आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आनंदी कसे राहायचे ते आपल्यावर अवलंबून, पाय गमावलेल्या जावेदची अभिमानास्पद कामगिरी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बुलडाणा जिल्ह्यातील लोणार हे गाव. इथल्या चौधरी कुटुंबात माझा जन्म झाला. शालेय शिक्षण गावातच झालं. चौधरी कुटुंबाचा परंपरागत व्यवसाय म्हशीचे दूधदुभते विकण्याचा.. आणि थोडीफार शेती करण्याचा. त्यामुळे ओढगस्तीची परिस्थिती. मी या कुटूंबातून पहिलाच पदवीधर. माझी पहिली अठरा वर्षे तर गावातच गेली. घरची शेती आणि दूधदुभत्याचा व्यवसाय म्हणून मी कृषी विज्ञानाची पदवी मिळवली, ती औरंगाबाद येथून. याच काळात मी स्वत:मधल्या ‘नर्तका’लाही घडवले. बॉलीवूड आणि समकालीन नृत्यकलेत प्रवीण झालाे आणि ही कला इतरांनाही शिकवू लागलाे. जोडीने धाडसी क्रीडाप्रकारांतही मला रस वाटू लागला. भावी करिअरची अनेक स्वप्ने डोळ्यांत घेऊन एकविसाव्या वर्षी घरी परतलाे आणि ३ जून २०१५ राेजी बाइइकला दुर्दैवी अपघात झाला. पायाला गंभीर दुखापत झाली आणि उपचारांची शिकस्त करूनही अखेरीस एका पायाचा बळी द्यावा लागला.


‘अपघाताच्या धक्क्याने मी पूर्ण खचलो होतो. निराश झालो होतो. तशा अवस्थेतही आजारपणाचे चार महिने काढले आणि अचानक एक दिवस मला जाणवले, की आपण चुकतो आहोत. आपण नुसते बसून राहता कामा नये. काहीतरी केले पाहिजे. एका पायावर आपण काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. तेव्हाच मला ‘व्हीलचेअर बास्केटबॉल’ या खेळाची माहिती समजली. मी त्याविषयी अधिक माहिती मिळवली आणि नंतर प्रशिक्षणासाठी अर्ज केला. हैदराबाद येथे प्रशिक्षण कॅम्प होता. माझ्याकडे पैसेही नव्हते. पण मी इच्छा व्यक्त केली आणि मदतीसाठी अनेक हात पुढे आले. अपघातानंतर मी सावरलो, तो केवळ कुटुंबीय आणि अनेक सुहृदांच्या आत्मीयतेने केलेल्या मदतीमुळेच..माझ्या प्रत्येक हाकेला ते धावून आले. त्यांची मदत, दिलासा, आस्था, जिव्हाळा, प्रेम, मैत्र, विश्वास..यावरच मी गेल्या चार वर्षांचा आव्हानात्मक मार्ग चालू शकलो. माझी उमेद त्यांनी खचू दिली नाही. माझी स्वप्ने कोमेजू दिली नाहीत. त्या सगळ्यांच्या आपलेपणाचा प्रकाशच माझ्यासमोरचा काळोख दूर करणारा ठरला...हे सांगताना जावेद सद्गदित झाला होता.


मला ज्या खेळाविषयी काहीच माहिती नव्हती, तो खेळ मी नव्याने शिकलो आणि त्या खेळात आज मी देशाचे प्रतिनिधित्व करत आहे, रोज दहा तास सराव मी केला. माझ्याकडे व्हीलचेअर नव्हती, पैसे तर नव्हतेच, कोच नव्हते, योग्य मार्गदर्शन नव्हते. पण प्रयत्न, जिद्द सोडली नाही. हळूहळू या समस्या दूर झाल्या. मला विदेशी कोच मार्गदर्शनासाठी मिळाले. देशासाठी अनेक पदके मी मिळवली आहेत, याचा मला खूप आनंद होतो. आता मी आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे, याचा मला अभिमान आहे.’


मला सुरुवातीपासून बॉलीवूड आणि समकालीन नृत्याची आवड होती. मी ते नृत्य शिकलो आणि आता नृत्यप्रशिक्षण ही माझी उपजीविका आहे. फक्त खेळाडू म्हणून मी माझा आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकत नाही. त्यामुळे नृत्याचे क्लास घेऊन मी चरितार्थ चालवतो. या कलेनेच आज मला ‘कलर्स वाहिनी’वरील ‘डान्स दीवाने’ या शोमध्ये पुढच्या फेऱ्यांमध्ये दाखल होण्याची संधी मिळाली आहे. प्रत्यक्ष माधुरी दीक्षित या शोच्या परीक्षक आहेत. मला यानिमित्ताने खूप शिकायला मिळत आहे. एका पायावर नृत्य करणारा मी एकटाच स्पर्धक या शोमध्ये आहे.  

 

‘दिव्यांगांसाठीच’ काम करणार
उमेदीच्या ऐन भरात अपंगत्व येण्याचे दु:ख मी अनुभवले आहे, सोसले आहे. त्यातून मार्ग काढला आहे. पण आपल्या देशात माझ्यासारखे दु:ख सहन करणारे सुमारे तीन कोटी अपंग आहेत. मला त्यांच्याही मनात माझी उमेद जागवायची आहे. मनापासून प्रयत्न केले, तर अपंगत्व आड येऊ शकत नाही, हे मला सगळ्यांना सांगायचे आहे. आज घराबाहेर पडायचे तरी अपंगांना अनंत अडचणी भेडसावतात. मला त्यावर काम करायचे आहे. त्यासाठी एक महाप्रकल्प मी हातात घेणार आहे.

  (शब्दांकन - जयश्री बाेकिल)

बातम्या आणखी आहेत...