आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Hundreds Of People Took To The Streets In Support Of Myanmar Leader Aung San Suu Kyi

म्यानमारच्या नेत्या आंग सान स्यू की यांच्या समर्थनार्थ शेकडो लोक उतरले रस्त्यांवर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यांगून : नरसंहाराच्या आरोपाच्या विरोधात हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात म्यानमारची बाजू मांडण्यासाठी निघालेल्या म्यानमारच्या स्टेट कौन्सिलर आंग सान स्यू की यांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी शेकडो नागरिक रस्त्यांवर उतरले होते. यांगूनमधील सिटी हाॅलसमोर जमलेल्या या नागरिकांत स्यू की यांच्या नॅशनल लीग फाॅर डेमाॅक्रसी पार्टी या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. या कार्यकर्त्यांच्या हातात स्यू की यांना पाठिंबा दर्शवणारे फलक होते.

काय आहे प्रकरण?

बंडखोरांच्या हल्ल्यांच्या प्रत्युत्तर देण्यासाठी म्यानमारच्या लष्कराने देशातील रोहिंग्या मुस्लिमांविरोधात मोहीम उघडली होती. म्यानमारच्या लष्कराने नरसंहार सुरू केला आहे, असा आरोप करत सात लाखांपेक्षा जास्त रोहिंग्या मुस्लिमांनी शेजारील बांगलादेशात पलायन केले होते. त्याबाबतचा खटला हेगमधील आंतरराष्ट्रीय न्यायालयासमोर आहे. इस्लामिक सहकार्य संघटनेच्या वतीने गांबियाने हा खटला दाखल केला आहे. पुन्हा नरसंहार होण्याची शक्यता संयुक्त राष्ट्रांच्या सत्यशोधन समितीच्या प्रमुखांनी अलीकडेच व्यक्त केली होती. म्यानमारने नरसंहाराचा आरोप स्पष्टपणे फेटाळून लावला आहे, पण काही चुकीच्या घटना घडल्याचे पुरेसे पुरावे असल्यास आपण कारवाई करण्यास तयार आहोत, असेही सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर स्यू की या आंतरराष्ट्रीय न्यायालयात देशाची भूमिका मांडणार आहेत. परराष्ट्रमंत्री या नात्याने त्या म्यानमारच्या शिष्टमंडळाचे नेतृत्व करणार आहेत. या खटल्याची सुनावणी १० डिसेंबरला सुरू होणार आहे.