आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाऊडी मोदी : अमेरिकी भारतीयांच्या अस्मितेचा हुंकार!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सुधीर जोगळेकर    पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७४ व्या अधिवेशनाच्या निमित्ताने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अमेरिकेत होते. त्यांचा हा दौरा अनेक कारणांनी गाजला. त्यातलं एक कारण होतं ह्यूस्टनमधला मेळावा, त्या मेळाव्यातील मोदींच्या भाषणाला अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेली हजेरी आणि मोदींनीही ‘अगली बार ट्रम्प सरकार’ अशी घोषणा देत जणू ट्रम्प यांच्या संभाव्य उमेदवारीला जाहीर केलेला आपला पाठिंबा. ट्रम्प यांच्या नव्या व्हिसाविषयक धोरणामुळे विस्थापित होऊ शकणाऱ्या शेकडो-हजारो अमेरिकी भारतीयांना आश्वस्त वाटावं असं एक वातावरण मोदींनी ट्रम्प यांच्याबरोबरच्या जवळीकीने निर्माण केलं.  अमेरिकेतल्या भारतीयांची संख्या आता ४४-४५ लाखांच्या घरात पोहोचली आहे. अमेरिकेच्या उद्योगावर, राजकारणावर, अर्थव्यवस्थेवर प्रभाव टाकू शकतील अशा संख्येत आणि ताकदीत आज तिथले भारतीय आहेत. ट्रम्प यांना आपला मतदार जसा सांभाळायचा आहे तसाच अमेरिकेच्या अर्थोद्योगाला मजबूत हातभार लावणारा भारतीय समाजही दुखवायचा नाहीये ही वस्तुस्थिती आहे. मोदींच्या या दौऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या ‘हाऊडी मोदी’ या उपक्रमाला ट्रम्प यांनी हजेरी लावली ती ही सारी गणितं डोळ्यासमोर ठेवून.  जगभरातल्या उद्योजकांना भारतीय बुद्धिकौशल्याचे विलक्षण आकर्षण आहे. आपापल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला गतिमान करण्याच्या प्रयत्नात ही बुद्धिमत्ता कामी यावी अशी इच्छा प्रत्येकाचीच असते. तंत्रज्ञानाच्या क्रांतीनं गती घेतल्यापासूनच्या गेल्या तीस वर्षांत लक्षावधी भारतीय आपल्या देशाची सीमा ओलांडून बाहेर पडले आणि त्यांनी शब्दशः सातही समुद्र ओलांडले, जगाच्या पाठीवरचा प्रत्येक खंड जवळ केला आणि जवळपास शंभराहून अधिक देशांत नोकरी-उद्योगाच्या निमित्ताने वस्ती केली. त्या त्या देशात राहून यातल्या प्रत्येकानं अमाप पैसा कमावला, परंतु त्यातला काही हिस्सा त्यातल्या प्रत्येकानं आपापल्या गावासाठी, समाजासाठी दोन्ही हातांनी खर्चही केला.  २०१४ च्या मे-जूनमध्ये मोदी सत्तारूढ झाले आणि त्याच वर्षीच्या सप्टेंबर महिन्यात ऐन नवरात्रीत मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आले. नवरात्रीचे नऊ दिवस साध्या गरम पाण्यावर राहत मोदींनी असंख्य सभा घेतल्या, संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हजेरी लावली, भाषणं केली आणि त्याचबरोबर मेडिसन स्क्वेअर गार्डनमध्ये भरलेल्या तब्बल वीस हजार भारतीयांच्या मेळाव्याला संबोधितही केलं.  अमेरिकेच्या इतिहासात इतक्या मोठ्या प्रमाणावर आजवर कुठल्याच विदेशी नेत्याच्या सभेला त्याच्या-त्याच्या देशातली माणसंच काय, त्या त्या देशांचे नेतेही आलेले नव्हते. किंबहुना मोदींना अमेरिकन व्हिसा मिळू नये म्हणून डाव्या विचारांच्या भारतीय नेत्यांनी जसे प्रयत्न केले तसे अश्लाघ्य प्रयत्न याआधी कुणी केले नव्हते. त्यांच्या श्रीमुखात भडकावणारी अशीच ही घटना म्हणावी लागली.   देश-विदेशात पसरलेल्या भारतीयांना भेटण्याचा मोदींचा झपाटा आजही तसाच सुरू आहे. ऑस्ट्रेलिया, युरोप, आफ्रिका आणि पश्चिम आशियातील आखाती देश असे जिथे जिथे मोदींचे दौरे झाले तिथे तिथे अशा मेळाव्यांचे आयोजन होत राहिले. मुख्य म्हणजे या सर्व मेळाव्यांचं आयोजन तिथल्या तिथल्या भारतीयांनी स्वबळावर केलं. फारच थोडं असं सहकार्य परराष्ट्र खात्याकडून किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून त्यासाठी घेण्यात आलं. भारतीयांनी विदेशात स्थायिक होण्यास सुरुवात केली त्याला जवळपास शंभर वर्षे होत आली. मजूर म्हणून भारतीय आफ्रिकेत गेले तेव्हापासून याची सुरुवात झाली आणि आज जगाच्या पाठीवरील बहुतांश देशात डॉक्टर्स, नर्सेस, इंजिनिअर्स, शास्त्रज्ञ, उद्योजक, अर्थतज्ञ, अनेक कंपन्यांचे सीईओज म्हणून भारतीय स्थिरावले आहेत.  ह्यूस्टन शहरात मोदींच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात, त्यासाठीचा पैसा उभा करण्यात या मंडळींनी बजावलेली भूमिका महत्त्वाची होती. आपापले नोकरी-उद्योग सांभाळून सुमारे दोन-तीन महिन्यांपासून ते या आयोजनात मग्न होते. अशा मोठ्या कार्यक्रमांसाठी १००-२०० डॉलर प्रवेश-शुल्क ठेवण्याची प्रथा विदेशात असते, परंतु ह्यूस्टन मेळाव्यासाठी असे प्रवेश शुल्क नव्हते. ५६ हजारांच्या उपस्थितीसाठी जो अवाढव्य खर्च होणार होता त्याची उभारणी स्थानिक भारतीयांनी स्वतः केली होती, स्वतःच्या खिशातून देणग्या देऊन, दुसऱ्यांकडून देणग्या घेऊन आणि पुरस्कर्ते मिळवून.   देश-विदेशात स्थायिक झालेल्या आणि इतक्या वर्षांनंतरही भारतीय भूमीशी वैयक्तिक स्तरावरून नातं टिकवून ठेवलेल्या भारतीयांना सामाजिक-राष्ट्रीय भूमिकातून जोडून ठेवण्याचे प्रयत्न मोदी पंतप्रधान झाल्यानंतरच सुरू झाले असा याचा अर्थ नाही. आधीच्या सरकारांनीही त्यासाठी प्रयत्न केले हे खरेच, परंतु आजवरच्या कुठल्याच भारतीय नेत्याने इतक्या मोठ्या संख्येत विदेशस्थ भारतीयांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केलेला नव्हता. प्रवासी भारतीय दिवसाचे आयोजन केले जाई तेही भारतात आणि आधीचे पंतप्रधान व राष्ट्रपती विदेशात गेल्यानंतर भारतीयांशी संपर्क साधत ते दिवाळीसारख्या सणाच्या निमित्ताने.  हाऊडी मोदी यशस्वी होण्यातली महत्त्वाची भूमिका त्या त्या देशात विविध नावांनी सुरू असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघसदृश कामांची. हिंदू स्वयंसेवक संघ अशा नावाने ही कामे सुमारे पन्नास वर्षांपूर्वी सुरू झाली. संघाच्या नावाने नाके मुरडणाऱ्या, हिंदुत्वाला शिव्या देणाऱ्या मंडळींनी हा सगळाच प्रवास समजून घेण्यासारखा आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर, त्याच्या यशस्वितेचे श्रेय उलगडून सांगण्याच्या निमित्ताने सोशल मीडियावर सौमित्र गोखले नावाच्या व्यक्तीचे छायाचित्र काही काळ झळकत राहिले. कोण हे सौमित्र? हा प्रश्न अनेकांना पडत राहिला.  पुण्यातील सीओईपीमधून बीई केल्यानंतर एमएस करण्यासाठी ते कॅनडात गेले. उत्तम वक्तृत्व, संगीताची जाण असलेले सौमित्र त्यानंतर संघाचे प्रचारक बनले. सुरुवातीस ठाणे, मग जळगावमध्ये प्रचारक म्हणून काम केल्यानंतर ते कॅरेबियन कंट्रीज, अमेरिका आदी देशांत संघ कामासाठी राहिले आणि आता जगभरातल्या संघ कामाच्या नियोजनाची जबाबदारी असलेले असे हे सौमित्र. समाज माध्यमात चर्चा सुरू झाल्यानंतर त्यांनी एक छोटे निवेदन प्रसृत केले, जे संघ कार्यकर्त्याची मनोभूमिका समजून घेण्यासाठी उपयोगी पडावे असे आहे. 

बातम्या आणखी आहेत...