आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खुणा ताज्याच..!

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

23 ऑगस्ट 2010. रात्रीचे जेवण आटोपून आम्ही गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात फोनची घंटा खणाणली. ‘तुमचा भाऊ, वहिनी व त्यांच्या एकुलत्या एक मुलास तुळजापूरहून परतताना नगर-सोलापूर मार्गावर मोठा अपघात झाला असून आम्ही काही गावकरी मिळून त्यांना उपचारासाठी नगरला घेऊन जात आहोत,’ असे एका अनोळखी व्यक्तीने सांगितले. सभोवती प्रचंड गोंगाट ऐकू येत होता. रुग्णवाहिकेच्या सायरनच्या आवाजाने माझ्या काळजाचा ठोका चुकला. आपण जे ऐकले ते बरोबर आहे ना, याची पुन्हा त्या नंबरवर फोन करून खात्री करून घेतली. मला प्रचंड रडू कोसळले. भीती आणि कुतूहल, अशा संमिश्र भावनांनी माझ्या मनात थैमान घातले. काय करावे काही सुचेना. जगदंबेसमोर लीन होऊन ‘ते तुझ्याच दर्शनासाठी आले होते, मग त्यांच्यावर हा प्रसंग का बरे ओढवला?’ ही माझी तक्रार नोंदवली. त्यांना या प्रसंगातून बाहेर येण्याची शक्ती दे, असे साकडे घातले. ते तिघेही गंभीर जखमी होते. माझा भाऊ थोडाफार शुद्धीत होता, परंतु वहिनी आणि भाचा यांची शुद्ध हरपलेली होती. 72 तास काळजीचे होते. वेळेवर मिळालेली वैद्यकीय मदत कामी आली. उपचारांना तिघेही चांगला प्रतिसाद देत असून त्यांची प्रकृती स्थिरावत आहे, असे कळल्यावर सर्वांना दिलासा मिळाला. दैवी शक्तीची किमया आणि त्यांच्या आई-वडिलांच्या पुण्याईचा प्रत्यय पदोपदी येत गेला. कालपरत्वे जखमा भरून निघाल्या, परंतु त्यांच्या खुणा अजूनही सर्वांना त्या भीषण प्रसंगांची आठवण करून देतात. अपघातग्रस्तांना रस्त्यावर मदत मिळत नाही असे बोलले जाते, परंतु ज्यांनी कोणी ज्ञात-अज्ञातांनी जखमींना मदत केली तेच देव, नाहीतर आणखी कोण ?