आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरकुलाच्या धनादेशाने केला घात; पतीचा पत्नीवर जीवघेणा हल्ला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जामनेर : येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या कंपाऊंडर पत्नीवर पतीनेच जीवघेणा हल्ला केल्याचा प्रकार रविवारी (ता. ३ रोजी) घडला. पुर्वनियोजित हल्ला करून पती फरार झाला आहे. तर अत्यवस्थ असलेल्या विवाहितेवर जळगाव येथे उपचार सुरू आहेत. 


मनिषा अनिल सपकाळ (कोळी, वय २६) ही विवाहिता जामनेर येथील सुविधा हॉस्पिटलमध्ये कंपाऊंडर म्हणून काम करते. रविवारीही ती नेहमीप्रमाणे हॉस्पिटलमध्ये काम करीत होती. दुपारी तीन वाजेदरम्यान अनिल चावदस सपकाळ (कोळी) हा पत्नी मनिषाला घरी घेऊन जाण्यासाठी आला. दुपारची वेळ असल्याने बाहेर कुणीही नव्हते. दोघेजण घरी जात असतानाच हॉस्पिटल जवळील एका बोळात पती अनिल सपकाळ याने हातातील लोखंडी रॉडने बेसावध असलेल्या पत्नी मनिषाच्या डोक्यात जोरदार वार केला. यात मनिषाच्या डोक्यात खोलवर जखम होऊन ती जागीच बेशुध्द पडली. आवाज होताच जवळच्याच घरातील एका महिलेने हा प्रकार पाहून जोरात आरडाओरड केली. त्यानंतर परिसरातील काही नागरिकांनी धावत येऊन मनिषाला ती काम करीत असलेल्या सुविधा हॉस्पिटलमध्ये नेले. डॉ.विनय सोनवणे यांनी तात्काळ जामनेर येथील उपजिल्हा रूग्णालयात प्रथमाेचार करून तेथून जळगाव येथे उपचारासाठी पाठविले. 


मनिषा नर्स तर अनिल हाॅटेलवर करताे काम 
शुक्रवारी जलसंपदा तथा वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते घरकूल लाभार्थ्यांना घरकुलाचे धनादेश वितरीत करण्यात आले. यात मनिषा अनिल सपकाळ यांनाही ४० हजारांचा धनादेश मिळाला. अनिल हा हॉटेलवर कामगार म्हणून काम करीत होता. त्यामुळे त्याने काही रक्कम आगाऊ उचल केली होती. धनादेश मिळताच त्याने हॉटेलच्या व्यवस्थापकाला फोन करून मला धनादेश मिळाला आहे, चार दिवसात तुमचे पैसे आणून देतो. असे फोन करून सांगितले. मात्र पत्नी मनिषा व अनिल यांच्यात वाद झाला. त्यातूनच अनिलने पत्नीवर वार केला असावा असा कयास माहितगारांनी पोलिसांजवळ व्यक्त केला. 


जामनेर आधीच चर्चेत 
जामनेरात गेल्या पंधरवड्यात डाॅ. भरत पाटील याने पत्नी अॅड. राखी पाटील यांचा खून केला हाेता. त्यामुळे शहर जिल्हाभरात चर्चेत हाेते. आता पतीने पत्नीवर केलेल्या हल्ल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 
 

बातम्या आणखी आहेत...