आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माणुसकीची मशाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुलीवरच्या प्रेमाखातर अफगाणिस्तानमार्गे पाकिस्तानात जाण्याचं अगम्य धाडस करणाया मुंबईकर हमीद अन्सारी या तिशीतल्या उच्चशिक्षित तरुणाची सहा वर्षांच्या वेदनादायी तुरुंगवासानंतर पाकिस्तान सरकारने सुटका केली. शरीर-मनाला झालेल्या यातनांचं गाठोडं घेऊन जेव्हा हमीद अमृतसरमधली वाघा सीमा ओलांडून मायदेशी, अर्थात भारतात परतला तेव्हा सभोवताली विद्वेषाचा आगडोंब उसळला असताना सीमेच्या अल्याड आणि पल्याड माणुसकीच्या मशाली अजूनही विझलेल्या नाहीत, हा मोलाचा संदेश सोबत घेऊन आला...


घुसखोरी करताना पकडले गेले या सबबीखाली या घटकेला पाकिस्तानातल्या तुरुंगात हजारेक भारतीय नागरिक कैद आहेत, तर भारताच्या तुरुंगात शेकड्याने पाकिस्तानी नागरिक जेरबंद आहेत. त्यातल्या निरपराधांची सुटका करणे हा परराष्ट्र संबंधांतला दोन्ही देशांत कळीचा मुद्दा आहे...

 

खाक़-ए-राह भी हम लोग, कहर-ए-तूफाँ भी
सहा तो क्या न सहा और किया तो क्या न किया -फैज अहमद फैज 

माणसं चुकतात. प्रेमात पडल्यावर अनामिक धुंदी अनुभवतात. त्याच धुंदीत मुंबईचा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला हमीद निहाल अन्सारी हा विशीतला तरुण दु:साहस करता झाला. प्रेम हे आंधळं असतं. शुद्ध वेडाचार (जूनून) असतो. माणसं प्रेमात शिरत नाहीत, पडतात. धडपडतात. सावरतात. कधी उद्ध्वस्त होतात. अशात आपल्याकडून मात्र घोडचूक झाली, हे  कळेपर्यंत हमीद अफगाणिस्तानातून पाकिस्तान आणि पाकिस्तानातल्या दगाबाज मित्रांमुळे तुरुंगात पोहोचला होता. पाकिस्तान हे इस्लामी राष्ट्र. हमीदचा धर्मही इस्लाम. पण राष्ट्र, राष्ट्रवाद, कडवा राष्ट्रवाद या संकल्पना भेदाच्या मोठाल्या भिंती उभ्या करून स्वधर्मीयांनाही शत्रू गटात ढकलतात. त्या न्यायाने मुस्लिम असूनही हमीदही शत्रू ठरला. नव्हे, शत्रू राष्ट्रातून आलेला संशयास्पद हेर म्हणून त्याच्यावर ताबडतोबीने शिक्का मारला गेला. माणूस प्रेमात कितीही वेडा झाला म्हणून शेजारच्या राष्ट्रांशी जोडलेला इतिहास पाहता सारं पणाला लावून अफगाणिस्तान, मग तिथून पाकिस्तान असला वेडाचार  करणार नाही. पण तो शिकल्या-सवरलेल्या हमीदने केला. विनाकारण स्वत:भोवती संशयाचं घनदाट धुकं ओढवून घेतलं. अशी घटना शत्रूराष्ट्रासाठी वर्चस्व गाजवण्याची सुवर्णसंधी असते. तशी ती याप्रसंगी पाकिस्तानने घेतली.  एरवी,मी प्रेमात पडतोय अशी पूर्वसूचना देऊन कुणी कृती करत नसतो किंवा आई-बापाला सांगून प्रेमात बुडत नसतो. २०१२ च्या सुमारास आधी इंटरनेटच्या आणि मग विघातक लोकांच्या सापळ्यात अडकलेला हमीदही त्याला अपवाद नसणार. त्यामुळे एका चुकीतून घडत गेलेल्या घटनांमुळे या साऱ्यापासून अनभिज्ञ अन्सारी कुटुंबीयांपुढे अंधार दाटला. मीडियातून, सरकारदरबारी आर्जव सुरू झाले.  इकडे हमीदच्या निरागसतेची खात्री पटल्यामुळे भारतातून त्याच्या सुटकेसाठी आवाज उठले. जतीन देसाईंसारख्या मानवाधिकार कार्यकर्त्यांनी भारताच्या पराराष्ट्र मंत्रालयाशी संवाद साधताना सीमेपलीकडच्या समविचारी सुहृदांनाही हाक दिली. हमीदशी ओळखदेख नसताना केवळ माणुसकीच्या नात्याने पाकिस्तानातले संवेदनशील पत्रकार-वकील मदतीला धावून आले. यात एक क्षण असाही आला, जेव्हा साऱ्या आशा मावळल्याची सगळ्यांची भावना झाली. 


अन्सारी कुटुंबीयांचा खुल्या जगात एका बाजूला हा असा संघर्ष सुरू असताना, तिकडे पाकिस्तानमधल्या पेशावरच्या तुरुंगात कैद असलेल्या हमीदच्या वाट्याला दिवस-रात्र दु:स्वप्नं तेवढी येत होती. आठ-आठ दिवस उभं राहण्याची शिक्षा झेलत, कधी उपाशीपोटी राहत टोकाचे मानसिक-शारीरिक छळ तो सहन करत होता. इकडे सत्तेशी सलगी असलेले धर्मांध लोक मुस्लिमांच्या बाजूने बोलणाऱ्यांना ‘पाकिस्तानात चालते व्हा'चे दरदिवशी आदेश देत होते. आणि तिकडे मुस्लिमधर्मीय हमीदचा मुस्लिमधर्मीय पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून छळ होत होता. पाकिस्तानी अधिकाऱ्यांना हमीदच्या हद्दीत शिरण्यामागच्या हेतूंबद्दल संशय असला तरीही हा तरुण पक्का भारतीय असल्याची  त्यांना खात्री होती. तेव्हा इकडचे धर्मांध लोक 
हमीदच्या धर्मबांधवांना भारतीय म्हणून मान्यता द्यायला राजी नव्हते. पण, सुसंगतीपेक्षा विसंगती हाच जगण्याचा स्थायीभाव खरा. परस्परविसंगतच घटनाच नकळत जगण्याचा आशा पल्लवीत होतात.  तसंच या घटनेतही घडलं. ज्या सत्तापक्षातून उठता-बसता देशातल्या मुस्लिमांना तुमची देशभक्ती सिद्ध करा, देशभक्त असल्याचा पुरावा द्या, म्हणत दरदिनी आदेश सुटत राहिले, त्याच सत्तेत परराष्ट्रमंत्री असलेल्या सुषमा स्वराज यांनी हमीदच्या सुटकेसाठी राजनैतिक पर्याय उपयोगात आणताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली. अमृतसर-कर्तारपूर मार्गाच्या कोनशिला समारंभप्रसंगी उपस्थित भारतीय पत्रकारांनी हमीदच्या कुटुंबीयांची व्यथा जाहीरपणे थेट पंतप्रधान इम्रान खान यांच्या कानी घातली आणि महिनाभराच्या अंतराने अंतर्बाह्य बदललेला हमीद भारतात परतला. डबडबल्या नयनांनी आपल्या आई-वडिलांना भेटता झाला. हमीदचं घर मुंबईत, त्याचं पहिलं पाऊल पडणार होतं अमृतसरच्या जमिनीवर आणि तिथून पुढे परराष्ट्र मंत्रालयाकडे दिल्लीत.  पण, पाकिस्तानी सीमा ओलांडून अमृतसरमध्ये  त्याने पाऊल नाही टाकलं तोच त्याच्या मनात "घरी' परतल्याची भावना उफाळून आली. सुषमा स्वराज यांना भेटल्यानंतर हमीदची आई, फौजियाने "मेरा भारत महान', "मेरी मॅडम महान' असे उत्स्फूर्त उद्गार काढले. वडील निहाल म्हणाले, इथे आमच्या पिढ्या दफन झाल्या, हाच आमचा देश, हीच आमची माणसं. म्हणजेच, हीच आमची मातृभू आणि हीच आमची पितृभू. इथे हमीदच्या आईचं मुलावरचं प्रेम जिंकलं, हमीदच्या वडिलांच्या अल्लाहवरच्या भक्तीला फळ आलं, हे  सारंच खरंच, पण त्यापेक्षा माणुसकी जिंकली, माणुसकीवरचा विश्वास दृढ झाला. 


दोन राष्ट्रांच्या पातळीवर घडणारी कोणतीही घटना अ-राजकीय नसतेच. तशीच हमीदच्या सुटकेचीही नसणार. कुरघोडीचं, वर्चस्वाचं राजकारण पडद्यामागे याहीप्रसंगी खेळलं गेलं असणारं. स्वत:ला उदार आणि समोरच्याला आडमुठा ठरवण्याच्या उद्देशाने फासे टाकले गेले असणार. पण अशी पावलं टाकण्यासाठी का होईना, एकमेकांविरोधात तोफा रोखून असलेल्या  सत्तांना भाग पाडलं गेलं. त्यासाठी दोन्हीकडचे शांतताप्रिय  लोक एकवटले. त्यातून निर्माण झालेल्या ताज्या झुळुकीने एकाच वेळी हमीद अन्सारीला मायदेशाची पायवाट दाखवली आणि विद्वेषाचं राजकारण करणाऱ्या तमाम एतद्देशीय कट्टरपंथींना देशातलं मुस्लिम मानसही उलगडून दाखवलं...

 

बातम्या आणखी आहेत...