आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीचा आधार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानावर बातमी आली की, राजस्थानातील माझ्या गावाकडील ज्येष्ठ नागरिक लहुजी पटेल ह्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाच्या बातमीने माझे मन भरून आले. त्यांच्याशी माझ्या अनेक आठवणी निगडित आहेत. त्यांच्या आठवणींपुढे मी नतमस्तक झाले. 55 वर्षांपूर्वी त्यांच्यासोबत घालवलेला बालपणीचा तो काळ आठवला. आम्ही कट्टर श्रीगौड ब्राह्मण आणि ते पटेल. या दोन्ही समाजात आपसात रोटी-बेटीचा कसलाही व्यवहार होत नाही. माझी आई मी दोन वर्षांची असतानाच देवाघरी गेली. मला राजस्थानात माझ्या काकांकडे ठेवून वडील अंमळनेरला निघून आले. काका-काकूंनी माझी खूप आबाळ केली. मला कधी पोटभर जेवण दिले नाही. जे देत तेही शिळे. हे सर्व माझ्या शेजारी राहत असलेले लहुजी काका पाहत असत. त्यांना माझी कीव येत असे. काका-काकू शेतात गेल्यावर मला ते त्यांच्या हाताने अन्न खाऊ घालत आणि रोज देवाकडे हात जोडून प्रार्थना करीत की,‘हे देवा, मी एका ब्राह्मणाच्या मुलीला जेवू घालून तिला बाटवीत आहे.

मला क्षमा कर!’ ते असे का बोलतात हे तेव्हा मला कळत नसे. परंतु त्या वेळी त्यांनी केलेल्या त्या उपकारांमुळेच आज मी उभी आहे. त्यांच्या आठवणींनी माझे हृदय भरून येत आहे. त्यांनी जाती-धर्माची पर्वा न करता माणुसकीच्या दृष्टिकोनातून माझे पालन केले, मला आधार दिला. म्हणून मी स्वत:ला कधीही ब्राह्मण समजत नाही. माझ्या मते जो माणूस माणुसकीला जपतो तोच मोठ्या धर्माचा, मोठ्या जातीचा समजावा. हे मी लहानपणापासून माझ्या अनुभवावरून शिकले.