आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माणुसकीचा प्रत्यय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या वर्षी आषाढी एकादशीला घडलेला प्रसंग डोळ्यासमोर आजही जसाच्या तसा उभा राहतो. गेल्या वर्षी 30 जूनला आषाढी एकादशी होती. सेकंड शिफ्ट करून माझे पती चिकलठाणा एमआयडीसीतून घराकडे परतत होते. रात्री 11.30 ची वेळ होती. पाऊस धो-धो पडत होता. ते घरी परतले नसल्याने माझी काळजी वाढत चालली होती. मी त्यांच्याशी मोबाइलवर सतत संपर्क करत होते. परंतु फोन उचलला जात नव्हता. मला वाटले अजून कंपनीतच असतील.

प्लँटवर असल्याने कदाचित मोबाइलच्या बेलचा आवाज जात नसावा. माझा मिसकॉल बघून तरी निदान मला कॉल करतील. त्यांची वाट पाहत असतानाच माझ्या मोबाइलवर एका पोलिसाचा कॉल आला. त्यांनी माझ्या पतीच्या दुचाकीचा क्रमांक सांगितला. त्यांना अपघात झाला असल्याचा निरोप त्यांनी दिला. तसेच धूत हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी वॉर्डमध्ये येण्याबाबत सांगितले. हा निरोप ऐकताच माझे हातपाय गळून गेले. घरी दोन लहान मुलीच होत्या. त्यांनी आत्या-मामाला फोन लावला. आम्ही येथील एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन गेलो. रात्रीचा दीड वाजत आला होता. तेथील डॉक्टरांनी क्षणाचाही विलंब न लावता, माझ्या पतीवर तत्काळ उपचार सुरू केला. डॉक्टरांच्या आणि त्यांच्या सहका-यांनी अथक परिश्रम घेतले. दुस-या दिवशी मेंदूतील रक्तस्राव थांबवण्यात यश आले. दहा दिवसांच्या उपचारानंतर माझ्या पतीला डिस्चार्ज देण्यात आला. आज या गोष्टीला वर्ष उलटून गेले आहे. परंतु त्या दिवशी त्या निर्जन रस्त्यावर, रात्रीच्या वेळी-धोधो पावसात, त्या पोलिसांनी प्रथम त्यांना दवाखान्यात नेले. त्यांच्यामुळे माझ्या पतीचे प्राण वाचले. तो पोलिस पांडुरंगाच्या रूपातच धावून आला असे म्हणावे लागेल. त्यांच्या तत्परतेमुळे आज आमचा संसार सुरळीत चालू आहे. त्यांचे उपकार तर आम्ही जन्मभर विसरणार नाही.