आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

..बाबा, आजी.. तुमच्याजवळ राहायचे,असे म्हणून बिलगल्या दोघी; पण ते करत होते सौदा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला - चिमणी पाखरं या चित्रपटातील कथानकात चिमुकल्यांच्या वडिलांचे अपघातात निधन होते, नंतर आईला कॅन्सर होतो. तिचे मरण तिला दिसत असते. मात्र आपल्या पाखरांचे भविष्यासाठी तिचे डोळे द्रवत असतात. जिवंतपणी पोटच्या पाखरांना दत्तक देण्याचा तो प्रसंग रडवल्याशिवाय ठेवत नाही. मात्र त्या कथानकात लेकरांसाठीचा मायेचा ओलावा, जिव्हाळा कासावीस करून जाताे. पण अकोल्यातील घटना हृदय हेलावून टाकणारी व चिड आणणारी आहे. येथे तर आई-बापही जिवंत असताना पैशाच्या मोहापायी बाप व आजी दोन्ही मुली विकायला निघालेत. प्रत्येकी तीन -साडेतीन लाखांंत त्यांचा सौदाही त्यांनी केला. मुलांची आजी आणि बाप एका हातात पैसा घेणार आणि दुसऱ्या हातात मुलींना सोपवणार तोच बाबा.., आजी आम्हाला नाही जायचे, तुमच्यासोबतच राहायचे, असे म्हणून धायमोकलून रडतात. मात्र त्या दोन्ही निगरगट्ट असलेल्यांच्या चेहऱ्यावर काहीही प्रतिक्रिया उमटत नाही. पण बघणाऱ्यांचे डोळे मात्र पाणावल्याशिवाय राहिले नाही, ही दुर्देवी घटना खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली. 


कृषी नगरमध्ये एक दाम्पत्य राहते. त्याला एक अडीच वर्षाची तर दुसरी सहा वर्षाची मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी पती पत्नीत वाद झाल्याने त्याची पत्नी दोन्ही मुली सोपवून माहेरी निघून गेली. आता या मुलीचे संगोपन केल्यापेक्षा त्यांना विकायचे आणि दुसरे लग्न करायचे असा कुविचार त्याच्या मनात शिरला. त्याला त्याच्या आईने संमती दिली व मुली विकण्यासाठी ते धडपड करू लागले. बालकल्याण समिती मुलांना दत्तक देते आणि त्या मुलांच्या बदल्यात आपल्याला पैसे मिळतील या हव्यासापोटी मुलींचा बाप व आजी दोघेही महिला बाल कल्याण समितीकडे गेलेत. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर बालकल्याण समितीच्या लक्षात त्यांचा उद्देश आला. मुलींच्या बदल्यात किती पैसे घेणार असे बालकल्याण समितीने त्यांना म्हटल्यानंतर त्यांनी प्रत्येकी साडेतीन लाख घेणार म्हणून सांगितले. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीने डमी पालक तयार करून सापळा रचला व मुलींची व पैशांची देवाणघेवाण करताना मुलीला विकण्याचे बिंग समोर आले. महिला व बालकल्याण समितीने दोन्ही मुलींना ताब्यात घेऊन उत्कर्ष शिशुगृहात ठेवले. या प्रकरणी समितीच्या अॅड. सुनीता कपिले यांच्या फिर्यादीवरून दोघांविरुद्ध खदान ठाण्यात गुन्हा दाखल केला. ही कारवाई महिला व बालकल्याण अधिकारी करूणा महंतरे, बालकल्याण समिती अध्यक्षा अॅड. पल्लवी कुळकर्णी, अॅड. मनीषा धूत व अॅड. सुनीता कपीले यांनी केली. या वेळी खदान ठाण्याचे ठाणेदार अनिल जुमळे यांचे सहकार्य होते. 


भावाच्या एक महिन्याच्या मुलीचाही केला होता सौदा 
आरोपींनी त्यांच्या भावाच्या एक महिने वय असलेल्या मुलीचाही सौदा केल्याचे या वेळी समोर आले. दरम्यान महिला व बाल कल्याण समितीने त्यांनाही खदान पोलिस ठाण्यामध्ये आणून त्यांना समजपत्र देऊन सोडून देण्यात आले. मात्र त्या दाम्पत्यांला या प्रकाराची काहीही कल्पना नसल्याचे समोर आले. 


गत दोन महिन्यांपासून आम्ही पाळत ठेवून होतो 
मुलीला विकण्याचा मनसुबा असल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही डमी दत्तक घेणारे पालक तयार केले. त्यांच्यासोबत साडेतीन लाख रुपयांचा सौदा करण्याचा बनाव केला. त्यानुसार पैशासाठी मुलींचे वडील आणि आजी काहीही करण्यास तयार असल्याचे आमच्या लक्षात आल्यानंतर ही कारवाई केली. सध्या दोन्ही मुलींना आम्ही उत्कर्ष शिशुगृहात ठेवले आहे. अॅड. सुनीता कपीले, महिला बाल कल्याण समिती 

बातम्या आणखी आहेत...