आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाऊज द जोश? 'फिल्मी' सर..!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशभक्ती म्हणजे काय? पाकिस्तानविरोधात गरळ ओकणे? थिएटरात 'वंदे मातरम्' आणि 'भारतमाता की जय'च्या दणकेबाद घोषणा देणे? खरं तर कर्तव्यपरायणता हीच खरीखुरी देशभक्ती, पण आपल्याकडचे टिपिकल हिंदी सिनेमे देशभक्तीचे लेसर शो दाखवतात आणि 'सॅक्रेड गेम्स'सारखी बदनाम सिरीज मात्र देशभक्तीचा अर्थ सांगते..

 

जानेवारीला काय असतं? काय असतं म्हणजे? २६ जानेवारीला सव्वीस जानेवारी असती न काय असतं? बरं सांग, १५ ऑगस्टला काय असतं? च्यामारी, १५ ऑगस्टला पन्द्रा ऑगस्टच असतो, ना राव! हे असं काहीसं उत्तर अर्ध्याहून अधिक भारतातून मिळेल. ज्या कुणाला १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो हे माहीत आहे, त्याला या दिवसांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन का, म्हणतात याची कारणंही माहित असतील तर नवलच.


पण या व्यतिरिक्त दोन गोष्टी अशा आहेत, ज्या वेळी आपल्या देशभक्तीला उधाण येतं, त्या म्हणजे, भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच आणि भारत- पाक सैन्याचा आमना-सामना असलेला युद्धपट. वरुण ग्रोवर नावाचा चित्रपट लेखक, स्टँड-अप कॉमेडियन त्याच्या एका शोमध्ये म्हणाला होता, ‘जर पाकिस्तान अस्तित्वातच नसता, तर आपण देशभक्त असतो का?' हे खरंच विचार करायला लावणारं गंभीर विधान आहे. आपली देशभक्ती चित्रपटांवर एवढी अवलंबून आहे, की पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारीला काही ठराविक गाणी आपल्या कानावर पडल्याशिवाय देशभक्तीची फिलिंगच येत नाही. चौका-चौकांत, शाळेत, रेडिओ-एफएमवर ही गाणी जर लागली नाही, तर आपला राष्ट्रीय उत्सव उत्साहात साजरा होणेच अशक्य. ही जशी गाण्यांची टिपिकॅलिटी, तशीच आपल्या तथाकथित देशभक्तिपर चित्रपटांची टिपिकॅलिटी! डॉ. डँगच्या चहुबाजूंनी गोळ्यांनी देशाचा नकाशा चितारणाऱ्या दिलीप कुमारचा ‘कर्मा’, अजय देवगणचा ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’ किंवा बॉबी देवलचा नवा ‘शहीद’, ‘बॉर्डर’, नाहीच, काही तर ‘लक्ष्य’ किंवा ‘अब तुम्हारे हवाले वतन साथीयो’ यापैकी एक तरी चित्रपट पाहिल्याशिवाय आपल्याला आपली देशभक्ती प्रूव्ह करता येणं शक्य नाही. नुकताच ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक' नावाचा सिनेमा प्रदर्शित झाला. हा सिनेमा चालू असताना प्रेक्षकांमधून चार-दोन लोक त्यातील हीरोला पडद्याबाहेरून मार्गदर्शन करत होते. याहून थोर म्हणजे फिल्म संपल्या संपल्या ‘वंदे मातरम' आणि ‘भारत माता की जय' अशा जोशपूर्ण घोषणांनी थेटर दणाणून सोडलं होतं. तो ‘उरी’चा बदला तिकडे सिनेमात घेतला गेला आणि आम्ही प्रेक्षक इकडे चेकाळू लागलो. असो, चित्रपट टेक्निकली खरोखर चांगला झालाय, विकी कौशलचा अभिनय तर फारच कसदार आहे, पण टिपिकल देशभक्तिपर युद्धपटांच्या टिपिकल चुका करण्याचा मोह फिल्म मेकर्स टाळू शकले नाहीत.


एक साधा सरळ कुटुंब वत्सल सज्जन हीरो असावा, कुटुंबातील सदस्याची किंवा जिवलग मित्राची अतिरेक्यांकडून किंवा पाकिस्तानी सैन्याकडून हत्या व्हावी, बदला घेण्यासाठी हीरोचे बाहू स्फुरावे, वरिष्ठांनी नको नको म्हणत असताना सुद्धा कुठलीतरी जोखमीची मोहीम पेलण्यासाठी हीरोने आटापिटा करावा, शत्रूपक्ष पाकिस्तानीच असावा, त्यातील बड्या बड्या हुद्यांवरील अधिकारी कुरूप, वेंधळे आणि हास्यास्पदच असावेत, क्लायमॅक्स सीनच्या वेळी हीरोने मुख्य व्हिलनला मारण्यासाठी हातात असणारी आधुनिक शस्त्रास्त्रे बाजूला फेकून लाथा-बुक्क्यांचा मारा करत आरडाओरडा करत शिव्यांतून सगळी भडास काढावी, आणि या सर्व मोहिमेदरम्यान शत्रू पक्षातील एखाद्याला जीवदान देऊन भारतीय मानवतावादी संस्कारांची ग्वाही देणारा एखादा सीन असावा. या अशा गोष्टींचा समावेश असावाच लागतो, त्याशिवाय तो चित्रपट आपल्याला देशभक्तीचा वाटतच नाही, असंच जणू फिल्म मेकर्सने ठरवलं आहे. त्याचंही काय चुकतंय म्हणा, हे असं सर्व सीमित असेल, तर नावातच प्रेमकथा असणारा ‘गदर-एक प्रेम कथा’ सुद्धा आपल्याला देशभक्तिपर सिनेमा  वाटू लागतो. पाक किंवा ब्रिटिशांच्या विरोधात उभं राहणं, क्रांतिकारक किंवा सैनिक असणं म्हणजेच देशभक्ती असेल, तर याच चौकटीत राहून कथा, पटकथा आणि दिग्दर्शनाच्या अंगाने वेगळे ठरलेले काही चित्रपट हिंदी मध्ये होऊन गेले. त्यात रंग दे बसंती, सरफरोश, लगान, स्वदेस, रुस्तम, एअरलिफ्ट अशा काही चित्रपटांचा समावेश करता येईल, ज्यांना टिपिकल युद्धपट नसतानाही प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर उचलून घेतलं होतं. सर्वच टिपिकल गोष्टीना मोडीत काढणारा आलिया भटचा ‘राझी’ तर तुफान चालला.
देशभक्ती म्हणजे, केवळ सैन्यात भरती होणे आणि पाकिस्तान विरोधात युद्ध करणे, हेच आपले समीकरण होऊन बसले आहे. म्हणूनच सामान्य नागरिक म्हणून आपल्या ज्या मूलभूत जबाबदाऱ्या आहेत, त्या व्यवस्थित पार पाडणे, हीच खरी देशभक्ती असू शकते, हे आपल्याला कधी जाणवत नाही. देशाच्या संविधानाने सांगितलेल्या  समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता या मूल्यांची जपणूक करण्याची आपली काही जबाबदारी आहे, ती जबाबदारी स्वीकारणे हीसुद्धा देशभक्ती असते, याचं शिक्षण कुठेतरी कमी पडतं. वीज, पाणी, इंधन वाचवण्यासाठी प्रयत्न करून देशातील इतर नागरिकांचा विचार करण्यानेसुद्धा आपली देशभक्ती सिद्ध होऊ शकते, हे आपल्याला माहीत नसतं. आपल्या अशा टिपिकल देशभक्तीच्या चौकटीमुळे देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकाचा आपण जेवढा आदर करतो, तेवढा आदर नागरिकांची प्रामाणिकपणे सुरक्षा करणाऱ्या पोलिसांचा कधीच करत नाही. पोलिस नावामागे भ्रष्टाचार एवढा घट्ट चिकटून गेलाय, की त्यामुळे प्रामाणिक, कर्तव्यदक्ष वगैरे पोलिस अधिकारी असू शकतात, यावर आपण विश्वास ठेवूच शकत नाही, त्यामुळे पोलिस आणि देशभक्ती ही दोन वेगवेगळी टोकं असल्यासारखी आपल्याला वाटतात.


थेट सेक्स सीन्स, नग्नता, रक्त रंजित मारामाऱ्या, शिवीगाळ आणि राजीव गांधींच्या अनादरपूर्वक उल्लेखामुळे चर्चेचा विषय ठरलेली ‘नेटफ्लिक्स’वरील पहिली भारतीय वेब सिरीज ‘सॅक्रेड गेम्स’. आता कुणाला हे नाव ऐकल्यावर देशभक्तीचा आणि या सिरीजचा काय संबंध असा  प्रश्न पडेल. म्हणूनच वर म्हटलंय की, आपल्याला पाकिस्तान आणि युद्धकथा असल्याशिवाय ती कथा देशभक्तीची वाटतच नाही. ही कथा आहे, एका सरताज सिंग नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची. तो मुंबईतील एक भ्रष्टाचाराविषयी चीड असणारा, कर्तव्याशी प्रामाणिक, वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळलेला अस्वस्थ पोलिस अधिकारी, ज्याला गँगस्टर गणेश गायतोंडेकडून फोन येतो, त्यात तो येत्या २५ दिवसांत मुंबई शहरात काहीतरी भयानक घडणार असून, शक्य असेल तर शहर वाचव असे आव्हान देतो. अशी ही संपूर्ण शहराला उद्ध्वस्त करणाऱ्या कटाचा उलगडा करणारी उत्कंठावर्धक कहाणी म्हणजे, ‘सॅक्रेड गेम्स’. सैफ अली खानने साकारलेल्या सरताज सिंग या पात्राने शहर वाचवण्यासाठी आपल्या जीवावर उदार होत कट उलगडण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा प्रवास, या प्रवासात त्याला मदत करणारी ‘रॉ’ची एजंट अंजली माथूर म्हणजेच राधिका आपटे आणि मराठी माणसाचा अभिमान जागवत ठेवणारा, सरताजची सावली बनून राहणारा जितेंद्र जोशी, यांनी साकारलेला हवालदार काटेकर मला तरी देशभक्त वाटतात. 


विक्रम चंद्राच्या ‘सॅक्रेड गेम्स’ नावाच्याच कादंबरीवर आधारित ही मालिका आहे. वरुण ग्रोवर, स्मिता सिंग आणि वसंत नाथ या त्रयीने या सिरीजची पटकथा लिहिली असून अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी यांनी दिग्दर्शन केले आहे. कर्तव्यपरायणता म्हणजे देशभक्ती हे समजून घेण्यासाठी तर ही सिरीज नक्की पहायला हवी. यंदाचा प्रजासत्ताक दिन होऊन एक आठवडा लोटला, ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’ नावाचा युद्धपट येऊन जवळपास दोन आठवडे लोटले. ‘मणिकर्णिका’ भले ही ब्रिटिशविरोधी असला तरी कंगनाच्या आवाजात झाशीच्या राणीची इतिहास आणि कल्पिताद्वारे आपल्या मनावर कोरली गेलेली धमक नसल्याने, त्याचा आपल्या देशभक्तीवर काही विशेष परिणाम झाला नाही. याचाच अर्थ, आता आपल्या शरीरातील देशभक्तीची पातळी बऱ्यापैकी खालावलेली असेल. ‘उरी’ मध्ये विकी कौशल, जेव्हा त्याच्या पलटणीला ‘हाऊज द जोश?’ असं विचारतो, तेव्हा सगळे जण एका सुरात, एका दमात ‘हाय सर!’ असं उत्तर देतात. आता आपल्या देशभक्तीचे हे असे फिल्म्सच्या अंगाने पोस्टमॉर्टेम झालेले पाहून ‘हाऊज द जोश?’ असं कुणी विचारलं तर आपल्याला ‘फिल्मी... सर!’ असं उत्तर द्यावं लागणार हे नक्की.
लेखकाचा संपर्क : maheshmunjale@gmail.com

 

बातम्या आणखी आहेत...