आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी, पत्नीला डोंगरावर नेले; पत्नीचा खून करून पतीने तिच्याच साडीने घेतला गळफास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणाचा राग धरून पतीने ९ वर्षांच्या मुलीसह पत्नीला डोंगरावर नेत डोक्यात दगड घालून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सणसवाडी (ता. शिरूर) येथे घडली. खुनानंतर पत्नीच्याच साडीने गळफास घेऊन पतीनेही आत्महत्या केली. ऊर्मिला संतोष बच्चेवार (सणसवाडी, मूळ चांडोळा, जि. नांदेड) असे पत्नीचे तर संतोष बच्चेवार असे पतीचे नाव आहे. दांपत्याची मुलगी कोमलने (९) पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती पोलिसांना दिली. 


संतोष बच्चेवार यांनी एका महिलेला ३ लाख रुपये उसने व पत्नी उर्मिलाचे काही दागिने दिले होते. मात्र वारंवार मागणी करूनही ती महिला त्यांचे पैसे व ऐवज परत करत नव्हती. या कारणावरून संतोष व ऊर्मिलात वारंवार वाद होत होते. महिला व संतोषने एकमेकांविरुद्ध पोलिसांत तक्रारीही दिल्या होत्या. मात्र पैसे अडकून बसल्याने पती-पत्नीमध्ये वाद झाला. 


आधी अंगावर डिझेल शिंपडून आत्महत्येचा प्रयत्न : वादानंतर महिलेच्या घरून परत येताना संतोषने दुचाकीला बांधलेल्या डिझेलच्या कॅनमधील डिझेल स्वत:च्या तसेच पत्नीच्या व मुलीच्या अंगावर ओतले. परंतु डिझेलमुळे अंगाची आग होऊ लागल्याने त्याने पेटवून घेतले नाही. 
 

मुलीला म्हणाला : खोटी आत्महत्या करतो, तू पोलिसांना सांग
डोंगरावर संतोष मुलीला म्हणाला, आम्ही खोटी-खोटी आत्महत्या करतो. तू पोलिसांना सांग. मग पोलिस त्या बाईकडून आपले पैसे काढून देतील.  मुलगी खाली येताना आईच्या ओरडण्याचा आवाज आला. ती पळत डोंगरावरून खाली आली. एका कामगाराकडून पैसे घेत पोलिस ठाणे गाठले. माझे मम्मी-पप्पा डोंगरावर आत्महत्या करणार आहेत, असे सांगताच पोलिसही गोंधळून गेले व डोंगरावर धाव घेतली. तेथे उर्मिला आणि संतोष मृतावस्थेत आढळले.