शेतीवर जी घरातली कनिंग धान्याने भरलेली राहायची तीही औंदा मोकळी राहिली. आता शेवटी ज्यांच्या जिवावर शेती फुलायची आणि धान्याने कनिंग भरायची ती दारातली बैलांची दावणही मोकळी होतीये....
लेखकाचा संपर्क: ९१६८२०१९०१.


 

बातम्या आणखी आहेत...