आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हायड्रोजनचा विशाल रिंग आकाराचा वायुमेघ सापडला, खगोलविश्वात नवा शोध

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : खगोलविज्ञानाच्या संशोधनाद्वारा विश्वाच्या उत्पत्तीसंबंधी विविध सिद्धांतांची मांडणी जगभर होत आहे. गेल्या वर्षी गुरुत्वलहरींविषयीचे क्रांतिकारी संशोधन जगासमोर खगोल संशोधकांनी आणले. त्यामध्ये पुण्यातील 'आयुका' संस्थेच्या संशोधकांच्या पथकाचा समावेश होता. त्याच परिसरातील एनसीआरए (नॅशनल सेंटर फॉर रेडिओ अॅस्ट्रोफिजिक्स) या संशोधन संस्थेतील संशोधकांनी एका नव्या शोधाची घोषणा गुरुवारी केली. अतिदूरवरील दीर्घिकेच्या भोवती असणाऱ्या हायड्रोजनच्या विशाल वायुमेघाचा शोध एनसीआरएच्या संशोधकांनी लावला आहे.

राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्र (एनसीआरए), पुणे येथील खगोलशास्त्रज्ञांनी हायड्रोजन वायूचा एक रहस्यमय गोलाकार अंगठी (रिंग) च्या आकाराचा वायुमेघ, जायंट मीटरवेव रेडिओ टेलिस्कोप (जीएमआरटी) वापरून शोधला आहे. या मेघाचा व्यास आपल्या आकाशगंगेच्या तब्बल चौपट आहे. या संशोधनाचे नेतृत्व एनसीआरए येथील पीएचडी विद्यार्थी ओंकार बाईत यांनी प्रा. योगेश वाडदेकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले. सुषमा कुरपती हिने रेडिओ निरीक्षणात महत्त्वाची भूमिका निभावली.

अचूक वितरण माहीत नव्हते

प्रा. वाडदेकर म्हणाले, 'अणुरूपी हायड्रोजन सुमारे २१ सेमींच्या तरंगलांबीवर रेडिओलहरी उत्सर्जित करत असतो. हायड्रोजन अणूंच्या या किरणोत्सर्गामुळे रेडिओ खगोलशास्त्रज्ञांना आपल्या आकाशगंगेमध्ये आणि जवळील दीर्घिकांमध्ये हायड्रोजन वायूचे प्रमाण आणि वितरण याचा नकाशा तयार करता येतो. साधारणत:, हायड्रोजन वायूचा मोठा साठा सक्रियपणे तारे निर्माण करणाऱ्या दीर्घिकांमध्ये आढळतो. परंतु तारे तयार होण्याची कोणतीही चिन्हे न दर्शवता एजीसी २०३००१ मध्ये मोठ्या प्रमाणात हायड्रोजन असल्याचे ज्ञात होते, पण त्याचे अचूक वितरण माहीत नव्हते. दीर्घिकेचा अभ्यास करण्याचे संशोधकांनी ठरवले. जीएमआरटीच्या उच्च रिझोल्युशनमुळे वायू किती आहे व कसा पसरला आहे याचे निरीक्षण शक्य झाले.

खगोलशास्त्रज्ञांपुढे मोठे कोडे : प्रा. याेगेश वाडदेकर

वायुमेघाच्या आतल्या बाजूची दीर्घिका (ज्याचे नाव एजीसी २०३००१ असे आहे) आपल्यापासून सुमारे २६० दशलक्ष प्रकाश-वर्षे दूर आहे. अभ्यासाचे प्रमुख लेखक ओंकार बाईत म्हणाले, अशा प्रकारचा हायड्रोजेनचा मोठा वायुमेघ आजवर एकच ज्ञात होता.' अभ्यासाचे सहसंशोधक प्रा. योगेश वाडदेकर म्हणाले अशा आकाराच्या इतक्या प्रचंड वायुमेघाची निर्मिती ही नेमकी कशी झाली हे खगोलशास्त्रज्ञांपुढे मोठे कोडे आहे.'
 

बातम्या आणखी आहेत...