आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

AIFF: औरंगाबादेत जगण्याचे भान देणाऱ्या दर्जेदार चित्रपटांनी उजळला रुपेरी पडदा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- समाज घडवायचा असेल तर त्याची सांस्कृतिक जडणघडण पक्की असलीच पाहिजे. अशा जडणघडणीसाठी सिनेमाएवढे सशक्त माध्यम नाही, असे मानणारे काही तरुण एकत्र आले आणि त्यांनी औरंगाबादेत आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलला सुरुवात केली. त्याला पाच वर्षे होऊन गेली. सहाव्या वर्षात हा फेस्टिव्हल आणखी व्यापक व्हावा, असा आयोजकांचा प्रयत्न होता. तो पहिल्याच दिवशी यशस्वी झाला. तीन पिढ्यांच्या रसिकांनी प्रोझोन मॉलमध्ये चित्रपटांना मोठा प्रतिसाद दिला. तो पाहून जगण्याचे भान देणाऱ्या दर्जेदार चित्रपटांनी आयनॉक्सचा रुपेरी पडदाही उजळल्यासारखे भासले. 

 
 'वाइल्ड स्ट्राॅबेरीज' 
स्वीडिश दिग्दर्शक इग्मार बर्जमन यांचा 'वाइल्ड स्ट्रॉबेरीज' हा चित्रपट पाहण्यासाठी गुरुवारी गर्दी झाली. इसाक बोर्ज या व्यक्तीने स्वप्नात पाहिलेला स्वत:चा मृत्यू, ही यातील विलक्षण बाब रसिकांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. यात वापरलेली प्रतीके, व्यक्तीच्या मनात उठणाऱ्या वादळांच चित्रण यात दाखवण्यात आले आहे. ९१ मिनिटांचा हा कृष्णधवल चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा होता. सन १९५७ मधील या चित्रपटात त्यांनी वापरलेल्या संकल्पना थक्क करणाऱ्या होत्या. 
 
कथा, पटकथा तर चांगली होतीच. यातील पात्रांची मांडणी आणि इसाक बोर्जचे स्वप्नात जाणे, स्वत:चा मृत्यू पाहणे ही दृश्ये खूपच चित्तथरारक होती. काटा नसलेले घड्याळ, रिकामे रस्ते, टाग्यांतून पडणारी शवपेटी आणि त्यातून स्वत:चाच मृतदेह हात बाहेर काढताना झालेली घालमेल हे प्रसंग दिग्दर्शकांच्या कल्पना विश्वाची झेप विशद करणारे होते. स्विडीश लॅटिन भाषेतील हा चित्रपट सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून टाकणारा होता. सहज संवादामुळे चित्रपट समजणे अधिक सोपे होते. सुनेला एका प्रोजेक्टसाठी गावाला घेऊन जाताना इसाक बोर्जच्या भूतकाळातील प्रसंग यात उभे राहतात. त्यांचे बालपण आणि पुढे आयुष्यातील प्रसंग यांचा गुंता, प्रायश्चित्त अशी सुंदर मांडणी चित्रपटात होती. सिनेमॅटोग्राफीही विलक्षण होती. पात्रांना विचारांच्या तळाशी नेताना, स्वप्नात घेऊन जाताना वापरलेले कौशल्य प्रेक्षकांनाही धक्का देणारे आहे.

 

मानवी मनाचे अंतरंग उलगडणारा चित्रपट 
दिग्दर्शकाने ९१ मिनिटांच्या या चित्रपटात मनाच्या तळाला स्पर्श केला आहे. वाइल्ड स्ट्रॉबेरीजमध्ये मानवी मनाचे अंतरंगांचे अनेक अस्पर्शित कंगोरे उलगडून दाखवले. आपल्याच प्रतिमा पाहण्याचे धाडस आपल्यात नसते. त्या उत्तमपणे उलगडून दाखवल्या. विशिष्ट विचारधारेने चालणाऱ्या व्यक्तीच्या मूळ प्रतिमेचा प्रभाव असा काही असतो की बाकी कंगोरे दिसतच नाहीत. - नीना निकाळजे, प्रेक्षक 

 

घटश्राद्ध 
भारतीय चित्रपट प्रकारात आज सर्वाधिक गर्दी झाली ती १४ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कन्नड दिग्दर्शक गिरीश कासारवल्ली यांच्या 'घटश्राद्ध' या चित्रपटाला. सन १९७७ मध्ये प्रदर्शित झालेल्या पारंपरिक चालीरीतींवर बोट ठेवणाऱ्या या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. 
यू. आर. अनंतमूर्ती यांच्या कादंबरीवर आधारित या चित्रपटात भारतीय समाजातील परंपरा, त्यात महिलांची होणारी गळचेपी, एक विधवा आणि बटूचे भावविश्व गुंफले आहे. १०८ मिनिटांच्या या कृष्णधवल चित्रपटात निसर्गातील आवाजांचा उत्तम वापर केला आहे. याशिवाय पार्श्वसंगीतात केलेला वाद्यांचा वापर भारतीय सृजनतेचा परिचय देणारा आहे. यमुनाक्का ही विधवा आणि नानी या ब्राह्मण गुरुकुलात शिकणाऱ्या बटूभोवती कहाणी फिरते. 

 

गुरुकुलात राहणाऱ्या नानी या विद्यार्थ्यांशी गुरुजींची विधवा मुलगी यमुनक्का हिची जवळीक असते. लहान भावाप्रमाणे ती त्याला जीव लावते. यमुनाक्का विधवा असते, पण ती गरोदर राहते अन् गावात चर्चेला प्रचंड उधाण येते. अशा वेळी यमुनाक्कावर गुरुकुलातील इतर विद्यार्थी टपून नजर ठेवतात. तिची अन् तिच्या प्रियकराची भेट चोरून पाहतात. पुढे प्रियकर तिला गर्भपाताचा सल्ला देतो. त्यासाठी तिला एका ठिकाणी नेतो. नानी पूर्णवेळ तिच्यासोबतच असतो. मात्र, ही गोष्ट गावात पसरते अन् मग तिला समाजाबाहेर काढत मुंडण केले जाते. नानीलाही गुरुकुल सोडावे लागते, अशी ही हृदयस्पर्शी कहाणी स्तब्ध करणारी आहे. यात पात्रांना अतिशय कमी संवाद आहेत. अभिनय, प्रकाशयोजना आणि प्रतीकांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचण्याचे कौशल्य यात दिसते. दिग्दर्शक कासारवल्ली यांनी १९७७ च्या दशकात परंपरांवर बोट ठेवणारा हा चित्रपट केला हे विशेष. 

 

समृृद्ध करणारा महोत्सव 
जगभरातील भाषा, संस्कृती, विचार करण्याची पद्धती, व्यक्त होण्याची शैली या महोत्सवात विविध चित्रपटांत आम्ही पाहतो आहोत. आम्हाला समृद्ध करणारा हा महोत्सव आहे. याशिवाय आपल्याकडील मोठे कलावंत, चित्रपट अभ्यासक, दिग्दर्शक यांचा सहवास चित्रपटांकडे पाहण्याची नवी दृष्टी देणारा आहे. - सलोनी शेरकर पाटील, चित्रपट रसिक 

 

समाज व्यवस्थेचे चित्र मांडणारी कथा 
गिरीश कासारवल्ली यांना काल पद्मपाणी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना १४ राष्ट्रीय पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांनी ओघवत्या शैलीत मानवी स्वभावाबद्दल केलेले भाष्य हे आज चित्रपटाला गर्दी होण्याचे कारण आहे. १९५३ च्या काळात समव्यवस्थेचे केलेले चित्रण उत्तम आहे. उत्तम संहिता, चित्रण आहे. प्रा. अजित दळवी, ज्युरी मेंबर.
 
दिग्दर्शक : गिरीश कासारवल्ली 
सिनेमॅटोग्राफर : एस. रामचंद्र 
वेळ : १०८ मिनिटे 
भाषा : कन्नड 
रंग : कृष्णधवल 

 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शनिवार, रविवारचे चित्रपट 
१२ जानेवारी : स्क्रीन २ सकाळी १०.१५ अब्यक्तो (बंगाली), १२.३० लव्हलेस, २.४५ पेंटिंग लाइफ, ५.३० बंदीशाळा, ८.३० अॅश इज प्युअरेस्ट व्हाइट. स्क्रीन ३ सकाळी १० सॅराबँड, १२.१५ भुवन शोम (दिग्दर्शन मृणाल सेन) २ वाजता विथ मोबाइल फोन-एव्हरीवन इज अ फिल्ममेकर या विषयावर प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी, अमरजित आमले, बकेट लिस्ट सिनेमाचे दिग्दर्शक तेजस देऊसकर, चित्रपट समीक्षक अमोल उदगीरकर व शिव कदम यांच्या उपस्थितीत परिसंवाद. ४.१५ व्हॉट विल पीपल से, ६.१५ नावाजलेल्या शॉर्टफिल्मचे प्रदर्शन, रात्री ९ गुड लक अल्जेरिया (फ्रेंच-बेल्जियम).
 
१३ जानेवारी : स्क्रीन २ सकाळी १०.४५ द स्वीट रिक्वियम, १२ तलान (कझाकिस्तान), २ वाजता टेंपेटे (फ्रेंच). स्क्रीन ३ - सकाळी १० वाजता ऑटम सोनाटा, १२ प्रसिद्ध दिग्दर्शक उमेश कुलकर्णी यांचा शॉर्टफिल्म मास्टर क्लास, २.३० जोहार मायबाप (दिग्दर्शक राम गबाले). 

बातम्या आणखी आहेत...