Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Husband kill his wife in Majalgoan

रागाच्या भरात मारहाण करत गळा दाबून पत्नीचा केला खून; चारित्र्यावर संशय खुनानंतर ठाण्यात जाऊन दिली गुन्ह्याची कबुली 

प्रतिनिधी | Update - Feb 10, 2019, 11:04 AM IST

आरोपी हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने नेहमी दोघात वाद होत होता.

 • Husband kill his wife in Majalgoan

  माजलगाव- जिनिंगवर मजुरी करणाऱ्या कामगाराने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा गळा दाबून खून केल्याची घटना माजलगाव शहराजवळील मनकॉट जिनिंग परिसरात शनिवारी पहाटे उघडकीस आली. उषा ढवळे असे मृत विवाहितेचे नाव असून पोलिसांनी एका तासातच आरोपी गणेश ढवळे याला जेरंबद केले आहे.

  माजलगाव शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गावर मनकॉट जिनिंग असून या जिनिंगवर बाहेरगावचे लोक काम करतात. गणेश प्रकाश ढवळे (रा. शेलगाव देशमुख, ता.मेहकर, जि. बुलडाणा) हा कामगार मागील काही महिन्यांपासून पत्नी उषा ढवळे (२२) हिच्यासह राहत असून गणेश याला एक दीड वर्षाचा मुलगा आहे. गणेश हा पत्नी उषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने नेहमी दोघात वाद होत होता. गणेश हा उषाला मारहाणही करत असे. शनिवार सकाळी दोघात भांडणे झाली. यात गणेशने रागाच्या भरात पत्नी उषाचा गळा हाताने दाबून तिचा खून केला. पत्नीच्या मृत्यूनंतर घाबरलेल्या गणेशने माजलगाव पोलिस ठाण्यात जाऊन आपण पत्नीचा गळा दाबून खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच माजलगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान, पोलिस उपनिरीक्षक शिवदर्शन बिरादार यांनी घटनास्थळी भेट दिली असता तेव्हा जिनिंगजवळील घरात उषाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून उषाच्या मृतदेहाचे माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. या प्रकरणी उषा ढवळेचे नातेवाईक सुनील भिकाजी मोरे (रा. कोयाळी (बु.) ता. रिसोड जि. वाशीम ह. मु. मनकॉट जिनिंग, माजलगाव) यांच्या तक्रारीवरून गणेश ढवळे याच्याविरोधात माजलगाव शहर पोलिस ठाण्यात गणेश प्रकाश ढवळे याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलिस निरीक्षक सय्यद सुलेमान हे करत आहेत.

  गळा दाबल्यावर मृत्यू होईल असे वाटले नाही, गणेशची निर्लज्ज कबुली
  विवाहिता उषा ढवळेच्या खूनप्रकरणी माजलगाव शहर पोलिसांनी अटक केलेला गणेश ढवळे याला रविवारी दुपारी विशेष न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. दरम्यान, पोलिसांनी गणेश ढवळे याची चौकशी केली असून पत्नीचा गळा दाबत असताना तिचा मृत्यू होईल असे आपल्याला वाटले नव्हते अशी त्याने कबुली दिली. पोलिसांनी गणेशच्या घराची झडती घेतली. तसेच शेजारी राहणाऱ्या रहिवाशांची या प्रकरणी चौकशी करण्यात आली.

  मृतदेह ताब्यात
  मृत उषा ढवळे हिची दुसरी बहीण बुलडाणा प्रसूती रुग्णालयात आहे. तिची प्रकृती बिघडल्याने उषाचे नातेवाईक तिकडे गेले आहेत. त्यामुळे माजलगाव येथे उषाचे माहेरकडील लोक संध्याकाळी सात वाजेपर्यंत आले नव्हते. उत्तरीय तपासणीनंतर उषाचा मृतदेह तिच्या नातेवाइकाने ताब्यात घेतला.

  २ वर्षांपूर्वी विवाह
  गणेश ढवळे याचा २०१७ मध्ये उषाचा विवाह झाला होता. विवाहानंतर त्यांना एक मुलगा परंतु गणेश नेहमीच उषाच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने दोघांचे पटेनासे झाले . यातूनच त्याने पत्नीचा खून केला असून गणेशच्या मुलाला नातेवाईक सुनील भिकाजी मोरे रा.कोयाळी (बु.) ता. रिसोड जि. वाशीम याने ताब्यात घेतले आहे .

Trending