आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौजन्याची ऐशीतैशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर-तुळजापूर-अहमदनगर असा प्रवास महामंडळाच्या बसमधून करण्याचे प्रसंग माझ्यावर वारंवार येतात. प्रवासात महामंडळाच्या गलथान कारभाराचे व प्रवाशांच्या बेजबाबदार वर्तनाचे रंजक किस्से आहेत. तारकपूर स्थानकात मराठवाडा, खान्देश, विदर्भातून अनेक बसेस येतात व जातातही. स्थानकातील ध्वनिक्षेपकावरून याची सविस्तर माहिती उद्घोषित केली जावी, ही प्रवाशांची रास्त अपेक्षा व महामंडळाचे कर्तव्य आहे, परंतु एक तासाच्या प्रतीक्षा काळात अशा उद्घोषणा मला क्वचितच ऐकण्यात आल्या, त्याऐवजी ध्वनिक्षेपकावर जाहिराती व गाणीच सतत ऐकवली जात होती. माझ्यासमोर एका खेडूत बाईला ज्या गावाला जायचे होते ती बस स्थानकात फलाटावर न येता एका कडेला उभी राहिली, चालकाने नोंद केली व बस निघून गेली, कुठलीही उद्घोषणा करण्यात आली नाही. त्या महिलेच्या हे नंतर लक्षात आले. प्रवास मार्गावरील कुठल्याही बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही, स्वच्छतागृहांची अवस्था अत्यंत शोचनीय, त्यामुळे महिला प्रवाशांना नैसर्गिक गरजा उघड्यावरच भागवाव्या लागतात. ध्वनिक्षेपकांवर जाहिरातींचा भडिमार मात्र सतत सुरू असतो. वाहकांची सुट्या पैशांसाठी अरेरावी, बस आपल्या सोईनुसार थांबवण्यासाठी वाहकांशी हुज्जत घालणारे प्रवासी, अवजड सामान टपावर न टाकता वाहकाला चिरीमिरी देऊन आसनांखाली, चालकाच्या केबिनमध्ये टाकणारे धंदेवाईक प्रवासी हे दृश्य सर्रास पाहायला मिळते व त्यामुळे प्रवाशांना खासगी वाहनातून जीवघेणा प्रवास करावा लागतो. लग्नकार्याच्या वेळी प्रवासाला निघायचे म्हणजे दिव्यच असते. एक तर बॅगा भरपूर असतात. एवढे अवजड सामान आणि लेकरंबाळं घेऊन प्रवास करायचा म्हटले की, प्रवाशांची तारांबळ उडते. गाड्यांना गर्दी, उन्हाळ्याचे दिवस आणि योग्य जागी न लागता कोठेतरी फलाटावर लागणारी एसटी यामुळे जीव मेटाकुटीला येतो, असे अनुभव प्रवासात नेहमी येतात.