आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोळ्यातील भाव

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही प्रसंग असे असतात की, आपण दुसर्‍या माणसाच्या डोळ्यातील कृतज्ञतेचे भाव कधीच विसरू शकत नाहीत. आज माझे वय 82 वर्षे आहे. आयुष्यात मी बरेच प्रसंग अनुभवले. कल्याणला राहत असताना सकाळी सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कलेचे शिक्षण घेत होतो. रेल्वेचा पास काढण्यासाठी तिकीट बुकिंग खिडकीजवळ पहाटे साडेपाचच्या सुमारास उभा होतो. जवळच एक लाकूड विक्रेती बाई आपल्या लहान मुलाला घेऊन बसली होती. तिचे मूल रडत होते. मी तिला विचारले, ‘मूल का रडते आहे?’ यावर ती म्हणाली, ‘भाऊ, त्याला भूक लागली आहे.’ मी रेल्वे स्टॉलवर गेलो. तेथून बिस्कीटचा पुडा विकत घेतला. त्या बाईजवळ दिला. तिने त्यातील बिस्किटे मुलास खाण्यास दिली. बिस्किटे पाहून मूल रडायचे थांबले. त्या बाईच्या डोळ्यात कृतज्ञतेचे भाव दिसले. एसटी महामंडळाच्या प्रादेशिक कार्यालयात काम करत असताना लंच टाइममध्ये पान खाण्यास गेलो होतो. येताना रस्त्यात एका तरुणाने मला नमस्कार केला. त्याने माझ्याकडे चहासाठी रुपया मागितला. त्याच्याकडे लोकलचे रिटर्न तिकीट होते. मी त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, ‘मी बोरिवलीला राहतो. नोकरीसाठी वणवण भटकतो आहे. अद्याप नोकरी मिळालेली नाही. भूक लागली आहे. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून मी तुमच्याकडे मागितले.’ मी त्याला थ्री स्टार हॉटेलमध्ये नेले. त्याच्यासाठी जेवण सांगितले. जेवणाचे ताट पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. मी त्याला समजावले, ‘जेवताना रडू नये, असे म्हणतात.’ त्यावर तो म्हणाला, ‘साहेब, मी दोन दिवसांपासून उपाशी आहे. अनेक वेळा उपासमार होते आहे. आजचे अन्न आणि तुम्ही दाखवलेली दया यामुळे डोळ्यात पाणी आले.’ मला तो प्रसंग आजही आठवतो. नोकरीसाठी वणवण भटकंती, घरची गरिबी आणि त्यामुळे होणारी उपासमार ही परिस्थिती अनेकांवर ओढवलेली असते.