आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हृदयनाथ मंगेशकरांना ‘जीवन गौरव’ झाकीर हुसेन यांना ‘पु. ल.’ सन्मान

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 पुणे -  ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिमाखदार स्वरूपात आयोजित करण्यात आलेल्या पुलोत्सवात  १७ ते २५ नोव्हेंबर दरम्यान बहुरंगी कार्यक्रमांच्या माध्यमातून रसिकांना पुलोत्सवाची पर्वणी अनुभवता येणार आहे. यानिमित्त यंदाचा ’पु. ल. स्मृती सन्मान’ उस्ताद झाकीर हुसेन यांना तर ’जीवन गौरव’ पुरस्कार हृदयनाथ मंगेशकर यांना प्रदान केला जाणार आहे, अशी माहिती आशय सांस्कृतिकचे वीरेंद्र चित्राव यांनी मंगळवारी दिली. या पुलोत्सवात ज्येष्ठ वैज्ञानिक डॉ. जयंत नारळीकर आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे, असेही ते म्हणाले.   


पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि रुपये २५ हजार असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.  महोत्सवाचे उद्घाटन शनिवारी १७ नोव्हेंबरला  सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे होणार अाहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.    


यंदाच्या पुलोत्सवात  बहुरूपी पु. ल.’ हा दृक्श्राव्य कार्यक्रम विजय पटवर्धन, प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सादर करतील. पुलंच्या पत्रलेखनावर आधारित ’पुलंचे पाैष्टिक जीवन’ हा  कार्यक्रम मधुरा वेलणकर, प्रवीण जोशी, प्रा. मिलिंद जोशी आणि गिरीश कुलकर्णी सादर करतील. ’भाषा प्रभू पु. ल. या विषयावरील परिसंवादात डॉ. आशुतोष जावडेकर, रेखा इनामदार साने, गणेश मतकरी सहभागी होणार  अाहेत. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात पुलंच्या चित्रपटांचा विशेष महोत्सव आणि पुलंच्या चित्रपटांच्या पोस्टर प्रदर्शनाचे’ उद्घाटन हाेईल, असे सांगण्यात आले.  

 

‘पुलं’वरील व्यंग चित्रांचे प्रदर्शन  
महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी रेखाटलेली पुलं विषयींची हास्य चित्रे आणि अर्क चित्रे यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि.द. फडणीस यांच्या हस्ते होणार आहे. त्याचठिकाणी १०.३० वाजता होणाऱ्या व्यंगचित्रांची दुनिया या परिसंवादात प्रशांत कुलकर्णी, आलोक निरंतर, शि.द. फडणीस सहभागी हाेतील. डाॅ. अनिल अवचट यांच्या हस्ते ज्येष्ठ समाजसेवक डाॅ. विकास आमटे यांना कृतज्ञता सन्मान प्रदान करण्यात येणार आहे.  पुलप्रेमींना माहीत नसलेल्या साहित्यावर आधारित ‘अपरिचित पुल’ हा कार्यक्रम सतीश आळेकर, चंद्रकांत काळे आणि गिरीश कुलकर्णी सादर करणार आहेत. तरुण पिढीला पुलंची टवटवीत ओळख करून देणारा पुलब्रेशन हा कार्यक्रम  चिन्मय मांडलेकर, दिग्पाल लांजेकर, अजय पुरकर आणि मृण्मयी देशपांडे सादर करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...