Gadget / हुवावेची गुगलला टक्कर, हार्मोनी नावाने ऑपरेटिंग प्रणाली केली लाँच 

स्मार्टफोनसह सर्व डिव्हाइसवर काम करेल ही ऑपरेटिंग सिस्टिम 

दिव्य मराठी

Aug 10,2019 02:26:00 PM IST

नवी दिल्ली - चिनी कंपनी हुवावेने 'हुवावे डेव्हलपर्स कॉन्फरन्स-२०१९' मध्ये त्यांची ऑपरेटिंग प्रणाली लाँच केली आहे. कंपनीने या प्रणालीला हांगमेंग ओएस नाव दिले आहे. याचे जागतिक नाव हार्मोनी ओएस असे आहे. हुवावे आणि गुगलच्या अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणालीत यामुळे मागील अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे.


लाँचिंग कार्यक्रमादरम्यान कंपनीचे अधिकारी रिचर्ड यू यांनी सांगितले की, ओएस स्मार्टफोन, स्मार्ट स्पीकर्ससह सेन्सर असलेल्या डिव्हाइसवर रन करता येईल. असे असले तरी कंपनीने ओएसच्या फीचरसंदर्भात अद्याप कोणतीच माहिती दिलेली नाही.


स्मार्टफोन आणि स्मार्ट टीव्हीमध्ये आधी अपडेट : हुवावेची ऑपरेटिंग प्रणाली सर्वात आधी स्मार्ट टीव्ही आणि स्मार्टफोनमध्ये देण्यात येणार आहे. त्यानंतर हे इतर डिव्हाइसमध्ये उपलब्ध करून देण्यात येईल. मात्र, त्यासाठी तीन वर्षांचा काळ लागेल. सध्या या ओएसचा वापर चिनी युजरच करू शकतील. मात्र, कंपनी लवकरच ही नवीन ऑपरेटिंग प्रणाली दुसऱ्या देशांतही लाँच करणार आहे.

ओएसवर असतील सर्व प्रकारचे अॅप
ही ऑपरेटिंग सिस्टिम जगातील सर्व प्रकारच्या स्मार्टफोनमध्ये वापरता येणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. म्हणजे ज्या स्मार्टफोनमध्ये गुगलची अँड्रॉइड ऑपरेटिंग प्रणाली आहे, तेदेखील याचा वापर करू शकतील. ओएसवर सर्व प्रकारचे अॅप मिळतील आणि येणाऱ्या काळात सर्व कंपन्या यासाठी अॅप तयार करतील, असेही कंपनीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. जगभरातील सर्व अॅप विकासकांना या ओएससाठी अॅप बनवण्यासाठी कंपनी खुले माध्यम देण्याचा विचार करत आहे.

X