आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईचा मृत्यू : भुकेल्या बछड्याने १२ दिवसांनी साेडले प्राण; डिहायड्रेशन, न्यूमोनियाने मृत्यू झाल्याचा अंदाज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिन्नर - अवघ्या साडेतीन महिन्याच्या कोवळ्या वयात शिकार करून पोट भरणे शक्य नाही. त्यातच १२ दिवसांपूर्वी एका दुर्घटनेत आईनेही प्राण गमावले. अशा प्रतिकूल परिस्थितीत अन्न न मिळाल्याने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी सोमठाणे- मेंढी शिवारात उघडकीस आली.


घटनेची माहिती मिळाल्यानंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मादी बछड्याचा मृतदेह मोहदरी येथील वन उद्यानात आणल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. हळकुंडे यांनी शवविच्छेदन केले. याच ठिकाणी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. डिहायड्रेशन, न्यूमोनिया आणि भुकेमुळे या बछड्याचा मृत्यू झाल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


शिकार करणे शक्य नव्हते
अवघे साडेतीन महिने आयुर्मान असल्याने बछड्यास शिकार करता येणे शक्य नव्हते. आईच्या दुधात प्रतिकार शक्ती अधिक असते. शिवाय मादी बिबट्या शिकार करून बछड्यांना भरवते. मात्र, गेल्या १२ दिवसांपासून हा बछडा अन्नाविना असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनपाल अनिल साळवे यांनी व्यक्त केला. 
 

 

दुसरा बछडाही सैरभैर, वन विभाग लावणार पिंजरा
दोन बछड्यांसह मादीचा या भागात वावर होता. मात्र १२ दिवसांच्या अंतराने बिबट्याची मादी आणि एका बछड्याचा मृत्यू झाला. त्यानंतरही एका बछड्याचे या भागात वास्तव्य असून तो सैरभैर झाला झाला आहे. गुरुवारी एका उसाच्या शेतात हा बछडा फिरताना स्थानिक शेतकऱ्यांना आढळून आला. या बछड्यावर असा दुर्दैवी प्रसंग ओढवू नये, यासाठी वन विभागाकडून पिंजरा लावण्यात येणार असून त्यास ताब्यात घेऊन संगोपन करण्याची तयारी वन विभागाने केली आहे.